Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

शिक्षण विभागातील अधिकारी धारेवर
सर्व शिक्षा अभियानात पीछेहाट
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी
सर्व शिक्षा अभियानच्या अंमलबजावणीत जिल्हा परिषद राज्यात सर्वात पिछाडीवर असल्याबद्दल, तसेच पुढील वर्षीचा आराखडा पदाधिकारी, सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मंजुरीस पाठविल्याच्या कारणावरून आजच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सर्व शिक्षाच्या १ कोटी १५ लाखांच्या आगाऊ दिलेल्या रकमेच्या हिशेबाची विचारणा करीत सदस्यांनी उपशिक्षणाधिकारी रामदास खेडकर यांच्यावर कारवाईची मागणी केली.

प्रकल्पग्रस्त शिक्षणसेवक भरती
कागदपत्रांची पडताळणी अचानक रद्द
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी
प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून शिक्षणसेवक पदाची भरती करण्यासाठी गुरुवारी (दि. १२) होणारा मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा कार्यक्रम अचानक स्थगित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासकांकडून पदाच्या भरतीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास पाठवलेली यादी सदोष असल्याने त्यांच्याच सूचनेनुसार पडताळणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

शिर्डीतून क्रांतिसेनेची धोत्रे यांना उमेदवारी
राहाता, ११ मार्च/वार्ताहर

क्रांतिसेना व अखिल भारतीय छावा संघटना राज्यात लोकसभेच्या पंधरा ते वीस जागा लढवणार असल्याचे सांगत क्रांतिसेनेच्या शालिनीताई पाटील यांनी शिर्डीतून सुचित धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. शिर्डी येथे आज आमदार शालिनीताई पाटील व छावाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

निळोबाराय ट्रस्ट-हजारे मतभेद संपुष्टात
पठारे, सावंत यांचे पत्रक
निघोज, ११ मार्च/वार्ताहर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमचे मतभेद संपुष्टात आले असून, संत निळोबाराय ट्रस्ट व उत्सव समितीच्या कार्याचे हजारे यांनी कौतुकच केले आहे. कागदपत्रात थोडीफार अनियमितता असल्याने हजारे यांनी उपयुक्त सूचना केल्या. त्यांच्याच सेवाभावी कार्याचे अनुकरण करणार असल्याची माहिती निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी पत्रकाद्वारे दिली.

परस्परांना चाचपल्यानंतरच प्रमुख पक्षांचे उमेदवार ठरणार!
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी

नगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांचे उमेदवार अजूनही ८ दिवस जाहीर होण्याची शक्यता नसल्याचे समजते. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच आपला उमेदवार जाहीर करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली आहे, तर राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याकडील असंतुष्ट गळाला लागतो की काय हे पाहूनच आपला उमेदवार ठरविण्याच्या मनस्थितीत भाजप आहे. या दोन्ही प्रमुख प्रतिस्पध्र्याच्या परस्परांना चाचपण्याच्या हालचालींमुळे उमेदवारीला विलंब होईल, असे दिसते.

पगारासाठीचे आंदोलन ‘तनपुरे’चे कामगार आजपासून तीव्र करणार
राहुरी, ११ मार्च/वार्ताहर

तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी थकित देणी व नियमित पगारासाठीचे द्वारबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. कार्यकारी संचालक बी. बी. पवार यांना यासंदर्भात ठोस निर्णय घेता न आल्याने उद्यापासून (गुरुवारी) आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब गावडे, राजू सरोदे, अशोक शेळके, भास्कर कोळसे यांनी दिला.

पुणतांबे, शिंगव्याच्या गोदापात्रातील वाळूतस्करी रोखण्याचे महसूलपुढे आव्हान
राहाता, ११ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून पुणतांबे, शिंगवे येथून मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळूची तस्करी सुरू आहे. बेकायदा वाळूउपसा रोखण्याचे आव्हान राहात्याचे नूतन तहसीलदार बी. बी. जाधव व श्रीरामपूर विभागाच्या नूतन प्रांताधिकारी गितांजली बावीस्कर यांच्यासमोर उभे आहे. वाळूतस्करांविरुद्ध नवीन महसूल अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे नदीकाठावरील लोकांचे लक्ष लागले आहे.

यशापयशोगाथा
अलीकडेच घडलेल्या दोन घटनांची, खरंतर दोन बातम्यांची जाणीवपूर्वक नोंद करावी लागली. वैशाली माडे आणि कार्तिकी गायकवाड यांच्या ‘सारेगमप’ या अतिशय गाजलेल्या संगीत स्पर्धेत सर्वप्रथम आलेल्या अभूतपूर्व यशाची ती वार्ता होती. बातमी तशी नेहमीची खासच नव्हती. या बोलक्या बातमीमागे काही योगायोग, पण काही विलक्षण संकेतही टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो आणि सर्वच क्षेत्रांत मुलींनी बाजी मारणारा ट्रेण्ड इथंही दिमाखात दिसला. पण या योगायोगामागील असलेलं सत्य आणि संकेतही लक्ष्यवेधी ठरले. दोन्ही अ‍ॅवॉर्ड विनर्स पहिल्या राऊण्डला नाकारून पुनरागमनात देदिप्यमान यशावर आपली मोहर उमटवून गेलेले. म्हणून ही आगळीवेगळी आणि अनोख्या प्रचितीची सक्सेस स्टोरी. या स्टोरीतील मेख तशी लाऊड अ‍ॅण्ड क्लीअर आहे.

कॉपीचा भस्मासुर
पोलीस डायरी

नगर जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांत कॉपीचे प्रमाण वाढले आहे. हे लोण प्रामख्याने मराठवाडय़ाकडून आल्याचे सांगितले जाते. विशेषत पाथर्डी, जामखेड, शेवगाव या हद्दीवरील तालुक्यांत कॉपीच्या गोंधळामुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. कॉप्या रोखणे हेच सध्या पोलिसांचे काम बनले आहे. विशेषत पाथर्डी शहर व तालुक्यांत कॉप्यांचा जो उच्छाद मांडला आहे त्याने जिल्हाधिकारीही अवाक् झाले. पाथर्डीच्या ग्रामीण भागातील खरवंडी, टाकळी मानूर भागात कॉप्या पुरविणाऱ्या गुंडांनी दहशत निर्माण केली आहे.

भगवान जिव्हेश्वर दिंडीचे पैठणला प्रस्थान
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी
पाईपलाईन रस्त्यावरील श्रमिक बालाजी मंदिरातून भगवान जिव्हेश्वर पायी दिंडीचे नुकतेच प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनाम व भगवान जिव्हेश्वरांचा जयघोष करीत ही दिंडी शेवगावमार्गे श्रीक्षेत्र पैठणला जाणार आहे. दिंडीत जिव्हेश्वरांच्या पादुका असलेल्या पालखीसह भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. मोहनमहाराज दहिफळे व श्रीमती पिंपरकर दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. दिंडीला प्रारंभ करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बालाजी मंदिर मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कनोरे, नगरसेवक धनंजय जाधव, दिगंबर ढवण, सतीश बारस्कर, विमलताई पाठक, डॉ. गोपाळकृष्ण गच्ची (मुंबई) आदी उपस्थित होते. भक्तांसाठी बांधण्यात येणार असलेल्या जिव्हेश्वर भवनाच्या बांधकामासाठी काशिनाथ जिक्रे यांनी १ लाख, डॉ. गच्ची यांनी ५१ हजार, अशोकराव शेकटकर (मुंबई) यांनी ११ हजार, तर ढवण यांनी ५ हजार रुपयांची देणगी या वेळी दिली. अरुण दळवी यांनी प्रास्ताविक केले. सुभाष पाठक यांनी आभार मानले.

फ्लॅटमध्ये शिरून चौघा अंधांना मारहाण;
साडेचार हजार लांबवले
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी
गुलमोहोर रस्त्यावरील कस्तुरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ४ अंध व्यक्तींना मारहाण करीत चोरटय़ांनी साडेचार हजार रुपये रोख व मोबाईल हॅण्डसेट लांबविला. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सुभाष बापू शिंदे (रा. करंजी, ता. पाथर्डी, सध्या रा. कस्तुरी अपार्टमेंट) हे आपल्या ३ अंध मित्रांसमवेत येथे राहतात. मंगळवारी रात्री २०-२२ वर्षांचे ४ चोरटे त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरले. त्यांनी शिंदे व त्यांच्या मित्रांना ‘तुम्ही आंधळे नाहीत, नाटक करता. तुम्ही अतिरेकी आहात,’ असा गलका करीत लाथाबुक्क्य़ांनी मारहाण केली. चाकूचा धाक दाखवित चोरटय़ांनी शिंदे व त्यांच्या मित्रांकडे असलेली रोख रक्कम व मोबाईल लांबविला. शिंदे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीमती बिरारी तपास करीत आहेत. दरम्यान, भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून नेण्याबरोबरच रात्री-बेरात्री घरात घुसून लूट करण्याच्या घटना वाढल्याने उपनगरांतील नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.

‘समाज जोडण्यासाठी सत्यशोधक विचार जोपासा’
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी
विविध जाती-जमातींमधील वितुष्टामुळे समाजात दरी निर्माण होत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी सत्यशोधक विचार घेऊन कार्य करावे, असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सचिव जालिंदर बोरुडे यांनी केले. पीपल्स हेल्पलाईन, राष्ट्रीय बहुजन समाज, जागृती महिला बचतगट यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्या वेळी बोरुडे बोलत होते. वंदना थोरात, प्रकाश थोरात, विश्वनाथ निर्वाण आदी या वेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले म्हणजे अखंड ज्ञानज्योत आहे. समाजातून जाती उखडून काढण्याकरिता फुले दाम्पत्याचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी काम करावे. सावित्रीबाईंमुळेच पुरुषप्रधान संस्कृतीतून महिला मुक्त होऊ शकल्या, असे निर्वाण यांनी सांगितले. अशोक भोसले, राजेंद्र थोरात आदींसह संघटनांचे सभासद महिला, पुरूष या वेळी उपस्थित होते.

भाजपच्या पुणे येथील मेळाव्यास कार्यकर्ते जाणार
कोपरगाव, ११ मार्च/वार्ताहर
पुणे येथे रविवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या मेळाव्यास गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास कोपरगाव तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे यांनी दिली. भाजयुमोच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युवा मोर्चाकडे व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली. बैठकीस उपाध्यक्ष सचिन तांबे, शहराध्यक्ष प्रभाकर वाणी, सरचिटणीस अविनाश गव्हाणे, राजेंद्र खैरे, विनित वाडेकर, कैलास सिनगर, राजेंद्र खिलारी, राजेंद्र गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मनोहर कृष्णानी यांनी आभार मानले.

हुंडेकरी मोटर्स क्रिकेट टुर्नामेंट दि. १४ पासून
नगर, ११ मार्च/प्रतिनिधी
टाटा मोटर्सचे अधिकृत वितरक हुंडेकरी मोटर्स प्रायोजित व जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘हुंडेकरी मोटर्स क्रिकेट टुर्नामेंटस २००९’ दि. १४ पासून नगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू होत आहे. २३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्य़ातील २१ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण जगताप यांनी दिली. यंदा प्रथमच सामने ४० षटकांचे असतील. प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये रोख व फिरता चषक आहे. उपविजेत्यांना १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ७ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक आहे. या व्यतिरिक्त सामनावीर, मालिकावीर, सवरेत्कृष्ट फलंदाज, सवरेत्कृष्ट गोलंदाज, सवरेत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. दि. ५ एप्रिलला अंतिम सामना झाल्यावर पारितोषिक वितरण होईल. हुंडेकरी मोटर्सचे संचालक सय्यद अब्दुल करीम यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय बोरा, वसीम हुंडेकरी, राजेंद्र चोपडा, अशोक बोरा आदी प्रयत्नशील आहेत.

काकर समाजाने शिक्षणाची कास धरावी झ्र् सालार
श्रीरामपूर, ११ मार्च/प्रतिनिधी

काकर समाजाने जुन्या चालीरितींना फाटा देऊन शिक्षणाची कास धरावी, असे प्रतिपादन इकरा सोसायटीचे अध्यक्ष अ. करीम सालार यांनी केले. काकर समाज संघटनेच्या वतीने आयोजित राज्यव्यापी मेळाव्यात श्री. सालार बोलत होते. आमदार जयंत ससाणे, विचारवंत हाजी गफ्फार मलिक, काकर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी रऊफ काकर, प्रदेशाध्यक्ष निजाम काकर, बिलालभाई सौदागर, बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी अधिकारी प्रा. वसंतराव बैचे, नगराध्यक्ष संजय फंड उपस्थित होते. श्री. सालार यांनी काकर समाजाच्या विविध समस्यांचा आढावा घेऊन काकर समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये करावा, अशी मागणी केली. अलहाज गफ्फार मलिक यांनी शिक्षणामुळे समाज मागे राहिला असून, समाजातील गुणांना त्यामुळे वाव मिळत नसल्याचे सांगितले. मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवून बालविवाहाला पायबंद घालावा, असे आवाहन त्यांनी केले.

सीमा चव्हाण यांचे एम. फिल परीक्षेत यश
श्रीरामपूर, ११ मार्च/प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची एम. फिल. परीक्षेत बोरावके महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील प्रा. सीमा चव्हाण उत्तीर्ण झाल्या. चव्हाण यांनी शिरसगावातील शेतमजुरांच्या सामाजिक व आर्थिक समस्या या विषयावर डॉ. वसुधा पुरोहित(औरंगाबाद) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक अभ्यास केला. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे, मीनाताई जगधने, सुमनभाई शहा, प्रकाश निकम यांनी अभिनंदन केले.

पोलिसाचे बसमध्ये हरवलेले पाकीट पत्रकाराकडून परत
राहुरी, ११ मार्च/वार्ताहर

बसमध्ये सापडलेले पोलिसाचे पैशाचे पाकीट येथील वार्ताहर उमेश उपाध्ये यांनी परत करून प्रामाणिकपणा दाखविला. उपाध्ये हे राहुरी-रावेर बसने मंगळवारी औरंगाबादला काही कामानिमित्त चालले होते. बसमध्ये त्यांच्या पुढील सीटवर नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल एस. बी. गोसावी राहुरीहून बसले होते. श्रीरामपूरमध्ये बस आल्यावर गोसावी उतरून त्यांच्या घरी निघून गेले. मागील सीटवर बसलेल्या उपाध्ये यांच्या पायाजवळ गोसावी यांचे पाकीट आढळले. वाहक सुधाकर पाटील यांना दाखवून पाकीट उघडले असता आत ३ हजार ३०० रुपये, पोलीस असल्याचे ओळखपत्र, एटीएम कार्ड व अन्य कागदपत्रे, दूरध्वनी क्रमांक होते. या क्रमांकावरून उपाध्ये यांनी गोसावी यांच्याशी संपर्क साधला. या दरम्यान बस नेवासे येथे आली. तेथे आलेल्या गोसावी यांना उपाध्ये यांनी पाकीट दिले. गोसावी यांनी देऊ केलेली बक्षिसी उपाध्ये यांनी नम्रपणे नाकारली.

नसलेला रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागाचा आटापिटा
कर्जत, ११ मार्च/वार्ताहर

अस्तित्वातच नसलेला डेंग्यूचा रुग्ण शोधण्याची वेळ येथील आरोग्य विभागावर आली आहे! या नसलेल्या रुग्णाच्या शोधासाठी आरोग्य विभागाने तालुक्यातील खेड गावचा परिसर पिंजून काढला. डेंग्यूची लागण झालेली कोणीही व्यक्ती आढळली नसली, तरी पुन्हा सर्व परिसरात सर्वेक्षण करून खबरदारीच्या उपाययोजना खात्यातर्फे राबविण्यात आल्या. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून दोन दिवसांपूर्वी येथील आरोग्य विभागाला एक पत्र प्राप्त झाले. तालुक्यातील खेड येथील कालीदास मंडलिक या व्यक्तीस डेंग्यूची लागण झाल्याचे त्यात म्हटले होते. पत्रानुसार बारडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी खेडगाव, परिसरातील वाडी-वस्तीवर शोध घेतला. मात्र, पत्रात उल्लेख केलेली कोणी व्यक्ती त्यांना आढळली नाही. एखादा चुकीचा नंबर वा मिसकॉल लागतो, त्याप्रमाणे आरोग्य विभागाची गत या पत्रामुळे झाल्याचे दिसून येते.

माजी विद्यार्थ्यांचा आज कोल्हारला मेळावा
कोल्हार, ११ मार्च/वार्ताहर

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नवव्या वर्षांतील पदार्पणानिमित्त उद्या (गुरुवारी) सकाळी ९ वाजता महाविद्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी, पालक व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य एस. एस. पंडित यांनी दिली. माजी विद्यार्थी, पालक, तसेच महिलांनी उपस्थित राहून आपले मनोगत, सूचना व अपेक्षा व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन प्राचार्य पंडित, समन्वयक प्रा. आर. बी. अनर्थे व विद्यार्थिनी कल्याण मंचाच्या सहसमन्वयक प्रा. श्रीमती व्ही. एस. मंडलिक यांनी केले आहे.

मिरजगावच्या वीजप्रश्नी सोमवारी ‘रास्ता रोको’
मिरजगाव, ११ मार्च/वार्ताहर

वीज कंपनीच्या येथील अनागोंदी कारभाराच्या विरोधात सोमवारी (दि. १६) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. ग्रामीण भागात इतरत्र १२-१२ तास वीजपुरवठा होत असताना येथे मात्र गेली दीड वर्षे केवळ ८ तास वीज दिली जाते. महिन्यातून केवळ एकदाच दिवसा वीजपुरवठा होतो. येथील उपकेंद्रावर आधीच मोठा भार असताना आष्टी तालुक्यातील २ गावे या उपकेंद्राला जोडली आहेत. वीज कंपनीने तयार केलेल्या मानकानुसार वीजपुरवठा न केल्याने प्रत्येक तासाला ५० रुपये भरपाई कंपनीने देणे बंधनकारक आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादीचे शाखाध्यक्ष संजय पवार, संपत बावडकर, डॉ. सुभाष सूर्यवंशी, डॉ. मोरे, अतुल जाधव, अशोक गोरखे, विजय पवळे, डॉ. राजेंद्र तोडमल, नितीन खेतमाळस आदींच्या निवेदनावर सह्य़ा आहेत.

तालुका दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कंक्राळे
कोपरगाव, ११ मार्च/वार्ताहर

कोपरगाव तालुका दुकान कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब कंक्राळे (रवंदे) यांची, तर उपाध्यक्षपदी सुनील शिंदे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी अशी - सचिव बाळासाहेब उगले, सहसचिव संतोष खडके, संघटक अविनाश उगले, सहसंघटक संजय आनप, मागर्दर्शक सल्लागार किशोर काळे, संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे, तालुका खजिनदार दिलीप घुमरे, सदस्य बाळासाहेब केकाण, श्रीकांत जाधव. प्रास्ताविक राजेंद्र जगताप यांनी केले. आभार शंकर सूर्यवंशी यांनी मानले.

‘भाजप युवा मोर्चा मेळाव्यास जिल्ह्य़ातून कार्यकर्ते जाणार’
अकोले, ११ मार्च/वार्ताहर

पुणे येथे रविवारी (दि. १५) होणाऱ्या भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या मेळाव्याला जिल्ह्य़ातून ५ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर वाकचौरे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मोदी यांच्याबरोबरच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे, सरचिटणीस पूनम महाजन आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास जिल्ह्य़ातून युवा मोर्चाचे अधिकाधिक कार्यकर्ते जावेत, यासाठी तालुकावार बैठका घेऊन नियोजन केले असल्याची माहिती श्री. वाकचौरे यांनी दिली.