Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
नवनीत

जी व न द र्श न
रत्नत्रय

 

प्रथम र्तीथकर ऋषभनाथांनी मोक्षमार्गासाठी, मुक्तीसाठी तीन ‘रत्नत्रय’ सांगितले. क्रोधमान, माया, लोभ, हिंसा, कुविचार यांना नष्ट करणारे त्रिशूलही त्यांना म्हणतात. ऋषभनाथांना आदिनाथ, शंभू, शंकर, शीव, ब्रह्मा, अच्युत, अनंत, श्रीपती, अर्हत, प्रजापती, हर, नाभेय, नाभीसुत आदी सहस्त्र नावांनी संबोधलेलं आहे. त्यांची रत्नत्रयं म्हणजे सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान, सम्यक चारित्र होय. ऋग्वेदातही म्हटलंय,
त्रिधा बद्धो वृषभो रोखीति
महादेवो मव्र्यान अविवेश..
तीन प्रकारांनी आबद्ध अशा ऋषभदेवांनी उंच स्वरात धर्माची घोषणा केली. म्हणजेच सम्यग्दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र होय. तत्त्वांवर श्रद्धा, सत्वर श्रद्धा, हे जग सहा द्रव्यांनी बनले आहे. त्यावर श्रद्धा, जड-चेतन स्वरूप ओळखून त्यावर श्रद्धा म्हणजे सम्यग्दर्शन. सम्यग्दर्शनामुळे जे ज्ञान मिळतं व जे आत्मविकासाकडे नेतं. आत्मस्वरूपाला ओळखतं. मन आणि इंद्रियांद्वारे वस्तू स्वरूप ओळखणे, स्व-पर भेद जाणून इष्ट वस्तूंचा स्वीकार करणे व अनिष्ट वस्तू त्यागणे म्हणजे सम्यकज्ञान होय. अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्याचं पालन करणं, क्षमा, मार्दव, आर्जव, तप, त्याग आदी दहा धर्माचं पालन करणे. कषाय, वासना, लोभ, क्रोध, मान, माया यापासून दूर राहून सर्वावर समताभाव ठेवणे म्हणजे सम्यक चारित्र होय.
मुक्तिमार्गाकडे नेणाऱ्या अनेक पायऱ्यांमध्ये या तीन पायऱ्या फार महत्त्वाच्या समजल्या जातात. या रत्नत्रयांचेही अजून अनेक भेद आहेत. ज्यांच्यामुळे आचारविचार व ज्ञानाची शुद्धी होते व खऱ्या सुखाचा मार्ग सापडतो. ल्ल लीला शहा

कु तू ह ल
चंद्राला पडणारं खळं
चंद्राला खळं पडतं म्हणजे काय होतं? हे खळं पडण्याचं कारण काय?

चंद्राभोवती कधीकधी काही अंतरावर सुंदर असं एक तेजोवलय दिसतं. त्याला आपण चंद्राला खळं पडलं असं म्हणतो. हा परिणाम प्रकाशाच्या अपवर्तनामुळे घडून येतो. पाण्यात बुडवलेली काठी ही वाकलेली दिसते हे आपल्याला माहीत आहे. प्रकाशकिरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा त्यांचा मार्ग बदलतो. यालाच म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन. आकाशात विविध प्रकारचे ढग आपण पाहातो. या ढगांची जमिनीपासूनची उंची कमी-अधिक असते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे २५ हजार फुटांवर सायरोस्ट्रॅटस् नावाचे ढग असतात. या उंचीवर तापमान खूपच कमी असतं. त्यामुळे या ढगांत असलेल्या बाष्पाचं रूपांतर बर्फाच्या स्फटिकांमध्ये होतं. असे अनेक स्फटिक या ढगांमध्ये तयार होतात. चंद्राकडून येणारे किरण या स्फटिकांतून प्रवास करू लागले की, त्याचं अपवर्तन होतं. म्हणजे त्यांची दिशा बदलते. याचा परिणाम म्हणजे केवळ चंद्राकडूनच नव्हे, तर त्याच्या भोवतालच्या वर्तुळाकार भागातूनही प्रकाश आपल्याकडे येतो. हे प्रकाशित वर्तुळ म्हणजेच चंद्राला पडलेलं खळं! खळय़ाच्या वर्तुळाच्या आतली बाजू ही लालसर रंगाची असते, तर बाहेरची बाजू निळसर रंगाची असते. प्रकाशातील घटक रंगांचे अपवर्तन वेगवेगळय़ा प्रमाणात होत असल्यामुळे खळय़ाला हे रंग लाभतात. सर्वसाधारणपणे या वर्तुळातील परस्परविरोधी बिंदूंचा आपल्या डोळय़ाशी होणारा कोन हा ४४ अंश इतका असतो. या ४४ अंश कोनीय आकाराच्या खळय़ाबरोबरच काही वेळा ९२ अंश कोनीय आकाराचं अजून एक खळं चंद्राभोवती दिसतं. सूर्यालासुद्धा अशा प्रकारची खळी पडतात. सूर्याला पडणाऱ्या खळय़ांच्या वर्तुळात कधीकधी दोन तेजस्वी ठिपकेही दिसून आले आहेत. यातला एक ठिपका सूर्याच्या डावीकडे असतो, तर दुसरा उजवीकडे असतो.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८


दि न वि शे ष
केमल पाशा

विसाव्या शतकात मध्ययुगाचा पगडा असणाऱ्या तुर्कस्तानसारख्या देशात क्रांती घडवून धर्मनिरपेक्ष राज्य स्थापणारे मुस्तफा केमाल अतातुर्क पाशा यांचे कार्य अतुलनीयच म्हणावे लागेल. १२ मार्च १८८१ रोजी त्यांचा जन्म झाला. वेगवेगळय़ा विचारसरणींचा त्यांनी अभ्यास केला. लष्करात कॅप्टन असताना ‘वतन’ या क्रांतिकारी संघटनेशी जवळीक बांधल्याने त्यांची बदली केली गेली. १९०८ साली तुर्कस्तानात क्रांती झाली. सुलतान अब्दुल हमीद यांस कैदेत टाकण्यात आले. यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पहिल्या महायुद्धातही त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. पण तुर्कस्तानचा पराभव झाला. तेव्हा ग्रीकांनी तुर्कावर आक्रमण केले. केमालने ते धाडसाने परतवले. ‘लॉझॉन’च्या तहाने तुर्कस्तानचा महायुद्धात पराभव होऊनही राजकीय स्वातंत्र्य अबाधित ठेवले. हा त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा कळस होय. ‘राष्ट्रीय सभा’ केमालने स्थापन केलीच होती. त्याद्वारे तुर्कस्तानचे प्रजासत्ताक जाहीर करून ते राष्ट्राध्यक्ष झाले. यानंतर सुधारणांचा धडाकाच त्यांनी लावला. बुरखा पद्धत, बहुपत्नीत्व त्यांनी रद्द केले. डोक्यात फेजेऐवजी पाश्चात्त्य पद्धतीची हॅट सक्तीची केली. अरबी लिपी रद्द करून रोमन लिपी सुरू केली. कुराणांवरील आधारलेल्या कायद्यांऐवजी युरोपियन पद्धतीचे कायदे सुरू केले. मुख्य म्हणजे तुर्कस्तानचा खलिफा हा इस्लामी जगताचा प्रमुख असतो. पण त्यांनी ही खिलाफतच रद्द करून मुल्ला-मौलवींना धक्का दिला. ‘युरोपचा म्हातारा’ ही तुर्कस्तानची ओळख त्यांनी पुसून टाकली, तथापि त्यांचे खासगी आयुष्य नैराश्याचे होते. मद्याच्या ते आहारी गेले होते. अखेर यकृताचा आजार जडून आधुनिक तुर्कस्तानच्या या जनकाचे १० नोव्हेंबर १९३८ रोजी निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
मिहिरची आई व क्रिकेटचा छंद
मिहीरचे क्रिकेट अगदी रंगात आले होते. जोरदार फटकारे मारत त्याने तीन चौकार मारले होते. धावांची संख्या ४५ झाली होती. पाहणारी मुले ओरडून त्याला आणि ऋषिकेशला प्रोत्साहन देत होती. एवढय़ात खिशातला मोबाईल वाजला. त्याने मारलेल्या चौकारामुळे दूर गेलेला चेंडू आणायला क्षेत्ररक्षक सौजन्य धावत गेला. तो वेळ साधून मिहीरने फोन उचलला. तिकडून आईची दटावणी ऐकू आली. ‘मिहीर, अरे अजून किती वेळ खेळणार आहेस. अभ्यास करायचाय ना? ये लगेच घरी.’ मिहीरचा सगळा मूड गेला. आनंदावर पाणी पडले. ‘काय ही आईची सारखी भुणभुण! सारखा किती अभ्यास करायचा? जरा म्हणून खेळूही देत नाही. दहावीची परीक्षा म्हणजे काय चोवीस तास अभ्यास करत बसायचं का?’ मिहीरची फारच चिडचिड झाली. पण आई रागवेल म्हणून मॅच आटोपती घेऊन तो घरी आला आणि अभ्यासाला बसला. त्याचं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. थोडा वेळ मिळाला असता तर आणखी धावा नक्की काढल्या असत्या. डोळय़ांसमोरून पाठय़पुस्तकातली अक्षरं जात होती, पण डोक्यात क्रिकेटची आगगाडी झुकझुकत राहिली. मिहीर टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहात बसला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगात आला होता. कुठला बॉल कसा टोलवायचा, गोलंदाज, फलंदाज, यष्टीरक्षक सगळय़ांच्या हालचाली तो बारकाईने टिपत होता. आई स्वयंपाकघरातून दाणदाण पाय आपटत आली. जरबेच्या आवाजात म्हणाली,‘‘मिहीर, अरे काय वागतोस असा? आधी बंद कर पाहू टीव्ही. परीक्षा आलीय ना जवळ? एवढा घोडा झालास, अजून कळत नाही का रे तुला!’’ आणि आईने टीव्ही बंद करून टाकला. कॉम्प्युटरवर काम करत बसलेल्या बाबांजवळ जाऊन ती म्हणाली,‘‘उद्यापासून टीव्हीचे कनेक्शन काढून टाका बरं. हा मुलगा सारखा त्या क्रिकेटमध्ये डोकं घालून बसतो. अभ्यासाचे नावसुद्धा काढत नाही.’’ मिहीर निमूटपणे उठला आणि अभ्यासाच्या वहीत डोकं खुपसून बसला. मनात मात्र क्रिकेटचा खेळ सुरूच राहिला. झोपताना आईनं बजावलं,‘‘सकाळी ४ वाजता ऊठ आणि अभ्यासाला बस. मी उठवेन तुला आणि कॉफी करून देईन. पण जर का उठला नाहीस तर फार रागवेन.’ मिहीर खरोखरच सकाळी आईच्या एका हाकेत उठला. तोंडावर पाणी मारून अभ्यासाला बसला. शहाण्या मुलासारखा अभ्यास करणाऱ्या मिहीरला पाहून आईला भडभडून आले. त्याला जवळ घेत ती म्हणाली,‘‘राजा, तुझं क्रिकेटचं वेड कळत नाही का मला! पण नुसतं क्रिकेट खेळून जगता येत नाही. निदान ग्रॅज्युएट तरी व्हायला हवं सोन्या! माझी खात्री आहे, तुझा क्रिकेटचा छंद एके दिवशी तुला चांगला खेळाडू करेल. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून छंदच फक्त वाढवायचा नसतो.’’
नियम न पाळणे, बंधने तोडणे, करू नको असं म्हटल्यावर तेच करणे, हे लहान वयात फार आवडते. काही गोष्टी जाचक वाटतात खऱ्या, पण त्या तुमच्या काळजीने, तुमच्या कल्याणाच्या इच्छेनेच तुम्हाला करायला लावल्या जातात. त्यामागे तुमच्यावरचे प्रेम असते.
आजचा संकल्प : एखादा नियम चुकीचा वाटत असेल आणि तो तुम्हाला पाळायला लागत असेल तर त्याबद्दल मोठय़ांशी मोकळेपणाने बोला.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com