Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

पनवेल-बदलापूर बस सोमवारपासून
पनवेल/प्रतिनिधी

पनवेल-बदलापूरदरम्यान एसटी बससेवेची नव्याने सुरुवात होत आहे. सोमवार, १६ मार्चला सकाळी सव्वाआठ वाजता पनवेल एसटी आगाराचे प्रमुख, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पहिली बस बदलापूरला रवाना होईल. ४२ किलोमीटरच्या या अंतरासाठी सुमारे दीड तास लागणार असून, त्यासाठी साधारण ३० रुपये भाडे मोजावे लागेल, अशी माहिती प्रवासी संघाचे सहकार्यवाह श्रीराम खेर व उपाध्यक्ष विनायक नाझरे यांनी दिली. ही सेवा सुरू होण्यासाठी प्रवासी संघाचे कार्यवाह श्रीकांत बापट यांनी ठाणे व मुंबई विभागाचे विभागीय नियंत्रक, विठ्ठलवाडी आगारप्रमुख यांच्याकडे चार वर्षे पाठपुरावा केला होता. पनवेलहून सुटणारी ही गाडी तळोजा औद्योगिक वसाहत, खोणी फाटा, एमआयडीसी, आनंदनगर, बदलापूर रेल्वे स्थानक, बदलापूर गाव असे थांबे घेणार आहे. बदलापूरहून ही गाडी सकाळी साडेसहा, सव्वादहा व संध्याकाळी पावणेसहा वाजता, तर पनवेलहन सकाळी सव्वाआठ, दुपारी पावणेचार व रात्री साडेसात वाजता वाजता सुटणार आहे. कामगार व अन्य प्रवाशांनी या सेवेला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी केले आहे.

पावसाने घेतली उत्सवप्रेमींची परीक्षा!
पनवेल, प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना पावसाने मंगळवारी रात्री पनवेलमधील उत्सवप्रेमींच्या उत्साहाची परीक्षा घेतली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह दाखल झालेल्या पावसाने सर्वानाच आश्चर्यचकित केले. होळ्या रचून त्या लावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मंडळींचे प्रथम तोंडचे पाणी पळाले. मात्र वरुणराजाने तासा-दीड तासाने विश्रांती घेतल्यानंतर उत्सवप्रेमींनी नव्याने जमवाजमव केली व ते या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
गेल्या काही वर्षांत निसर्गचक्र बदलल्याने ऐन नवरात्र, दसरा व दिवाळीत अकाली पाऊस पडण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र यंदा ऐन शिमग्यात हजेरी लावून पावसाने उत्सवाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला. वीजपुरवठा खंडित करण्याचे हुकमी निमित्त मिळाल्यानंतर वीज मंडळानेही बत्ती गुल केली व उत्सवप्रेमींच्या चिंतेत भर पडली. अखेर दीड तासांची दमदार खेळी केल्यानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली व सर्वाच्या जीवात जीव आला. त्यानंतर नेहमीप्रमाणे रात्री बाराच्या मुहूर्ताची वाट न पाहता अनेक मंडळींनी व सोसायटय़ांनी होळ्या लावल्या व जणू लहरी निसर्गाच्या नावाने बोंबा मारल्या. आजवर अनेकदा अकाली पावसाचा अनुभव घेतला आहे. मात्र यंदा होळीच्या दिवशी प्रथमच पाऊस अनुभवला, अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. वेळेवर पुरेसा पाऊस पडण्याच्या दृष्टीने वातावरण तापावे, यासाठी होळ्या लावण्याची शास्त्रीय परंपरा असताना होळीच्याच रात्री पाऊस पडण्याचा अनोखा अनुभव पनवेलकरांनी मंगळवारी घेतला.