Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

द्राक्षांसाठी रेल्वे वॅगनचा प्रश्न अधांतरी
वार्ताहर / पिंपळगाव बसवंत

विविध स्वरूपाच्या अडचणींना तोंड देत आणि प्रतिकूल हवामानाशी सामना करत शेतकरी द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र, द्राक्ष तयार झाल्यानंतरही संकटे त्यांची पाठ सोडत नाही. नियोजनबद्ध विक्री व्यवस्था नसल्यामुळे उत्पादकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. जिल्ह्य़ात द्राक्ष हंगाम जेव्हा ऐन भरास येतो, तेव्हा देशांतर्गत बाजारात माल पाठविण्यासाठी पुरेशी वाहनेही उपलब्ध होत नाहीत.

मजुरांअभावी ‘रोहयो’च्या कामांना खीळ
कोटय़वधीचा निधी वर्षभरापासून पडून
प्रतिनिधी / नाशिक
जिल्ह्य़ातील रोजगार हमी योजनेतंर्गत विविध कामांसाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे शासनाकडून मिळालेला कोटय़वधीचा निधी वर्षभरापासून पडून राहिल्याची बाब पुढे आली आहे. ‘रोहयो’च्या कामात मोबदला कमी असल्याने कामावर येण्यास मजूर तयार नाहीत. परिणामी, ग्रामीण भागात या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांना तर खीळ बसली, शिवाय रोजगार उपलब्धी करून देण्याची योजनाही अडचणीत सापडली आहे.

कळवणमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आता दोघांमध्येच स्पर्धा
नाशिक / प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसताना दिंडोरी मतदार संघ मात्र राष्ट्रवादीसाठी सोडण्यात येण्याची चर्चा असून काँग्रेसचा विरोध केवळ नावापुरताच शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून प्रारंभी इच्छुकांमध्ये असलेली स्पर्धाही आता कमी झाली असून कळवणचे आ. ए. टी. पवार यांना उमेदवारीची सर्वाधिक संधी असल्याचे मानले जात आहे.

जलसंपदा अभियंता भरतीप्रक्रियेत उमेदवारांची फसवणूक
मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा आरोप
नाशिक / प्रतिनिधी
जलसंपदा विभागाने राज्यातील कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत गरजू उमेदवारांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक केली असल्याचा आरोप मनसेच्या रोजगार-स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. हेमंत दीक्षित यांनी पत्रकाद्वारे केला आहे. पात्र उमेदवारांना जलसंपदा विभागाने पत्र पाठविले आहे. सहाय्यक मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नाशिक यांच्या स्वाक्षरीने तीन मार्च रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात संदर्भ म्हणून सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या मेलचा उल्लेख केलेला आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या अडचणींबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा
नाशिक / प्रतिनिधी
प्राथमिक शाळांची मूल्यांकनाची अट रद्द करावी, पटसंख्येच्या निर्णयात प्राथामिक शाळांनाही समाविष्ट करावे, खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतरांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आदी प्रश्नांकडे खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून लक्ष वेधले. खासगी प्राथमिक शाळेच्या विविध अडचणींबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आल्याची माहिती महासंघाने दिली आहे.

अभ्यासक्रमाबाबत आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

धुळे येथील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीतर्फे उलेमा टीचर्स प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम येत्या मे महिन्यात सुरू होत असून इच्छुकांनी प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील उलेमांसाठी मोफत निवास व भोजनाची सोय केली जाणार आहे. तसेच १५०० रूपये मासिक विद्यावेतनही देण्याची तयारी संस्थेने दर्शविली आहे. या बाबतची माहिती सर्वधर्म संघाचे प्रसिद्धीप्रमुख शेख हुसेन गुरूजी यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातील उलेमांची पहिल्या सत्रातील प्रशिक्षण जवळपास पूर्णत्वास आले आहे. अरबी मदरसा शिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या उलेमांना या सहा महिन्याच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येवू शकेल. या प्रशिक्षणात उर्दू, इंग्रजी, मराठी, विज्ञान, गणित, मानसशास्त्र आणि भूगोल यासारखे विषय अत्याधुनिक अध्यापक पद्धतीद्वारे शिकविले जाणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी अब्दूल अजिज शेख यांच्याशी ९७६६७४१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंदीला तोंड देण्यासाठी भारतीय बँका सक्षम -मोहंती
नाशिक / प्रतिनिधी

मंदीच्या सद्यपरिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय बँका सक्षम असल्याचे मत रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक दीपक मोहंती यांनी मांडले. येथे जे. डी. सी. बिटको इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट व बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांच्यातर्फे गुंतवणुकदारांसाठी आयोजित ‘इन्व्हेस्टेज २००९’ या चर्चासत्रात ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात झालेल्या कार्यक्रमात इन्स्टिटय़ुटच्या प्राचार्या डॉ. आ. अ. वेरूळकर यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमाचे उद्दिष्ट थोडक्यात स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी हे होते. यावेळी ‘इन्व्हेस्टर डायरी’ व ‘दि पायोनिअर’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. मोहंती यांनी मंदीचा जगासह भारतावर होणारा परिणाम स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. मो. स. गोसावी यांनी सद्यस्थिती म्हणजे भांडवलशाहीचा अंत आहे असे मत व्यक्त केले. प्रमोद पुराणिक, आशुतोष रारावीकर यांच्यासह नाशिकमधील गुंतवणूकदार व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रथम सत्राचे वक्ते चंद्रशेखर टिळक यांनी अमेरिकेच्या व भारताच्या अर्थव्यवस्थेतील साम्य व फरक स्पष्ट केला. भोजनानंतरच्या सत्रामध्ये एन. पी. पंडय़ा, रवींद्र सिंग तसेच शेखर बुवा यांनी ‘म्युच्युअल फंड’ विषयावर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात आयुर्विम्याचे व्यवस्थापक एम. पी. जैन प्रमुख पाहुणे म्हणून तर मॅक्स न्युयॉर्क लाइफचे राजेश दुबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.