Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

केळी उत्पादक वाऱ्यावर
वार्ताहर / जळगाव

केळी म्हटली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात खान्देशचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यातही जळगाव जिल्ह्य़ात केळीचे सर्वाधिक उत्पादन होत असल्याने केळी म्हणजे जळगाव आणि जळगाव म्हणजे केळी हे समीकरण बनले आहे. तथापि, स्थानिक केळी उत्पादकांना सुलतानी संकटाबरोबर शासनाच्या उपेक्षेचा सामना करावा लागतो. एवढे कमी म्हणून की काय व्यापाऱ्यांकरवी केल्या जाणाऱ्या भावाच्या चढउतारामुळे तो भरडला जातो, असे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्य़ाच्या अर्थव्यवस्थेची प्रमुख भिस्त ज्या केळी शेतीवर अवलंबून आहे, त्याकडे लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे उत्पादक वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना आहे.

कसं काय पाटील,
बरं हाय का..

भाऊसाहेब : व्हळी, धूलवडीची काय खबरबात, भावराव ?
भाऊराव : उत्साहात झाली की. आता निवडणुका होईपर्यंत धूळवड तर चालूच राहणार..
भावडय़ा : पण, सगळे उमेदवार जाहीर होत नाहीत तोवर खरी रंगत येणार नाही, म्हणे.
भाऊसाहेब : असं तुला कोन म्हन्लं ?
भाऊराव : यांचे ‘साहेब’ असणार, दुसरं कोण ? त्यांना तिकीट मिळालं तर यांना प्रचारात रंगत, नाहीतर हे करणार मग विरोधी उमेदवाराची संगत, काय ?
भावडय़ा : डॅड, त्या दशरथअप्पांच्या संगतीत राहून तुम्हालाही असल्या चारोळ्यांची ‘पॅशन’ झाली वाटतं.

‘मतदारसंघाची नस जाणावी’
आपल्याकडे हल्ली निवडणूक म्हटली की सर्वात प्रथम जातीय समीकरणावर भर दिला जातो. उमेदवारी निश्चित करतानाही तो कोणत्या जातीचा आहे, त्याच्या मागे त्याचे ज्ञाती बांधव किती प्रमाणात आहेत, त्याचा विचार होतो. पण, वास्तविक पाहता लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने ही प्रगल्भता असल्याचे म्हणता येणार नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींबाबत अपेक्षा व्यक्त करताना आणखीही अनेक बाबी लक्षात घ्यायला हव्यात. स्थानिक पातळीवर बोलायचे झाले तरी कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. खासदार हा त्या त्या भागाचे प्रतिनिधित्व देशपातळीवर करीत असतो.

हल्लेखोरांना त्वरित पकडण्याची मागणी
एटीएम सुरक्षारक्षकाची हत्या व लूट प्रकरण
वार्ताहर / धुळे
शहरातील एचडीएफसी बँकेच्या देवपूर भागातील एटीएम केंद्रातील १३ लाख ४२ हजार रूपयांची रोकड लांबवितानाच सुरक्षा रक्षकाचा खून करणाऱ्यांचा त्वरीत तपास करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हल्लेखोरांना पकडण्यात लवकरच यश येईल, असा दावा देवपूर पोलिसांनी केला असतानाच या घटनेमुळे एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एचडीएफसी बँकेने देवपूर भागातील नेहरूनगरमध्ये स्वतंत्र एटीएम सुविधा केंद्र उपलब्ध करून दिले आहे. याठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून अमित गरूड (२०) रा. गायकवाड चौक, जुने धुळे हा कार्यरत होता.

नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत वाद सुरूच
घडामोडी
नंदुरबार / वार्ताहर
काँग्रेससाठी लाभदायी ठरलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघावरच आता राष्ट्रवादीने दावा सांगितल्याने दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला असून या जागेवरूनच दोन्ही पक्षांमध्ये बोलणीही अडकली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघाने सदैव काँग्रेसची पाठराखण केली आहे. काँग्रेसला कधीही दगा न देणारा मतदार संघ म्हणून नंदुरबारची ओळख असून पाडय़ापाडय़ापर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचल्याने निवडणुकीत आपोआपच फायदा होतो.

जकात ठेक्यासाठी तिसऱ्यांदा निविदा
मालेगाव महापालिकेचा निर्णय
मालेगाव / वार्ताहर
आगामी आर्थिक वर्षांकरिता जकात वसुलीच्या ठेक्यासाठी महापालिकेने दोनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद न मिळाल्याने आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचारसंहितेमुळे पालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध करण्यास परवानगी मिळावी म्हणून निवडणूक आयोगास साकडे घातले आहे.

व्यक्तिमत्त्व विकास - ९
छंदोपासना

आमच्या लहानपणी काही छंद अगदी घरोघर मुले जोपासत असत. त्यात विविध देशांची पोस्टाची तिकिटे आणि नाणी जमवणे या गोष्टी अगदी ‘कॉमन’ होत्या. कारण परदेशात फोनवरून बोलणे दुरापास्त होते. आजच्या काळाप्रमाणे संगणकाच्या माध्यमातून ई-मेल किंवा चॅटिंगही उपलब्ध नव्हते. परदेशातून येणाऱ्या पत्रांची तिकिटे काढून जमवणे आणि त्यांचा अल्बम करणे, त्यामुळेच विशेष होते. विविध लग्नपत्रिकांचाही संग्रह केला जात असे. या गोष्टी जमवून त्या संग्रहासाठी वहीत चिकटवून ठेवताना आमचा वेळ तर छान जायचाच; पण निरीक्षणशक्ती, सौंदर्य टिपण्याचा गुणही वाढीस लागायचा. आजदेखील अशा प्रकारचे अनेक छंद जोपासणे शक्य असते.

जळगावात उमेदवार निश्चितीआधीच प्रचार
जळगाव / वार्ताहर

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच शिवसेना-भाजप यांच्यातील युती यांची अधिकृत घोषणा अद्यापही होत नसल्याने जिल्ह्य़ातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी मात्र आपआपल्या सोयीनुसार मतदार संघांचे वाटप केले असून त्याप्रमाणे प्रचारही सुरू केला आहे. आता आघाडी व युती दोन्ही बाजुंना केवळ मैदानात उमेदवार कोण राहतील, याची उत्सुकता आहे.

..पण लक्षात कोण घेतो?
लोकसभा निवडणुकीनिमित्त आता पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराचा धुराळा उडेल. सर्वाच्या भाषणांमध्ये दहशतवाद, जागतिक मंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे विषय मांडण्यात येतील. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपणच कसे लायक आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न होईल. जनतेविषयी आपणांस किती प्रेम आहे, याचे गोडवे गायले जातील. परंतु निवडणूक झाल्यानंतर पुन्हा जनतेला वाऱ्यावर सोडण्यात हीच मंडळी पुढाकार घेईल. याविषयी आता नागरिकांनीच विचार करण्याची गरज आहे.

महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात वांग्याच्या भरिताची मेजवानी!
शेखर जोशी

महाबळेश्वर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करून सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना तीन दिवसांच्या भोजनात अन्य रुचकर पदार्थाबरोबरच खास वांग्याच्या भरिताची मेजवानी मिळणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी वांग्याच्या भरिताचा हा खास बेत ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून संमेलनातील भोजनाच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

शिवजयंतीनिमित्त येवल्यात कुस्ती स्पर्धा
वार्ताहर / येवला

सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेल्या येवला शहरात यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे उद्या, १३ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच यानिमित्त दरवर्षीप्रमाणे कुस्त्यांची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. माजी नगरसेवक सुभाष पहिलवान यांच्या निवासस्थानापासून ही मिरवणूक निघणार आहे. सकाळी नऊ वाजता शनी पटांगणातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्त गतवर्षीप्रमाणे पारेगाव रस्त्यालगतच्या भाऊलाल पहिलवान लोणारी क्रीडा संकुलात १४ मार्च रोजी दुपारी तीनला कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्यापासून वसंत व्याख्यानमाला
वार्ताहर / अमळनेर

येथील अभिरूची साहित्य मंडळाच्या वतीने १३ मार्चपासून तीन दिवसीय वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळातर्फे दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यंदाच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन शिक्षक आमदार दिलीप सोनवणे व काँग्रेसच्या प्रदेश सचिव अ‍ॅड. ललिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पहिल्या दिवशी अकोल्याचे हास्य कवी अनंत खेळकर यांचे ‘हास्य धारा’ या विषयावर, १४ मार्च रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका आसावरी काकडे यांचे ‘कवितेविषयी काही’ या विषयावर, १५ मार्च रोजी अकोल्याचे शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हे ‘खरंच आपली मुले शिकतात का?’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. नागरिकांनी व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विवाहितेस मरणास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
मनमाड / वार्ताहर

येथून जवळच असलेल्या वंजारवाडी येथील सरला लभडे (२०) हिचा छळ करून तिला मरणास प्रवृत्त केल्याच्या फिर्यादीवरून सरलाचा पती, सासू, सासरा, दीर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तुला स्वयंपाक येत नाही, तुझा पायगूण चांगला नाही या कारणावरून सरलाचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिला काठीने मारहाण करण्यात आली तसेच जीप घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावे ही मागणी पूर्ण न झाल्याने तिला चटके देऊन छळ करण्यात आला आणि मरणास प्रवृत्त केले, असे सरलाचे वडील अर्जुन रायते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पती अनिकेत उर्फ अनिल वसंत लभडे, सासरा वसंत, सासू छाया, दीर राहुल व योगेश (सर्व रा. वंजारवाडी) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

झोपेत असलेल्या ग्रामस्थांना पिसाळलेल्या कुत्र्याचे चावे
येवला / वार्ताहर

तालुक्यातील अंगुलगाव येथे मध्यरात्री झोपेत असलेल्या ३० जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने खळबळ उडाली असून अंदरसूल येथे काही जखमींनी उपचार घेतले. अंदरसूल रुग्णालयात प्रतिबंधक लस शिल्लक नसल्याने अन्य गंभीर जखमींना नाशिक येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.उन्हाच्या उकाडय़ाने ग्रामस्थ अंगणात झोपणे पसंत करतात. रविवारी मध्यरात्री झोपेत असणाऱ्या ग्रामस्थांना पिसाळलेल्या कुत्र्यामुळे जाग आली. काही महिलांच्या नाकालाही या कुत्र्याने चावा घेतला. साहेबराव जाधव, सुनील साठे, केसरबाई गायकवाड, अलकाबाई ठाकरे, न्याहाबाई गायकवाड, विजय खैरणार, ज्योती निकम यांच्यावर अंदरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. शोभा भागवत, मुक्ता जाधव, बाळासाहेब आहेर या गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.

बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना दूर लोटावे -मीराताई आंबेडकर
जळगाव / वार्ताहर

बौद्ध धम्म व संस्थेच्या कार्यात कोणी आडवे येत असेल तर त्यांच्या डोक्यावर बांगडय़ा फोडा, असे सांगतानाच स्वार्थासाठी जर कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करीत असेल तर त्यांना अजिबात थारा देऊ नका असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी केले. भुसावळ येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष के. वाय. सुरवाडे यांच्या अध्यक्षखाली हा कार्यक्रम झाला. बाबासाहेबांनी आपल्याला शासनकर्ती जमात व्हा, असा उपदेश केला आहे, याची आठवण यावेळी मीराताईंनी करून दिली. जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही, चांगली नोकरी वा व्यवसाय करणार नाही, स्वत:चे घरदार करणार नाही, तोपर्यंत तुम्ही शासनात जाणार कसे, असा प्रश्न उपस्थित करून सर्वानी शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयीन तरूणांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत, आमचे संरक्षण आम्हालाच करावयाचे असल्याने बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले. आपल्या देशात सर्वाधिक अत्याचार व अन्याय आमच्याच लोकांवर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.बाबासाहेबांनी भारतीयांना एक व्यक्ती एक मत ही खूप मोठी शक्ती दिली आहे. आपल्या समाजाच्या माणसाला ते मत द्या, आपले अमूल्य मत अजिबात वाया जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.