Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

भाजपचा उमेदवार निश्चित नसतानाच मोदींची सभा!
पुणे, ११ मार्च / खास प्रतिनिधी

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची येत्या रविवारी (१५ मार्च) पुण्यात जाहीर सभा होणार असून, तोपर्यंत तरी भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पक्षाची प्रचाराला सुरुवात झाली तरी उमेदवारच निश्चित नसल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोदी यांना महाराष्ट्राचे प्रभारी नेमले आहे. त्यांची येत्या रविवारी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र, सध्या भाजप-शिवसेना यांच्यात सुरू असलेला जागावाटपाचा घोळ पाहता येत्या रविवापर्यंत तरी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मोदी यांच्या सभेने पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुटणार असला तरी उमेदवार कोण हे निश्चित झालेले नसेल. त्यामुळे मोदी यांच्या सभेचा पुण्यातील उमेदवाराला पूर्णपणे उपयोग होणार का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे राज्यस्तरीय संमेलन रविवारी पुण्यात होत आहे. त्याच्या समारोपाच्या निमित्तानेच मोदी सभा घेतील. त्यांच्याबरोबरच राज्यातील प्रमुख नेतेसुद्धा या वेळी पुण्यात उपस्थित असतील. या वेळी संभाव्य उमेदवार म्हणून कोणाला स्थान मिळणार, याबाबतही उत्सुकता आहे.
मोदी यांच्यावर लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र व गोव्याची जबाबदारी असल्याने त्यांची पुण्यात केवळ एकच सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच्या प्रचारासाठी मोदी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे.
राज्यातून निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. कदाचित ही तारीख या महिन्याच्या अखेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे, असे प्रदेश कार्यकारिणीच्या सूत्रांनी सांगितले. पुण्याचा विचार करता उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या उमेदवाराला संपूर्ण मतदारसंघात पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार का, असा प्रश्न केला जात आहे.

.. इच्छुक उमेदवार गायब!
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहर भाजपतर्फे काल पहिल्यांदाच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मोदी यांच्या सभेसाठी पक्ष काय तयारी करत आहे, याची माहिती शहराध्यक्ष गिरीश बापट आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे धनंजय मुंडे यांनी या वेळी दिली. या सभेच्या माध्यमातून लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार होणार आहे. मात्र, या पत्रकार परिषदेच्या वेळी पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेला एकही उमेदवार उपस्थित नव्हता. पुण्यातून इच्छुक असलेले अनिल शिरोळे, विकास मठकरी, विश्वास गांगुर्डे आणि अण्णा जोशी असे चारही जण तिथे दिसले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला होता.