Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

विद्यापीठाकडून आता शासनाचे नियमही धाब्यावर
भरती प्रक्रियेतील उमेदवाराची तक्रार
पुणे, ११ मार्च/खास प्रतिनिधी

 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये शासननिर्णयाद्वारे लागू करण्यात आलेली नियमावली पुणे विद्यापीठाने धाब्यावर बसविली आहे, अशी तक्रार या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या स्थानावर राहिलेल्या एका उमेदवाराने केली आहे. त्यामुळेच गुणवाढ गैरव्यवहारापाठोपाठ विद्यापीठाच्या पदभरतीमधील नवीन घोटाळा प्रकाशात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही तक्रार शासनमान्य अधिकृत पदासाठी करण्यात आली असल्याने तिला महत्त्व प्राप्त होत आहे.
राज्य शासनाने पदभरतीवरील बंदी उठविल्यानंतर विद्यापीठामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नेमणुका करण्यात आल्या. कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शासनाच्या नियमावलीनुसार पात्रता परीक्षा, मुलाखती, शारीरिक वा व्यावसायिक कौशल्य अशा विविध टप्प्यांवर इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. या प्रत्येक टप्प्यासाठी कसे गुणदान करायचे, अंतिम गुणतालिका तयार करताना या प्रत्येक टप्प्याला किती महत्त्व द्यायचे, याबाबत शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर २००८ साली स्वतंत्र शासननिर्णय जारी करण्यात आल्याने तो राज्यातील विद्यापीठांना बंधनकारक आहे. ‘लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करताना तोंडी परीक्षेत एकूण गुणांच्या १२.२ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण ठेवता येणार नाहीत,’ असे शासनाने स्पष्ट केले आहे. याच नियमाचे उल्लंघन झाल्याची तक्रार विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.
हमाल या पदासाठी २४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीद्वारे सात डिसेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली, तर २१ जानेवारीला मुलाखती पार पडल्या. या लेखी परीक्षेत ७५ पैकी ६० गुण मिळविलेल्या उमेदवाराला (आसन क्रमांक ४०२४४) मुलाखतीमध्ये मात्र सहाच गुण देण्यात आले. याच वेळी लेखी परीक्षेत ४८ गुणच मिळवू शकलेल्या उमेदवारावर (आसन क्रमांक ४०१४७) मुलाखतीदरम्यान २५ पैकी २१ गुणांची खैरात करण्यात आली. संबंधित उमेदवाराची निवडही करण्यात आली. याची माहिती प्राप्त झाल्यानंतर ६० गुण मिळवून लेखी परीक्षेमध्ये पहिला क्रमांक पटकाविलेल्या उमेदवाराने विद्यापीठाकडे धाव घेतली. प्रारंभी जानेवारीमध्ये लेखी तक्रार केली. त्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये या भरतीप्रक्रियेची माहिती मिळविण्यात आली. त्यामध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर आधारित चौकशी करण्यासाठी आता या उमेदवाराने नव्याने तक्रार केली आहे.

गैरव्यवहारातील आरोपी व्यवस्थापन परिषद सदस्याचा भाचा!
शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहाराचा सूत्रधार कक्षाधिकारी आतार हा पुणे विद्यापीठाच्याच व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्यांचा भाचा असल्याची माहिती पुढे आली आहे. आतार याच्या नियुक्तीच्या वेळी विद्यापीठातील कर्मचारी संघटनांनी आक्षेप नोंदविला होता. कक्षाधिकारी या पदावर बढती मिळविण्यास अन्य कर्मचारी पात्र असताना संगमनेर येथील एका महाविद्यालयात लिपीक म्हणून सेवेत असलेल्या व्यक्तीची थेट कक्षाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली होती. ‘आता याच आतारने गुणवाढ घोटाळ्याच्या माध्यमातून विद्यापीठाचा विश्वास सार्थ ठरविला आहे,’ अशी उपहासिक प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.