Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संचेती रुग्णालयासमोर चक्राकार वाहतुकीचा प्रस्ताव
पुणे, ११ मार्च / प्रतिनिधी

 

गणेशखिंड रस्त्यावरील भाऊसाहेब खुडे चौक (वेधशाळा चौक), नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संचेती रुग्णालय चौक) व स.गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) येथे चक्राकार वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेच्या विचाराधीन आहे. चक्राकार योजनेमुळे वाहतुकीचा वेग वाढून परिणामी कोंडी व प्रवासाचा वेळ कमी होणार असून, परिणामी शिवाजीनगर भागामध्ये प्रस्तावित दोन उड्डाण पूल बांधण्याची गरजच उरणार नाही, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.
जंगली महाराज व फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या योजनेबरोबर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यास डेक्कन भागातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना सोपा मार्ग उपलब्ध होणार आहे. खंडोजी बाबा चौकातून फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावरून गेल्यास कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळून थेट गाडीतळ चौकात व त्यापुढे रेल्वे स्थानकाकडे जाणे यामुळे शक्य होणार आहे.चक्राकार वाहतूक योजनेनुसार, खुडे चौकातून बोस चौकात, बोस चौकातून स.गो. बर्वे चौकात व तेथून खुडे चौक या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात येईल. त्यामुळे खुडे चौकातील १६५ सेकंदांचा सिग्नल ८०, बोस चौकातील १४० सेकंदांचा सिग्नल ७० तसेच बर्वे चौकातील १३० सेकंदांचा सिग्नल ९० सेकंदांचा करणे शक्य होणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली. शिवाजीनगर न्यायालयासमोर मात्र दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.चक्राकार वाहतुकीचाच भाग म्हणून कामगार पुतळा चौकातून गाडीतळ चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरही एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल. शिवाजीनगर न्यायालयाकडून बस किंवा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना बोस चौकातून डावीकडे वळून बर्वे चौकात उजवीकडे वळून खुडे चौकातून जाता येईल.
येरवडा किंवा नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही गर्दीचे सर्व चौक टाळून कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. बोस चौकातून डावीकडे वळून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून थेट येरवडय़ाला पोहोचणे वाहनचालकांना सोयीस्कर होईल. याकरिता यापूर्वीच संगम पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
‘‘सिग्नलवर थांबण्याचा वेळ तसेच वाहतुकीची गती वाढल्यामुळे शिवाजीनगर परिसरातील वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. प्रस्तावित दोन उड्डाण पूल बांधण्याची गरज त्यामुळे शिल्लक राहणार नसून चक्राकार योजना पुढील दहा वर्षांसाठी उपयुक्त राहील,’’ असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.