Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाविरुद्ध चिंचवडमध्ये संतप्त व्यापाऱ्यांचे आंदोलन
पिंपरी, ११मार्च / प्रतिनिधी

 

चिंचवड चापेकर चौकातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच या अरुंद रस्त्यावरून जड वाहनांना बंदी सक्तीची करावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आज जोरदार आंदोलन केले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवडगाव येथील चापेकर चौकातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले.या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम गेले वर्षभर बंद पडलेले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अवघा दहा ते बारा फुटांचाच रस्ता असल्याने एखादे जडवाहन आले, की पादचारी, दुचाकीचालक, सायकलस्वार यापैकी कोणालाही रस्त्याने जाता येत नाही. वारंवार अपघात होतात, वाहतूक तासन्तास खोळंबते. त्यातच या रस्त्याला खड्डे पडल्याने लोकांनाही चालताना अक्षरश: कसरत करावी लागते. जड वाहनांना प्रवेश बंदचा फलक लावूनही ही वाहने घुसतात, वाहतूक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात. दुचाकी वाहने लावायला सुद्धा जागा नसल्याने परिसरातील ग्राहकांची प्रचंड गैरसोय होते. या सर्व परिस्थितीबद्दल पालिका आयुक्तांना व्यापाऱ्यांनी चार वेळा निवेदन दिले, मात्र प्रशासनाकडून त्याची बिलकूल दखल घेतली गेली नाही. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी संतापून रास्ता रोको केला.
जड वाहनांना प्रवेश बंदचा नियम डावलणारी एक बस व्यापाऱ्यांनी अडवली. त्यामुळे हा रस्ता सुमारे अर्धा तास बंद होता. अचानक सुररू झालेल्या या आंदोलनामुळे होळीच्या बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांची काहीशी तारांबळ उडाली. पीएमपीएलच्या व्यवस्थापकांनी या बाबत पोलिसांना कळविताच पोलीस कुमक आली. त्यानंतर हे आंदोलन निवळले.
पुलाचे काम एकतर त्वरित पूर्ण करा किंवा होत नसेल तर पूर्वी होता तसा रस्ता करून द्या, अशी व्यापाऱ्यांची आग्रही मागणी आहे. पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावरही कारवाई करा. कारण काम बंद असण्याच्या काळात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून जड वाहनांच्या प्रवेश बंदीसाठी मदत करण्याचे लेखी आश्वासन त्याने दिले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी दिली. दरम्यान, पालिकेने त्वरित कारवाई केली नाही, तर यापेक्षाही तीव्रआंदोलन करण्याचा इशाराही या व्यापाऱ्यांनी दिला.