Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आयात उमेदवार कोण?..

 

बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्याचे त्यांच्या कट्टर विरोधकांनाही मान्य करावे लागते. आता तर पवार घराण्यातील पहिली महिला म्हणजे शरद पवारकन्या सुप्रिया सुळे निवडणूक लढविणार असल्याने त्यांना मताधिक्य किती मिळणार, याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना निवडणूक कुणी लढवायची, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. पवार यांच्या विरोधात विजयी होण्यापेक्षा किमान मते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न विरोधक करतात. एकेकाळी पवार यांच्या विरोधात लढून एक लाखावर मते मिळविल्याबद्दल भाजपच्या एका पदाधिकारी महिलेचा लाख मोलाची उमेदवार म्हणून उल्लेख करण्यात येत होता. ही लढत अगदीच एकतर्फी होऊ नये, यासाठी बारामतीबाहेरही नाव असलेला एखादा उमेदवार आयात करण्याची चर्चा विरोधकांमध्ये होत असून त्यात सर्वसामान्य मतदारांनाही कुतूहल वाटेल अशी नावे घेतली जात आहेत. त्यामुळेच बारामती मतदारसंघात सध्या अशाच आयात नामवंतांची चर्चा सुरू झाली आहे. विख्यात चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी तसेच अभिनेत्री स्मृति इराणी यांच्या नावाचा विचार भाजपतर्फे होतो आहे. त्यामुळे सुप्रिया सदानंद सुळे विरोधात हेमामालिनी किंवा स्मृति इराणी अशी लढत झाल्यास बारामती देशाचे लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ ठरू शकेल!
‘..आम्हालाच गाडा’
राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्यामुळे आपले मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याचे काँग्रेस कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहे. मात्र, ‘जाणकार’ नेते सगळं कळत असूनही वळत नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे खरे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहेत. पुणे जिल्ह्य़ातील चारपैकी तीन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेल्याने अस्वस्थ झालेले काही काँग्रेस नगरसेवक पत्रकारांशी बोलताना आपली भावना व्यक्त करीत होते. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची वाट लावण्याचे काम फक्त राष्ट्रवादीच करणार असल्याचा मुद्दा ते पटवून देत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पािठबा दिला जातो. ते आमदार होतात, खासदार होतात. मात्र, या ताकदीचा वापर ते काँग्रेसच्या विरोधातच वापरतात. काँग्रेस उमेदवारांची पाडापाडी हाच राष्ट्रवादीचा खरा अजेंडा आहे. पुणे पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात सगळे एकत्र आले. पुणे पॅटर्न हा खऱ्या अर्थाने बारामतीचा पॅटर्न होता. तो वापरुन काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. िपपरी पालिकेत तर काँग्रेसचे उमेदवार ‘चुन चुन के’ पाडण्यात आले. कारण, भाजप-शिवसेनेकडून त्यांना धोका नव्हताच. जर, स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेसची वाट लावण्यात येत असेल, राष्ट्रवादीशी युती नुकसानकारक ठरणार असेल, जिल्ह्य़ातून हाताचा पंजा गायब होण्याचा धोका असेल तर राष्ट्रवादीशी युती करण्याचा अट्टाहास कशासाठी? आमदार, खासदार करुन आम्हाला पाडण्यासाठी की मातीत गाडण्यासाठी त्यांना मदत करायची, अशी आमची भावना वपर्यंत पोहोचवा, असे साकडेही त्यांनी पत्रकारांना घातले.