Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नियमित वेतनश्रेणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
खडकी, ११ मार्च / वार्ताहर

 

१८० दिवस सेवाकाळ पूर्ण केलेल्या कामगारांना त्वरित नियमित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या’ (एसटी) दापोडी येथील विभागीय कार्यशाळेतील एसटी कामगार संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले.
एसटी कामगार संघटनेचे उदय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी साडेबारा वाजता विभागीय कार्यशाळेच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने केली. या वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेत मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी केली. दापोडी विभागीय कार्यशाळेतील सुमारे ५६ कामगारांना मागील अनेक वषार्ंपासून १८० दिवसांचा सेवा काळ पूर्ण केल्यानंतरही अद्याप नियमित सेवेत सामावून घेतले गेले नाही. न्यायालयाने या संदर्भात एसटी महामंडळास १८० दिवस सेवाकाळ पूर्ण केलेल्या कामगारांना त्वरित सामावून घेण्याचे आदेश बजावले होते. मात्र अद्याप महामंडळाने या आदेशाची पूर्तता न केल्याने एसटी कामगार संघटनेला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागला असल्याचे संघटनेचे जाधव यांनी या वेळी सांगितले.
यवतमाळ, अमरावती, अकोला, परभणी आदी विभागीय कार्यशाळेतील अशा कामगारांना नियमित वेतनश्रेणी लागू केली आहे. मात्र पुणे शहरातील विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना ही वेतनश्रेणी अद्याप का लागू केली नाही, असा प्रतिप्रश्न एसटी कामगार संघटनेने उपस्थित केला आहे. दापोडी विभागातील एकूण ५६ कर्मचारी या नियमित वेतनश्रेणीपासून वंचित असून त्यांना त्वरित ही वेतनश्रेणी लागू करावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.