Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘आडकर यांनी कलावंतांना व्यासपीठ दिले’
पुणे, ११ मार्च/ प्रतिनिधी

 

सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत आणि समाजात विधायक काम करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम प्रमोद आडकर यांनी केले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहंदळे यांनी आज व्यक्त केले.
नाटय़-चित्र-कला अकादमीतर्फे देण्यात येणारा २००९ चा ‘आदर्श संयोजक पुरस्कार’ डॉ. मेहंदळे यांच्या हस्ते प्रमोद आडकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ भास्करराव आव्हाड, नगरसेवक विलास वाडेकर, ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत तिवडे उपस्थित होते.
समाजातील विधायक काम जनतेसमोर यावे यासाठी आडकरांसारख्या संयोजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे आवश्यक आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून ती संधी आपणाला मिळाली आहे. भविष्यात आडकरांनी असेच विधायक काम आंतरराष्ट्रीय स्तरावर करावे, अशा शुभेच्छा डॉ. मेहंदळे यांनी आडकरांना दिल्या.
इतरांचे चांगले काम समाजासमोर आणून त्यांना मोठं करण्यासाठी मनाचा मोठेपणा हवा. आडकर मनाने मोठे आहेत. म्हणूनच ते आदर्श संयोजन करू शकले, असे आव्हाड म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना आडकर म्हणाले, की कामात प्रामाणिकपणा व अचूकता असेल तर संस्था चालते. सातत्याने दर्जेदार कार्यक्रम घेणे व कार्यक्रमांमध्ये वैविध्य राखणे हे संयोजकाचे कौशल्य असते. आदर्श संयोजकाने अशा चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असले पाहिजे. सर्व सृष्टीचा निर्माता परमेश्वर हाच सर्वात श्रेष्ठ संयोजक आहे. अस्तित्वात असलेल्या जीवसृष्टीचे संयोजन करण्याचे काम परमेश्वर करत असतो, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, प्रतिभा शाहू मोडक, श्रीनिवास भणगे, उज्ज्वला कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत तिवडे यांनी केले. जयराम मोरे यांनी आभार मानले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.