Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पशुचिकित्सा व्यावसायिकाचे आंदोलन आचारसंहितेमुळे स्थगित
पुणे, ११ मार्च/ प्रतिनिधी

 

राज्य पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेतर्फे १ मार्चपासून सुरू करण्यात आलेले ‘कायद्याप्रमाणे काम व अहवाल बंद’ आंदोलन निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
संघटनेचे सरचिटणीस डॉ. नारायण जोशी यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर व आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाच्या अडचणी लक्षात घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय अहमदनगर येथे झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. मात्र, पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध मागण्या मान्य होईपर्यंत शासनाकडे टप्प्याटप्प्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यानुसार २० एप्रिल रोजी तहसील पातळीवर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर २० मे पशुसंवर्धन दिनादिवशी राज्यातील जिल्हा व तालुका निहाय मागण्यांच्या पूर्ततेसंबंधी शासनाला आवाहन करण्यात येईल. १० जूनपर्यंत पशुवैद्यकीय व्यावसायिकांना आर्थिक न्याय व व्यावसायिक संरक्षण न मिळाल्यास १५ जूनपासून पुन्हा कायद्याप्रमाणे काम व अहवाल बंद आंदोलन सुरू केले जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस व गैरसोयीला शासन जबाबदार असेल, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.