Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

धरणांतील प्रवासी बोटींच्या शुल्कात दरवाढ करण्याचा प्रस्ताव
पर्यटनासाठीही बोट देणार
पुणे, ११ मार्च / खास प्रतिनिधी

 

धरणातील प्रवासी बोटींच्या शुल्कात दुपटीहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तयार केला असून या बोटी पर्यटनासाठीही देण्याचा विचार आहे. गेली दोन वर्षे या बोटी तोटय़ात असल्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
जिल्ह्य़ातील मुळशी, पवना, पानशेत व चासकमान या धरणांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने प्रवासी बोटी चालविल्या जातात. या बोटीसाठी कमीत कमी एक रुपया ते अधिकाधिक दहा रुपये शुल्क आकारले जाते. धरणांच्या शेपटाकडील जलाशयाच्या भागात असलेल्या गावांसाठी ही बोटींची सोय करण्यात आली आहे. यातील काही गावांमध्ये रस्ते नाहीत. त्यामुळे बोटींशिवाय प्रवास करण्याचा अन्य मार्ग त्यांच्यासमोर नाही. उत्पन्नाची अल्पसाधने असल्याने त्यांना कमी दरात ही सेवा पुरविली जाते.
गेल्या दोन वर्षांत इंधनाचे वाढलेले दर तसेच देखभाल दुरूस्तीवर ६ लाख ८ हजार रुपये इतका खर्च झाला आहे. प्रवासी वाहतूक व अन्य माध्यमातून ४ लाख २ हजारांचे उत्पन्न जिल्हा परिषदेला मिळाले आहे. या तोटय़ामुळे बोटी सक्षमपणे चालविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आता बोटीतील प्रवासासाठी कमीत कमी पाच रुपये तर जास्तीत जास्त वीस रुपये आकारणी करण्याचा प्रस्ताव आहे. ही दरवाढ झाल्यास प्रवासी बोटी नफ्यात चालविणे शक्य होणार आहे.
मुळशीमधील प्रवासी बोटीचा तोटा ८१ हजार, पवना धरणातील बोटीचा तोटा ५९ हजार, पानशेतचा तोटा २७ हजार आणि चासकमानच्या बोटीचा तोटा २९ हजार आहे. हा तोटा गतवर्षीचा आहे. त्यापूर्वीही या चारही बोटींचा तोटा दीड लाखांच्या घरात आहे. हा तोटा कमी करण्यासाठी व्यापारी तत्त्वावर बोटी भाडय़ाने देण्याचाही जिल्हा परिषदेचा विचार आहे. धरणांवर पर्यटनासाठी पर्यटक येतात. प्रत्येक धरणात जलक्रीडेची सोय नाही. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. पर्यटकांनी धरणात प्रवास करण्याची इच्छा प्रदर्शित केल्यास एका फेरीला दीडशे रुपये आकारणी करून बोटी पर्यटनासाठी खुल्या कराव्यात असाही प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास जिल्हा परिषदेला दरवर्षी साधारणत: साडेनऊ लाख रुपये नफा होईल असा अंदाज आहे.