Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मयूर कॉलनीजवळील उड्डाणपुलास विरोध
पुणे, ११ मार्च/ प्रतिनिधी

 

कर्वे रस्त्यावरील मयूर कॉलनीजवळचा पादचारी उड्डाणपूल न बांधता ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिलांना सोयीस्कर ठरेल असा पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात यावा, अशी मागणी राजश्री परमार मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
विविध सामाजिक संघटनांकडून या पादचारी उड्डाणपुलास मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. कारण अठरा पायऱ्या वर चढणे व उतरण्याची पादचाऱ्यांची मानसिकता नसते. तसेच त्यामुळे स्त्रिया, वयोवृद्ध नागरिक यांना हृदयविकार, गुडघे दुखणे यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. म्हणून नागरिकांकडून अशा पुलाचा जास्त वापर होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उड्डाणपुल काढून टाकलेला आहे. सारसबाग, एसएनडीटी या ठिकाणच्या पुलाचाही वापर होत नसल्याचे दिसून आले आहे.
मृत्युंजय देवळाजवळच्या मयूर कॉलनी जंक्शननंतर पादचारी भुयारी मार्ग बांधण्यात आल्यास पादचाऱ्यांकडून त्याचा उपयोग तर होईल, तसेच भुयारी मार्गाच्या आतल्या भागाचा व्यावसायिकांना वापर करता येईल व त्यापासून महापालिकेस उत्पन्न प्राप्त होईल.
कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असे पूल न बांधता ज्या ज्या ठिकाणी मार्ग आवश्यक आहे, त्या त्या ठिकाणी भुयारी पादचारी मार्ग बांधणेच आवश्यक आहे. दरम्यान मयूर सोसायटी चौकात पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी झेब्रा क्रॉसिंग, पादचारी सिग्नल बसवण्याची मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त चांदमल परमार यांनी केली आहे.