Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

प्रेयसीचा खून करणाऱ्या दोघांना सहा दिवस कोठडी
पुणे, ११ मार्च / प्रतिनिधी

 

लग्नाचा आग्रह धरणाऱ्या प्रेयसीचा खून करणाऱ्या दोघांना सहा दिवस (दि. १६ मार्चपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रंजना जाधव यांनी हे आदेश दिले.
प्रीती प्रकाश पवार (वय २२, रा. नवी पेठ) या तरुणीचा खून केल्याच्या आरोपावरून गुन्हे अन्वेषण शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने कंत्राटदार विनायक तुकाराम भालेराव (वय ३५, रा. सुमुख सोसायटी, शिवाजीनगर) व त्याचा साथीदार हेमंत रघुनाथ गांधी (वय ३०, रा. औंध) या दोघांना नुकतीच अटक केली होती. कृष्णा केशव संताजी (वय ४९, रा. बेळगाव) यांनी याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक सरकारी वकील आर. आर. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. गुन्ह्य़ासाठी वापरण्यात आलेली मोटार पोलिसांनी जप्त केली असून खुनाच्या दिवशी तरुणीने घातलेले कपडे आणि खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. अ‍ॅड गिरीश कुलकर्णी व किरीटकुमार गुजर यांनी भालेराव व गांधी यांची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.