Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मेहतर वाल्मीकी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे’
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी

 

राज्य शासनाने मेहतर वाल्मीकी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेत प्रतिनिधित्व मिळावे आणि समाजावरील सफाई कामगारांचा शिक्का पुसून टाकण्यासाठी शिक्षण व नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे, अशा विविध मागण्या अखिल भारतीय मेहतर वाल्मीकी महासंघाचे अध्यक्ष शशी म्हेत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या.
समाजाच्या मागण्या मान्य करून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या पक्षालाच महासंघाचा पाठिंबा असेल, असे सांगून म्हेत्रे म्हणाले की, राज्यात चाळीस लाख व शहरात दोन लाख लोकसंख्या असलेल्या वाल्मीकी मेहतर समाजाला आजपर्यंत सर्वच क्षेत्रांत डावलण्यात आले आहे. त्यामुळे समाजाचा विकास झाला नाही. समाजाची ताकद दाखविण्यासाठी १३ मार्च रोजी मेहतर वाल्मीकी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शंकरशेठ रस्त्यावरील गोळीबार मैदानावर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे अधिवेशन होणार असून, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, तसेच मध्य प्रदेश येथील वाल्मीकी धामचे संत श्री बालयोगी उमेशनाथजी महाराज अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील. राज्यातून मोठय़ा प्रमाणावर समाजबांधव अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत, असे म्हेत्रे म्हणाले. या वेळी माजी नगरसेवक धनराज बिर्दा, भिकाचंद नेमजादे, दीपक उमंदो, शैलेश जाधव उपस्थित होते.