Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रस्त्यावरील कचऱ्याची होळी
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी

 

साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर व शिवमहोत्सव समितीतर्फे होळी निमित्त होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी होळीमध्ये लाकूड जाळण्याऐवजी रस्त्यावर पडलेली लॉटरीची तिकिटे, रिकाम्या गुटक्याच्या पुडय़ा या सारखा कचरा जाळून अभिनव पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला.
होळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी अर्पण केली जाते. मात्र त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अन्नाचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी मंडळातर्फे महापालिका उद्यानातील कामगार, अग्निशामक दलाचे जवान यांना पुरणपोळीचे जेवण देऊन अन्नदान करण्यात आले. नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून मंडळातर्फे या अभिनव पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन व परिसर स्वच्छ राखण्यास मदत होते. गतवर्षी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या हस्ते आपटय़ाची झाडे लावण्यात आली. त्या झाडांचा वाढदिवस अग्निशमन दलाच्या बंबातून पाणी देऊन साजरा करण्यात आला. लहान मुलांनी आपटय़ाच्या झाडांखाली केक कापला आणि हलगी वाजवून झाडांचा वाढदिवस साजरा केला.