Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मंचरमधील डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करण्याची मागणी
मंचर, ११ मार्च/ वार्ताहर

 

मंचर ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज चांगले चालू आहे. तेथे येणाऱ्या रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णाकडे व्यक्तीश लक्ष देण्यात अडचणी येतात. राज्य सरकारने त्वरित निवासस्थानाची सोय करावी, अशी मागणी मंचरसह परिसरातील दहा गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
मंचर येथे ४-५ वर्षांपासून सुरु असलेले सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय पुणे-नाशिक रस्त्यालगतच आहे. येथे उपचार घेण्यासाठी खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या परिसरातून आलेल्या सर्व गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णालयात उपलब्ध सुविधेमध्येही सुधारणा होत आहे.
शासनाच्या निकषानुसार प्रथम वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान व नंतर रुग्णालय उभारणी केली जाते. परंतु मंचर ग्रामीण रुग्णालयात निवासाची व्यवस्थाच नसल्या कारणाने अपघातग्रस्त व सर्वसाधारण रुग्णांना उपचार करताना कर्मचारी वर्गाला कसरत करावी लागत आहे.
रुग्णालयामार्फत प्रसूतिसेवा, कुटुंबकल्याण कार्यक्रम, लसीकरण, लहान-मोठय़ा शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हार्निया, छोटय़ा-मोठय़ा गाठी काढणे, अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीची सेवा, सर्पदंश, औषधप्राशन केलेल्या रुग्णांवर उपचार, साथीचे रोग, क्षयरोग, मोतिबिंदू व एड्स रुग्णांवर उपचार केले जातात.
वैद्यकीय अधिकारी यांची ग्रामीण रुग्णालयात निवासाची सोय नसल्यामुळे अधिकारी इतरत्र निवासी थांबून रुग्णांवर उपचार करत आहेत. रुग्णालय हे पुणे-नाशिक रस्त्यावर असल्यामुळे रुग्ण मोठय़ा प्रमाणात असतात व अपघातात जखमी रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासस्थान असणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्य़ात प्रथम क्रमांकाची उपचारपद्धती, सर्व गरजूंवर उपचार करणारे रुग्णालय, अशी मंचर ग्रामीण रुग्णालयाची ओळख आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासस्थानाची सोय नसल्यामुळे वैद्यकीय उपचार करताना अडचणी येत आहेत.