Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आंबेगावात कांदा लागवडीकडे शेतक ऱ्यांचे अधिक लक्ष
मंचर, ११ मार्च/ वार्ताहर

 

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या कांदा पिकाकडे महत्त्वाचे नगरी पीक म्हणून पाहिले जाते. म्हणूनच आंबेगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात बाजरी पिकाबरोबरच सुमारे चार हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली आहे. सध्या कांद्याला मिळत असलेला समाधानकारक बाजारभाव पाहता शेतकरी कांदापिकाची चांगल्याप्रकारे जोपासना करत असल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्ह्य़ातील उत्तर भागात, विशेषत: आंबेगाव खेड आणि जुन्नर तालुक्यात उन्हाळी कांद्याचे शेतकरी हमखास पीक घेत असतात. या वर्षीचा बाजारभावाचा अपवाद वगळता मागील तीन चार वर्षांत कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. त्यामुळे कांदा पीक घेण्याऐवजी शेतकऱ्यांनी इतर पिके घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. यावर्षी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांद्याला सुरुवातीपासूनच चांगला बाजारभाव मिळाला. परंतु शेतक ऱ्यांचा एक दुर्गुण प्रकर्षांने जाणवला. केवळ कांद्याला चांगला बाजार भाव मिळतो म्हणून अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी परिपूर्ण कांद्याची वाढ न होऊ देताच कांद्याची काढणी करून तो विक्रीसाठी बाजारात आणला.
दरम्यान गेल्या आठवडाभरात कांद्याचे प्रतिक्विंटल ८० ते १०० रुपये बाजारभाव असलेले बाजारभाव मागणी कमी आणि पुरवठा जास्त प्रमाणात झाल्याने अचानकपणे ६० ते ८० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल घसरले आहे, असे असले तरी उन्हाळी कांदा लागवडीला दोन-सव्वा दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. कांदा काढणीला महिनाभराचा कालखंड बाकी आहे. यावर्षी कांदापिकाचे बाजारभाव कमी होणार नाहीत, याची शेतकरी वर्गालाही पूर्ण खात्री झाली असावी. म्हणूनच की काय उन्हाळी हंगामातील कांदा पिकाकडे शेतकरी चांगल्याप्रकारची जोपासना करू लागले आहे. इतर पालेभाज्यांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असतानाच कांदापिकाने मात्र साथ दिली. त्यामुळे अनेकांनी इतर सर्व पिकांकडे दुर्लक्ष करून कांदा उत्पादनात कशी वाढ होईल याकडेच अधिक लक्ष दिल्याचे मंचरचे कांदा उत्पादक शेतकरी बाबुराव (भक्ते) थोरात यांनी सांगितले.
एकूणच तालुक्यात उन्हाळी कांदा पिकाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी कांदापिकाची जोपासना करण्याकडे अधिक कल दिला आहे. कांद्याला चांगला बाजारभाव मिळून आर्थिक चणचण दूर होईल.