Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘दोषी अधिकारी व सल्लागारांना पाठीशी घालू नका’
नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, ११ मार्च / प्रतिनिधी

 

पिपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामात घोळ घालणारे अधिकारी, कंत्राटदार आणि सल्लागारांना पाठिशी घालू नका, अशी मागणी झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह समिती सदस्यांनी आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे केली आहे.
झोपडपट्टी सुधार समितीच्या सदस्यांनी पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यानंतर, या कामाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत प्रकल्पातील त्रुटींची पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल सदस्यांपासून दडवून ठेवण्यात आला. सदस्यांनी मागणी केल्यानंतर तो कार्यकारी अभियंता मदनमोहन सावळे यांनी बैठकीत वाचून दाखविला. त्यामध्ये काही त्रुटी आहेत, असे सोनकांबळे यांनी आयुक्त शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सोनकांबळे यांच्यासह उत्तम हिरवे, तानाजी खाडे, बाळासाहेब भुंबे, रामआधार धारिया यांनी आयुक्तांची समक्ष भेट घेऊन पुनर्वसन प्रकल्पातील दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तेव्हा या प्रकरणी संबंधितांना नोटिसा देऊ, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने समितीच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.