Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी १७ मार्चला विधानसभेवर मोर्चा’
भोर, ११ मार्च/ वार्ताहर

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व गिरणी कामगार प्रलंबित मागण्यांसाठी आपल्या कुटुंबासह येत्या १७ मार्च रोजी मुंबई विधानसभेवर भव्य मोर्चा नेणार असल्याची माहिती गिरणी कामगार संयुक्त कृती समितीचे सचिव विठ्ठल कारंजे यांनी दिली.
त्यादृष्टीने पुणे जिल्ह्य़ातील भोर, वेल्हे, पुरंदर, हवेली, मुळशी व खंडाळा तालुक्यातील गिरणी कामगारांचे मेळावे घेऊन मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
शासनाच्या धोरणामुळे बळी पडलेल्या सर्व गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागेत विनामूल्य घरे मिळावीत, गिरण्यांच्या जागेमध्ये सध्या उभ्या राहिलेल्या व भविष्यात उभ्या राहणाऱ्या उद्योग- व्यवसायामध्ये गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना रोजगार द्यावा, अद्याप प्रलंबित असलेली थकीत देणी कामगारांना त्वरित द्यावीत, बंद पडलेल्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या गिरणीतील सर्व कामगारांना पिवळ्या शिधापत्रिका देऊन त्यावरील धान्याचा लाभ द्यावा, राज्य विमा योजनेचा लाभ या कामगारांना द्यावा, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्या या कामगारांच्या आहेत.
या मागण्यांसाठी राज्यातील कामगारांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक तालुक्यामध्ये आमदारांच्या निवासस्थानी जाऊन मागण्यांची निवेदने दिली होती. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्य़ांतून गिरणी कामगार सध्या तीव्र लढा देत आहेत.
हिवाळी अधिवेशनात मोर्चा नेल्यानंतर ५५ हजार गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा केली. मात्र अजून अडीच लाख कामगारांना मोफत घरे, रोजगार, थकीत देणी मिळेपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच कुटुंबीयांसमवेत कामगारांनी १७ रोजी हा मोर्चा नेण्याचे ठरविले असल्याचे करंजे यांनी सांगितले.