Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आंबेगाव तालुक्यात यंदा गव्हाच्या उत्पादनात घट
मंचर, ११ मार्च/वार्ताहर

 

आंबेगाव तालुक्यात चालू वर्षी गेल्या काही वर्षांत गव्हाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले. रब्बी हंगामात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली. सद्यस्थितीत बुहतांशी शेतकऱ्यांची गहू काढण्याची लगबग चालू आहे. परंतु यावेळी रब्बी हंगामातील पिकांवर झालेल्या खराब हवामान आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावाचा फटका गहू पिकाला बसल्याने गहू उत्पादनात घट आल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
तालुक्याला वरदान ठरलेल्या डिंभे धरणाच्या पाण्याचा फायदा शेती सिंचनासाठी झाल्याने गेल्या दहा वर्षांत येथील कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आल्या. बारामाही शेतीला पाणी मिळू लागल्याने शेतकरी शेतात अनेक विविध प्रकारची पिके घेत आहे. विशेषत: गेल्या दहा - बारा वर्षांची शेतपिकांची परिस्थिती पाहिली तर खरीप हंगामात बहुतांशी शेतकरी बाजरीचे पीक घेतच नाही. परंतु रब्बी हंगामात गहू आणि उन्हाळ्यात बाजरीचे पीक घेतले जात आहे.
एकूणच ऋतूमानानुसार पिके घेतली जात नसून पाण्याच्या उपलब्धतेनुसारच आता शेतात पिके घेतली जातात. चालू वर्षी खरीप हंगाम वेळेवर पाऊस न पडल्याने वाया गेल्याने रब्बी हंगामात अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी शेतात गव्हाचे पीक घेण्यालाच शेतकऱ्यांनी अग्रक्रमाने प्राधान्य दिले. सातगाव पठार भागासह पूर्व भागातही पोंदेवाडी, लोणी, लाखणगाव, काठापूर, जारकरवाडी, अवसरी, पारगाव, रांजणी, शिंगवे, पारगाव या गावांसह तालुक्यात रब्बी हंगामात गहू पिकाची तीन हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. वास्तविक पाहता पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी गहू पीक घेणे पसंत केले. परंतु यंदा - हवामानाच्या सततच्या बदलाचा परिणाम सर्व शेतपिकांवर दिसून आला. माव्याचा प्रादुर्भाव, चिकटा रोग यामुळे गव्हाचे उत्पादन शेतकऱ्यांनी केलेल्या अपेक्षापेक्षा कितीतरीपट घटले आहे. एकरी साधारणत: गव्हाचे १५ ते १८ क्विंटल उत्पादन सरासरी मिळतेच. परंतु यंदाची परिस्थिती पाहिली तर एकरी केवळ ८ ते १० क्विंटल इतके कमी गव्हाचे उत्पादन निघत आहे. शेतकऱ्यांचे गहू उत्पादनाचे सर्वच अंदाज फोल ठरल्याने पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे कमी पीक उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक किशोर विभूते यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यात पंजाब राज्यातील हार्वेस्टर यंत्रे दाखल झाली असून या हार्वेस्टर यंत्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांनी गहू काढणीला प्राधान्य दिले आहे. एक एकर गहू केवळ १० ते १५ मिनिटात काढून होत असून एकरी १२०० रुपये यंत्रल गहू काढणीसाठी भाडे द्यावे लागत आहे. दरम्यान कमी झालेली थंडी त्याचबरोबर मावा, तांबेरा आणि खराब हवामान या बाबींमुळे गव्हाचे उत्पादन कमी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळ - जवळ सात ते आठ क्विंटल एकरी उत्पादन कमी घटल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे.
गतवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील गव्हाच्या किमान आधारभूत किमतीमुळे शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात गव्हाची पेरणी केली. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी संकरित बियाणे खरेदी करण्यावर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे प्रगत शेतकरी रामदास बाळकृष्ण जाधव आणि शशिकांत थोरात यांनी सदर ‘प्रतिनिधी’ शी बोलताना सांगितले.
साहजिकच गहू पिकाचा एकरी खर्चदेखील वाढला. मात्र हवामानात बदल झाल्याने प्रारंभीच गव्हाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. गव्हाच्या ओंबीत जास्त प्रमाणात दाण्याचा भरणा झालाच नाही. गहू बियाणे निवडीपासून ते काढणीपर्यंत एकरी आठ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना आला आहे. परंतु आता मिळणाऱ्या उत्पादनातून केलेला भांडवली खर्चही भागेल की नाही या विवंचनेत शेतकरी आहेत.