Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पंचायत समितीकडून निकृष्ट बियाणांचा पुरवठा
शिरूर, ११ मार्च/वार्ताहर

 

शिरूर पंचायत समितीकडून देण्यात आलेले गव्हाचे बियाणे निकृष्ट निघाल्याबद्दल नांगरगाव, ता. शिरूर येथील नंदकुमार पांडुरंग शेलार व हेमंत नंदकुमार शेलार यांनी पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे.
नंदकुमार शेलार यांची नांगरगाव येथे शेती आहे. शेलार यांनी शिरूर पंचायत समितीतून ८ नोव्हेबर रोजी ४९६ जातीच्या बियाणाच्या गव्हाच्या ८ पिशव्या घेतल्या. आपल्या शेतात गव्हाचे पीक घेतले, मात्र या बियाणापासून २५ टक्के गहू उगवला व ७५ टक्के सातू उगवला, अशी तक्रार शेलार यांनी पंचायत समितीकडे केली आहे. शेलार यांनी ७ ते ८ एकरावर गव्हाचे पीक घेतले होते. निकृष्ट बियाणांमुळे आपले एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
दरम्यान शेलार यांनी तत्कार दिल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी एस. एस. देवकाते, मोहीम अधिकारी डी. एस. वाघोले , महाबीजचे अधिकारी रावसाहेब हिरे यांनी शेलार यांच्या शेतजमिनीवर जाऊन पिकाचा पंचनामा केला आहे.
शासनाने निकृष्ठ बियाणे देऊन शेतक ऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे शिरूर तालुका उपप्रमुख पोपटराव शेलार यांनी दिली आहे.
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाले असतील त्यांनी आपल्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या कृषी अधीक्षकांकडे लेखी स्वरूपात कराव्यात, असे आवाहन पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश टाकळकर यांनी केले आहे.