Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निर्मलग्राम मोहिमेसाठी मुळशी तालुका प्रयत्नशील
पौड, ११ मार्च / वार्ताहर

 

संपूर्ण मुळशी तालुका निर्मलग्राम करण्यासाठी आता शासकीय पातळीवर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जात असून गावपातळीवरही सरपंच, ग्रामसेवक आणि प्राथमिक शिक्षकही विविध माध्यमातून गाव शंभर टक्के निर्मलग्राम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
मुळशी तालुक्यात एकूण ९६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १९ गावे शंभर टक्के निर्मलग्राम झाली आहेत. तर उरलेली ७७ गावे येत्या महिनाभरात संपूर्ण निर्मलग्राम करण्याचा आमचा संकल्प असल्याचे गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे हे कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावागावात बैठका घेऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरीत करीत आहेत. पंचायत समितीने एक ‘गूड मॉर्निग’ पथक तयार केले असून हे पथक पहाटेच्या वेळी उघडय़ावर शौचाला बसणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ज्या घरात शौचालय बांधलेले नाही. त्या कुटुंबाला रेशनिंग धान्य, रॉकेल, नवीन रेशनिंग कार्ड देणे बंद केले आहे. महसूल विभागाकडूनही घरात शौचालय नसलेल्या व्यक्तीला सातबारा उतारा, आठ अ, उत्पन्नाचा तसेच जातीचा दाखला दिला जात नाही. त्याचप्रमाणे सोसायटीकडूनही पीक कर्ज तसेच इतर योजनांपासून त्यांना वगळण्यात येत आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मार्फत मिळणारे दाखले, शिफारशी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आता शौचालय बांधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नाला लागले आहेत. परंतू त्यामानाने पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यात मात्र गाव निर्मलग्राम करण्याच्या संदर्भात अनास्था दिसून येत आहे.