Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

आयात उमेदवार कोण?..
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच शरद पवार यांचा बालेकिल्ला असल्याचे त्यांच्या कट्टर विरोधकांनाही मान्य करावे लागते. आता तर पवार घराण्यातील पहिली महिला म्हणजे शरद पवारकन्या सुप्रिया सुळे निवडणूक लढविणार असल्याने त्यांना मताधिक्य किती मिळणार, याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना निवडणूक कुणी लढवायची, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. पवार यांच्या विरोधात विजयी होण्यापेक्षा किमान मते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न विरोधक करतात.

सभा, मेळावे आणि फेऱ्या
मुकुंद संगोराम

लोकसभा निवडणूक आता सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार अजून ठरायचे असले तरी येत्या काही दिवसांतच पुण्यातील वातावरण एकदम तप्त झालेले दिसेल. सगळे रस्ते आणि त्यावरील सर्व खांबांना कुणा ना कुणा उमेदवाराची छबी लटकलेली दिसेल. बहुतेक सर्व वाहतूक सिग्नल आता अशा प्रचारी फलकांमागे लपून जातील. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मिळेल तिथे आणि मिळेल तसे फलक लावण्याचे आदेश दिले जातील आणि त्याची तामिली नीट होते आहे की नाही, याचीही तपासणी होईल. देशातले आणि बडेबडे नेते आता प्रचाराची राळ उडवण्यासाठी पुण्यनगरीत येतील.

भाजपचा उमेदवार निश्चित नसतानाच मोदींची सभा!
पुणे, ११ मार्च / खास प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची येत्या रविवारी (१५ मार्च) पुण्यात जाहीर सभा होणार असून, तोपर्यंत तरी भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील उमेदवार जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पक्षाची प्रचाराला सुरुवात झाली तरी उमेदवारच निश्चित नसल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोदी यांना महाराष्ट्राचे प्रभारी नेमले आहे.

विद्यापीठाकडून आता शासनाचे नियमही धाब्यावर
भरती प्रक्रियेतील उमेदवाराची तक्रार
पुणे, ११ मार्च/खास प्रतिनिधी
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये शासननिर्णयाद्वारे लागू करण्यात आलेली नियमावली पुणे विद्यापीठाने धाब्यावर बसविली आहे, अशी तक्रार या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या स्थानावर राहिलेल्या एका उमेदवाराने केली आहे. त्यामुळेच गुणवाढ गैरव्यवहारापाठोपाठ विद्यापीठाच्या पदभरतीमधील नवीन घोटाळा प्रकाशात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही तक्रार शासनमान्य अधिकृत पदासाठी करण्यात आली असल्याने तिला महत्त्व प्राप्त होत आहे.

संचेती रुग्णालयासमोर चक्राकार वाहतुकीचा प्रस्ताव
पुणे, ११ मार्च / प्रतिनिधी

गणेशखिंड रस्त्यावरील भाऊसाहेब खुडे चौक (वेधशाळा चौक), नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संचेती रुग्णालय चौक) व स.गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) येथे चक्राकार वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेच्या विचाराधीन आहे. चक्राकार योजनेमुळे वाहतुकीचा वेग वाढून परिणामी कोंडी व प्रवासाचा वेळ कमी होणार असून, परिणामी शिवाजीनगर भागामध्ये प्रस्तावित दोन उड्डाण पूल बांधण्याची गरजच उरणार नाही, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे.

उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाविरुद्ध चिंचवडमध्ये संतप्त व्यापाऱ्यांचे आंदोलन
पिंपरी, ११मार्च / प्रतिनिधी

चिंचवड चापेकर चौकातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच या अरुंद रस्त्यावरून जड वाहनांना बंदी सक्तीची करावी, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आज जोरदार आंदोलन केले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवडगाव येथील चापेकर चौकातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले.या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम गेले वर्षभर बंद पडलेले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला अवघा दहा ते बारा फुटांचाच रस्ता असल्याने एखादे जडवाहन आले, की पादचारी, दुचाकीचालक, सायकलस्वार यापैकी कोणालाही रस्त्याने जाता येत नाही.

धरणांतील प्रवासी बोटींच्या शुल्कात दरवाढ करण्याचा प्रस्ताव
पर्यटनासाठीही बोट देणार
पुणे, ११ मार्च / खास प्रतिनिधी
धरणातील प्रवासी बोटींच्या शुल्कात दुपटीहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तयार केला असून या बोटी पर्यटनासाठीही देण्याचा विचार आहे. गेली दोन वर्षे या बोटी तोटय़ात असल्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

‘दोषी अधिकारी व सल्लागारांना पाठीशी घालू नका’
नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, ११ मार्च / प्रतिनिधी
िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामात घोळ घालणारे अधिकारी, कंत्राटदार आणि सल्लागारांना पाठिशी घालू नका, अशी मागणी झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह समिती सदस्यांनी आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे केली आहे.

पाणी पुरवठा नलिकांवरील व्हॉल्व्ह संरक्षक पेटय़ांच्या अभावी खराब
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी
संतोषनगर, कात्रज परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या नलिकांवरील सुमारे ६५ वॉल्व्हना संरक्षक पेटय़ा नसल्याने त्या मोठय़ा प्रमाणावर खराब होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याची तक्रार संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कपिले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या भागात होणारा पाणी पुरवठा अवेळी आणि अपुरा असतो. त्यातच नलिका फुटतात वॉल्व्ह खराब होतात. यामुळे रोज पाण्याचा अपव्यय होतो व होणाऱ्या या गळतीमुळे पाण्याचा दाब कमी होतो. यामुळे डोंगर परिसरातील नागरिकांना पाणी मिळत नाही. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता फक्त आश्वासने मिळतात मात्र कृती काहीच होत नाही अशी खंत कपिले यांनी व्यक्त केली.

नियमांचा भंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई
पुणे, ११ मार्च / प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या रिक्षापरवानातील अटी व नियमांचा भंग करणाऱ्या ४६९ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. परवाना रद्द करण्यात आलेल्या आणि वापरण्यायोग्य नसलेल्या सहा रिक्षा या वेळी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील सातारा रस्ता व लष्कर भागात तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या आठवडाभरात ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे (नियोजन) पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, ‘‘प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) प्रस्तावानुसार ही मोहीम आखण्यात आली होती. मोहिमेंतर्गत कागदपत्रे तसेच रिक्षापरवानामधील (परमिट) अटी व नियमांचा भंग करणाऱ्या ४६९ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्यापैकी २३५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ’’

वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या
हडपसर, ११ मार्च/ वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नोव्हेंबर २००८ मध्ये घेण्यात आलेल्या वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (टंकलेखन व लघुलेखन) निकाल शुक्रवारी दि. १३ मार्च २००९ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केला जाईल, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश परब यांनी सांगितले. या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र, गुणपत्रके संबंधित टंकलेखन संस्थाचालकांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग (माध्यमिक)मध्ये सकाळी ११ वाजता येऊन घेऊन जावीत, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सावित्रीबाई फुले यांना विविध संघटनांतर्फे अभिवादन
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ११२व्या पुण्यतिथी निमित्त शहरातील विविध संघटनांतर्फे फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित अभिवादन सभेत डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे आज समाजात स्त्रियांचा दर्जा वाढला आहे. सर्व क्षेत्रात स्त्रियांनी यश प्राप्त केले आहे, असे डॉ. आढाव म्हणाले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अरविंद जमदाडे, मंगला कांबळे, राजू वाटोळे, युवराज भुजबळ, शिवराज जांभूळकर, जयवंत रासकर, रघुनाथ ढोक उपस्थित होते.

सुरेश भट स्मृती पुरस्कार सुधाकर कदम यांना
पुणे, ११ मार्च / विशेष प्रतिनिधी
बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा गझलसम्राट सुरेश भट स्मृती पुरस्कार यंदा गझल गायक सुधाकर कदम यांना जाहीर झाला आहे. येत्या १५ मार्चला भरत नाटय़ मंदिरमध्ये आयोजित गझल गायन कार्यक्रमात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस सुरेश वैराळकर यांनी आज पत्रकारांना दिली. ज्येष्ठ गझलतज्ज्ञ व सुरेश भट यांचे स्नेही डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या निवड समितीने या पुरस्कारासाठी कदम यांची निवड केली आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. १५ मार्चला होणाऱ्या गझल गायन कार्यक्रमात गझलकार ईलाही जमादार, म. भा. चव्हाण, दिलीप पांढरपट्टे, रमण रणदिवे, दीपक करंदीकर, संदीप माळवी, अप्पा ठाकूर, वैभव जोशी आणि चित्तरंजन सुरेश भट हे गझल मुशायरा सादर करणार आहेत. या वेळी सुधाकर कदम व भैरवी कदम हेही निवडक गझलांचे गायन करणार आहेत.

‘बीआरटी योजना त्वरित बंद करावी’
पुणे, ११ मार्च/ प्रतिनिधी
बीआरटी योजनेमुळे सातारा रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने बीआरटी योजना त्वरित बंद करावी, अशी मागणी भारतीय संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सातारा रस्त्यावरील नव्वद टक्के लोकांचा या योजनेला विरोध आहे. नागरिकांचा पैसा वाया घालविण्याचे काम महापालिका करीत आहे. त्यामुळे हीयोजना एक महिन्याच्या आत बंद केली जावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाकूर यांनी दिला.

नवले महाविद्यालयामध्ये ‘महिला दिन’ साजरा
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी
श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामुदायिक वैद्यकीयशास्त्र विभागातर्फे ‘तांदळा एक मुखवटा’ हा चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट स्त्रीत्वाची जाणीव करून देणारा व महिला सबलीकरण दर्शविणारा असून, प्रसिद्ध दिग्दर्शक संजय सूरकर यांनी दिग्दर्शित केला आहे. गोवा चित्रपट महोत्सवातर्फे या चित्रपटाचे कौतुक झाले, तर झी गौरव पुरस्कारासाठी नामांकन झाले. चित्रपटाच्या निर्मात्या स्वत: माधुरी आशिरगडे, अभिनेत्री अश्विनी जोगळेकर व दै. ‘लोकसत्ता’च्या उपसंपादिका अमृता करकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

नववधूवरांसाठी १४ ला नावनोंदणी कार्यक्रम
पुणे,११ मार्च/ प्रतिनिधी

मंगल बंधन वधूवर सूचक केंद्रातर्फे घटस्फोटित, विधुर व नववधूवरांसाठी येत्या शनिवारी (१४ मार्च) नावनोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील निवारा सभागृहामध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.तरी इच्छुक घटस्फोटित,विधुर व नववधूवरांनी नावनोंदणीसाठी त्वरित संपर्क साधावा.असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.संपर्क-९७६६९३३७०८,९७६६१६५५२३,९८२२१९१३२१.

मुशर्रफ यांचा निषेध
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी
परवेझ मुशर्रफ यांनी भारतीय लोकशाही प्रणालीत हस्तक्षेप करण्यापेक्षा पाकिस्तान गिळंकृत करणाऱ्या तालिबानी संघटनांवर आळा घालावा, अशा शब्दात राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. काश्मीर हा देशाचा आत्मा आहे व तेथील जनता निवडणुकीद्वारे उमेदवाराला निवडून देऊन जो विकास करते आहे तो मुशर्रफ यांच्या डोळ्यांना दिसत नसल्याचे मंचाचे प्रदेश निमंत्रक लतीफ मगदूम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

‘बेटी बचाओ’ चित्रप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद
बारामती, ११ मार्च/वार्ताहर

अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती शारदानगर संचलित शारदा महिला संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शारदानगर येथे आयोजित महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेटी बचाओ या रेणुका फाउंडेशनच्या चित्र प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद मिळाला, अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्याविषयी माहिती दिली. जिल्ह्य़ातील कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व इतर क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना सुनंदाताई पवार यांच्या हस्ते शारदा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास भारती सासवडकर, अंजली घुले, शांताबाई येवले, सौ. बारवकरताई, आशा वळसे पाटील, निर्मला सईद, डॉ. वैशाली मंदकनली, कु. सुषमा तुपे, जिजाबाई मोडक, केशरबाई भोसले, शालिनी भांडलकर, वसुधा सरदार, मेधा कुलकर्णी यांना शारदा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास १८०० महिला उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला जागृती मोहिम
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी

क्रांतिकारी महिला संघटना व स्त्री आधार केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिन व केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘महिला जागृती मोहीम’ कार्यक्रम आज संपन्न झाला. केंद्राच्या अध्यक्षा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान महिला जागृती मोहीम राबविण्यात आली. या वेळीच राज्यस्तरीय महिला प्रबोधन परिषदही घेण्यात आली होती. केंद्राच्या विश्वस्त वत्सला पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोहिमेत स्त्री भ्रूणहत्या, आपत्ती व्यवस्थापन व महिला, मानवी अनैतिक वाहतूक, प्रतिबंध आणि उपाय, व्यसनमुक्ती, स्त्री-पुरुष समानता आदी विषयांवर महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्यां व इतर महिलांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये कायदा प्रशिक्षण देण्यात आले. तसेच महिला मेळाव्याचेही आयोजन करून अभ्यासवर्ग घेण्यात आले. यावेळी वत्सला पाटील, आर. डी. शेलार, शोभा कोठारी, मंगला यावलकर, अनिता फडतरे व वर्षां वाडीकर आदी उपस्थित होते.