Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
राज्य

किडनीच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
कोल्हापूर, ११ मार्च / विशेष प्रतिनिधी

कॅन्सर आणि हृदयरोगापाठोपाठ मूत्रिपडाच्या रोगाने आजारी असणाऱ्या रुग्णांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. या रोगाबद्दल असलेले अज्ञान आणि योग्यवेळी न झालेले निदान यामुळे रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी योग्यवेळी योग्य तपासणी आणि उपचार केल्यास या रोगावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे असे मत येथील सुप्रसिद्ध मूत्रिपड विकारतज्ञ डॉ.अजित जोशी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जागतिक स्तरावर उद्या गुरुवारी १२ मार्च हा दिवस विश्व मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो आहे.

उदयनराजे राष्ट्रवादीत डेरेदाखल
दिनकर झिंब्रे
सातारा, ११ मार्च

छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले, ‘अग अग म्हशी मला कुठे नेशी’ म्हणत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डेरेदाखल झाले. प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील आबांनी राजांचा पक्षात स्वीकार केल्याचे जाहीर केले. ही वार्ता शाहुनगरीत धडकताच नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी राजमाता कल्पनाराजे यांच्यासह राजेंच्या चाहत्यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. उदयनराजेंचा खासदार होण्याचा मार्ग राष्ट्रवादी प्रवेशाने मोकळा झाल्याने बाजी मारून ते जिंकले असले तरी हरले आहेत.

लावण्यवतींची मक्तेदारी पुरुष कलाकारांनी मोडीत काढली
कळंब, ११ मार्च/वार्ताहर

कलाकार कला जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करून अंगातील सुप्त गुण समाजापुढे ठेवत असतो. सध्या स्नेहसंमेलन, महोत्सव, यात्रा महोत्सव, लावणी महोत्सव गावोगाव होत आहेत. त्यामुळे कलाकारांना बक्षिसाच्या रूपाने मानधन व कला सादर करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ मिळत आहे. सध्या स्त्रीवेषात कला सादर करण्यासाठी तरुणांची स्पर्धा लागली आहे व यामध्ये ते यशस्वी होत असून लावणीमध्ये असलेली स्त्रियांची मक्तेदारी ही तरुण कलाकार मंडळी मोडीत काढू पाहत आहे.

स्थायी समिती सभापतीपदासाठी साटेलोटे झाल्याचा आरोप
नाशिक, ११ मार्च / प्रतिनिधी

महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड आणि महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांना २७ लाख रूपये दिल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी कामगार पक्षाचे गटनेते अ‍ॅड. जे. टी. शिंदे यांनी केला असून ही रक्कम आठ दिवसात परत न मिळाल्यास मुंबई येथील शिवसेना भवन आणि नाशिकमधील शिवसेना कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये गोदा उत्सवात शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान
नाशिक, ११ मार्च / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना मानवंदना आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी येथे १४ मार्च रोजी गोदा उत्सवातंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वाच्या सोबत सी-न्यूज वृत्तवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त अहिल्यादेवी होळकर पुलाजवळील मैदानात सायंकाळी साडेसहाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिका या कार्यक्रमाची सहआयोजक आहे. वीरपत्नी कविता हेमंत करकरे यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.

इंद्रायणी एक्स्प्रेस सोलापूपर्यंत नेण्यास प्रवाशांचा तीव्र विरोध
‘मुंबई व पुणे दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांनी वेळीच सावध व्हावे’
श्रीराम पुरोहित
कर्जत, ११ मार्च

मुंबई आणि पुण्याच्या सर्व रेल्वे प्रवाशांनी वेळीच सावध होण्याची तत्परता दाखविली नाही तर मुंबई आणि पुणे या दरम्यानच्या सध्याच्या सर्वच मेल अथवा एक्स्प्रेस गाडय़ा इंद्रायणी एक्स्प्रेसप्रमाणेच नजीकच्या भविष्यात बारामती अथवा सोलापूपर्यंत पुढे नेण्यात येतील, असा इशारा कर्जत रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस आणि उपनगरी रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे माजी सदस्य विजय हरिश्चंद्रे यांनी दिला आहे.

उद्योगपती परशुराम गड्डम यांचे वृध्दापकाळाने निधन
सोलापूर, ११ मार्च/प्रतिनिधी

पूर्व भागातील के. गड्डम इंडस्ट्रिजचे चालक, प्रसिध्द उद्योगपती परशुराम भूमय्या गड्डम यांचे वृध्दापकाळाने बुधवारी दुपारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चार पुत्र, एक कन्या, नातवंडे असा परिवार आहे. गड्डम यांचा पूर्व भागातील अनेक सहकारी आणि सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता. ते १९९४-९५ मध्ये यशवंत सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष होते. याशिवाय सोलापूर र्मचट सहकारी बँक, सोलापूर जिल्हा यंत्रमाग सहकारी फेडरेशन, सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन (विव्हको) आदी संस्थांवर त्यांनी संचालक म्हणून काम केले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्वभाव-चारित्र्यावर महिलेचे सौंदर्य अवलंबून - कंगना
श्रीरामपूर, ११ मार्च/प्रतिनिधी

महिलेचे सौंदर्य तिचा स्वभाव व चारित्र्यावर अवलंबून असते, हे उद्गार आहेत प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिचे! पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात अभिनेत्री कंगणा बोलत होती. पालिकेतील पक्षप्रतोद राजश्री ससाणे, भारती फंड, सुनंदा जगधने, स्वाती देशमुख, काशिबाई डावखर, अर्चना पानसरे या वेळी उपस्थित होत्या. अभिनेत्री कंगणाच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार विजेत्या स्त्रीरोगतज्ज्ञ सरिता देशपांडे, पुष्पा पोखरकर, वर्षां जोशी, सुमन नेवासकर, महेमुदा शेख, मंथाबाई दिवे यांचा सत्कार करण्यात आला. जगात भारतीय महिलांपेक्षा कोणी सुंदर नाही. जिद्द आणि चिकाटीने महिलांनी पुढे जावे, आत्मनिर्भर व स्वायत्त बनावे. पालिका महिलांना पुरस्कार देते, गौरव करते, हे प्रेरणादायी आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून मला आनंद, तसेच प्रेरणाही मिळाली, असे कंगणाने सांगितले. कांचन गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ससाणे, डॉ. देशपांडे, सुनंदा जगधने आदींची भाषणे झाली. बुलढाण्याच्या स्वाती देशमुख यांचा एकपात्री कार्यक्रम या वेळी झाला. कार्यक्रमास महिला, तसेच तरुणींची मोठी गर्दी झाली होती.

चिपळूणमध्ये पिण्याच्या पाण्यातून कोंबडीची पिसे
चिपळूण, ११ मार्च/वार्ताहर

पिण्याच्या पाण्यातून कोंबडीचा पाय आल्याची घटना ताजी असतानाच चिपळूण शहरातील खेंड बावशेवाडी येथील नगरपालिकेच्या नव्या पराक्रमाला सामोरे जावे लागले आहे. गेले काही दिवस या परिसरात पाण्यातून कचऱ्यासह कोंबडीची पिसे येत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. खेंड पाण्याच्या टाकीमधून या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी या परिसरातील कांबळे नामक नागरिकांच्या नळातून कोंबडीचा पाय आल्याची घटना घडली होती. तेव्हाच येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणाची प्रचीती आली. याबाबत त्रस्त ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आपली तक्रार दिली होती, तसेच ती पाण्याची टाकी साफ करावी, अशी मागणी करून पाण्याची योग्य चाचपणी करावी व त्यानंतरच पाणी सोडावे असे सांगितले होते. याशिवाय लेखी तक्रारही देण्यात आली होती. मात्र या तक्रारींकडे प्रशासनाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे गेले काही दिवस या परिसरात टाकीतून येणाऱ्या पाण्यातून कचरा व कोंबडीची पिसे येण्याचे प्रकार वाढू लागले असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

आगामी हंगामात उसाची टंचाई भासणार
राधानगरी, ११ मार्च / वार्ताहर

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील १०२ कारखान्यांनी गळीत हंगाम संपवला असून या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत ३०० लाख टन उसाची टंचाई जाणवणार आहे. देशातील साखर उद्योगात महाराष्ट्राचे स्थान आघाडीचे आहे. देशातील साखर उत्पादनापैकी जवळपास एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते. गतवर्षी राज्यात १६७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. हंगामाअखेर ७६१ लाख टन उसाचे गाळप करून ९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. सरासरी साखर उतारा ११.९४ टक्के एवढा होता. मात्र या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत राज्यात तीव्र ऊसटंचाई निर्माण झाली आहे. उसाखालील घटलेले क्षेत्र व घटलेले उत्पादन यामुळे गाळपासाठी किमान दोनशे लाख टन ऊस कमी पडेल असा प्राथमिक अंदाज होता. या वर्षी केवळ १४५ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. अनेक कारखान्यांनी ऊसटंचाईमुळे अवघ्या आठ पंधरा दिवसांत हंगाम संपवला. प्रतिवर्षी १६० दिवसांचा गळीत हंगाम ठरवला जातो. मात्र यंदा हा हंगाम १०० दिवसांच्या आसपासच चालणार आहे.

प्रीतिसंगम दर्शनाची परंपरा राष्ट्रपतींकडून खंडित
कराड, ११ मार्च/वार्ताहर

तळागाळापासून राष्ट्रीय पातळीवरील नेतेमंडळी जेव्हा सातारा जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येतात तेव्हा ते कराडच्या प्रीतिसंगमावरील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन नतमस्तक होतात. ही इथली परंपरा आहे. मात्र, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कराड दौऱ्यावर आल्या असता त्यांच्याकडून ही परंपरा खंडित झाल्याची खंत कराड तालुका स्वातंत्र्यसैनिक संघटनेने राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. सन १९६२ मध्ये तत्कालीन आमदार युडामण पाटील यांच्या प्रयत्नामुळे यशवंतराव चव्हाण यांनी विश्वास दाखवून उमेदवारी दिल्यामुळे आपण राजकारणात यशस्वी पदार्पण करून आज ‘राष्ट्रपती’या देशाच्या सर्वोच्चपदावर विराजमान झाला आहात. त्यामुळे या जिल्ह्य़ात आल्यानंतर आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन कराल ही आम्हा स्वातंत्र्यसैनिक व नागरिकांची अपेक्षा होती. मात्र आमचा अपेक्षाभंग झाला असल्याच्या तीव्र भावना पत्रात व्यक्त करण्यात आल्या आहेत. या पत्रावर यशवंतराव चव्हाण यांचे भाचे, माजी आमदार व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबुराव कोतवाल यांच्यासह नेतेमंडळी व स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.