Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
क्रीडा


हॅमिल्टन, ११ मार्च / पीटीआय
सलामीवीर विरेंद्र सेहवागने १४ चौकार आणि सहा षटकारांच्या साह्याने ‘रन’पंचमीचे रंग उधळत साकारलेल्या मॅरेथॉन शतकी खेळीच्या बळावर भारताने आज चौथ्या एकदिवसीय लढतीमध्ये दहा विकेट राखून विजय मिळविताना न्यूझीलंडमध्ये प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकण्याची किमया साधली. डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने चौथ्या लढतीत ८४ धावांनी विजय मिळविला. सेहवागने फक्त ६० चेंडूंमध्ये १३ चौकार आणि चार षटकारांसह शतक साजरे करताना भारतातर्फे सर्वात वेगवान शतक झळकाविण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. १९८८-८९मध्ये बडोद्यात मोहम्मद अझरुद्दीनने न्यूझीलंडविरुद्धच ६२ चेंडूंमध्ये शतक झळकाविले होते. (सविस्तर वृत्त)

परतफेड!
दरबान, ११ मार्च/ पीटीआय

मायदेशात कसोटी मालिकेत झालेल्या मानहानीकारक पराभवाची परतफेड आस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मोठय़ा फरकांनी धूळ चारून केली. ऑस्ट्रेलियाने असून त्यांनी तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी सहजपणे खिशात टाकली आहे. येथील दुसऱ्या कसोटीत द. आफ्रिकेला त्यांच्याच मातीत १७५ धावांनी धूळ चारून आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले असून द. आफ्रिकेचे नंबर वन होण्याचे स्वप्न यामुळे भंगले आहे. सामन्यातील दोन्हीही डावात शतके झळकावून ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या फिलिप ह्युजेसला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रामदीनची झुंजार लढत; वेस्ट इंडिजने मालिका जिंकली
त्रिनिदाद, ११ मार्च/पीटीआय

वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुध्दचा पाचवा क्रिकेट कसोटी सामना आज अनिर्णित राखून मालिका १-० जिंकली व २००० नंतर प्रथमच विस्डेन करंडक मिळविला. वेस्ट इंडिजच्या दिनेश रामदीनने ८७ चेडूंत नाबाद १७ धावा करीत संघाचा आजच्या सामन्यातील पराभव टाळण्यात यश मिळवून दिले. आज शेवटचा दिवस अतिशय रोमहर्षक ठरला. इंग्लंडने ३ बाद ८० धावांवर दुसरा डाव आज पुढे सुरु केला.

वेगवान शतकवीर
हॅमिल्टन, ११ मार्च / पीटीआय
न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसे काढणारा वीरेंद्र सेहवाग हा भारताकडून सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. अवघ्या ६० चेंडूत सेहवागने आज शतक झळकावले. त्याने आजच्या तडाखेबंद खेळीत नाबाद १२५ धावा कुटल्या. शतकाच्या उंबरठय़ावर असताना पुढे येत गोलंदाज व्हेटोरीच्या डोक्यावरुन चेंडूला वेगात सीमारेषेपार धाडत सेहवागने हा विक्रम केला. याआधी हा विक्रम माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता. त्याने ६२ चेंडूत शतक (१०८) झळकावले होते. वेगवान शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत सेहवाग आता सातव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने केवळ ३७ चेंडूत केलेल्या १०२ धावांच्या झंझावातामुळे तो पहिल्या स्थानावर आहे. आफ्रिदीने हा विक्रम श्रीलंकेविरुद्ध १९९६ मध्ये नौरोबी येथे झालेल्या सामन्यात केला होता. तर अझरुद्दीनने बडोदा येथे १९८८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतातर्फे सर्वात जलद शतक नोंदविले होते. सेहवागने आजच्या खेळीत स्वत:चाच विक्रम मोडून काढला. त्याने २००१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच ६९ चेंडूत शतक साजरे केले होते.

वीरूच्या तळपत्या बॅटसमोर कोणत्या गोलंदाजाला उभे करावे
व्हेटोरीपुढे पडलेला प्रश्न
हॅमिल्टन, ११ मार्च/ पीटीआय
वीरेंद्र सेहवागच्या तळपत्या बॅटसमोर कोणत्या गोलंदाजाला उभे करावे, असा प्रश्न न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार डॅनियल व्हेटोरी याला पडला आहे. आज झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सेहवागच्या धूवाँधार फलंदाजीसमोर किवी संघाची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. सेहवागने अवघ्या साठ चेंडूचा सामना करीत १२५ धावा वसूल केल्या. या मालिकेत भारताने ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. सेहवागचा खेळ हा फारच विस्फोटक होता. त्याला गोलंदाजी करताना आम्हाला नवीन डावपेच आखावे लागतील. याचा परिणाम आमच्या खेळावर निश्चितच होईल, असे व्हेटोरी म्हणाला. असा खेळ फारच कमी पाहायला मिळतो. या मालिकेत सेहवागला योग्य दिशा राखूनच आम्ही गोलंदाजी करीत होतो. पण आज त्याला कसे रोखावे हेच कळत नव्हते. आणि सलग छोटय़ा मैदानावर चांगली गोलंदाजी सातत्याने करणे शक्यही नसते. प्रत्येकवेळी चेंडूची दिशा व गती बरोबर राखणे अवघड असल्याचे व्हेटोरी म्हणाला. प्रतिस्पध्र्याच्या फलंदाजीचे कौतुक करीत सद्यस्थितीत भारतीय फलंदाजी सवरेत्कृष्ट असल्याचे व्हेटोरी म्हणाला. कारकिर्दीतील सर्वात अवघड आव्हान भारतीय संघाने उभे केले. पहिल्या चार फलंदाजांमुळे उर्वरित संघाचा आत्मविश्वास वाढतो व त्यामुळे आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. जेव्हा सेहवाग फॉर्मात असतो तेव्हा त्याच्यामुळे अन्य फलंदाजांचा खेळही चांगला होतो. अशावेळी सेहवागला बाद करण्यासाठी प्रचंड खटाटोप करावी लागते.

चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार?
दुबई, ११ मार्च/पीटीआय
चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विचार करीत आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज येथे ही माहिती दिली. ही स्पर्धा २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोवर या कालावधीत श्रीलंकेत आयोजित केली जाणार होती. मात्र या कालावधीत श्रीलंकेत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ही स्पर्धा अन्य देशांत घेण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच श्रीलंकेतील तणावग्रस्त वातावरणात तेथे सामने घेण्याबाबत आयसीसीचे वरिष्ठ अधिकारी उत्सुक नाहीत. खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही ही स्पर्धा तसेच २०११ मध्ये भारतीय उपखंडात आयोजित केली जाणारी विश्वकरंडक स्पर्धाही अन्य देशांत घेण्याची मागणी केली आहे.आयसीसीच्या स्पर्धा संयोजन समितीने श्रीलंकेतील विविध ठिकाणांचा आढावा घेतला व ही स्पर्धा अन्यत्र घेण्यासंबंधी विचार केला आहे. दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्याची दक्षिण आफ्रिकेने तयारी दर्शविली आहे. आयसीसीच्या स्पर्धा संयोजन समितीनेही त्यास अनुकूलता दर्शविली असल्याचे समजते. आयसीसीच्या वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक पुढील आठवडय़ात होणार असून त्यामध्ये याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

तिसऱ्या कसोटीसाठी सामन्यासाठी द. आफ्रिकेच्या संघात तीन बदल
दरबान, ११ मार्च/ पीटीआय

ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसून त्याच्याजागी अ‍ॅश्व्ल प्रिन्स हा संघाचे नेत्तृत्व करणार आहे. त्याचबरोबर मॉर्न मॉर्केल आणि नील मॅकेल्झी यांना तिसऱ्या सामन्यासाठी वगळण्यात आले असून त्यांच्याजागी युवा क्रिकेटपटू इम्रान खान आणि वेन पारनेलला संघात स्थान देण्यात आले आहे.
उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे स्मिथला १९ तारखेला होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे. तर गेले दोन कसोटी सामने अ‍ॅश्वेल प्रिन्स दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचे निवड समिती सदस्य माईक प्रॉक्टर म्हणाले की, स्थानिक सामन्यांमध्ये सातयपूर्ण कामगिरी केल्यामुळे इम्रान खान हा संघप्रवेशासाठी प्रबळ दावेदार होता.
कसोटी संघ पुढील प्रमाणे : अ‍ॅश्वेल प्रिन्स (कर्णधार), हशिम अमला, मार्क बाऊचर, ए. बी. डि’व्हिलियर्स, जे. पी. डय़ुमिनी, पॉल हॅरिस, जॅक कॅलिस, इम्रान खान, अ‍ॅल्बी मॉर्केल, मखाया एन्टिनी, वेन पारनेल आणि डेल स्टेन

हम्पीची तिसऱ्या स्थानावर घसरण
फिडे ग्रां प्रीं बुद्धिबळ
इस्तंबूल, ११ मार्च / पीटीआय

अव्वल मानांकित कानेरू हम्पीला आयएस बँक अटातुर्क फिडे ग्रां.प्री. बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेच्या चौथ्या फेरीत चीनच्या शेन यांगचा बचाव भेदता न आल्यामुळे सामना बरोबरीत सोडवावा लागला. हा सामना जिंकता न आल्यामुळे तिची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता स्पर्धा जिंकायची असल्यास उर्वरित सात फेऱ्यांमध्ये तिला लौकीकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. सामन्याच्या सुरुवातीपासूनच यांगने हम्पीला चांगलीच झुंज दिली. प्रारंभीपासूनच यांगने आक्रमण केल्यामुळे हम्पीला बचाव करणे क्रमप्राप्त झाले आणि त्यामुळे तिच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. चीनची यिफान हाओही स्पर्धेच्या सुरुवातीपासून चांगल्या फॉर्मात असून स्वीडनच्या पिया क्रमलिंगला पराभूत करून ३.५ गुणांची कमाई केली आहे. यिफान ईक्वेडोरच्या मार्ता बाकरो फियरोबरोबर संयुक्तरीत्या अव्वल स्थानावर आहे. तर हम्पीबरोबर चीनची झओ झू संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आहे.

केंद्रीय पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
पुणे, ११ मार्च/प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शकांना तसेच क्रीडा संघटक यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे.सन २००८ साठी उपरोक्त पुरस्कारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराचे विहीत नमुन्यातील अर्ज व माहितीपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोमवार पेठ, पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. २२ मार्च २००९ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करून तीन प्रतीत आवश्यक कागदपत्रासह २२ मार्च २००९ पर्यंत या कार्यालयात सादर करावे.

आज रंगणार ‘मुंबई श्री’
मुंबई, ११ मार्च/क्री.प्र.

एल्फिन्स्टनच्या कामगार क्रीडा भवनात उद्या १२ मार्चला ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार असून यात जवळपास सव्वाशे शरीरसौष्ठवपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. एकूण सात वजनी गटात होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्याला २५ हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांनाही रोख पारितोषिके देण्यात येतील. याच स्पर्धेतून १४ व १५ मार्चला पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबई आणि मुंबई उपनगर संघांची निवड केली जाणार आहे. मुंबई श्री स्पर्धेसाठी कामगार क्रीडा भवनात दोन भव्य स्क्रीन उभारण्यात येणार असल्याने क्रीडा रसिकांना स्पर्धेचा थरार अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल.