Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९

बुरा न मानो होली है असं एकमेकांना बजावत ठाणेकर नागरिकांनी तुडुंब उत्साहात होळी साजरी केली. धुळवडीनिमित्त रस्त्यांवर, सोसायटय़ांच्या आवारात रंगांची एकच हुल्लड उडाली. मराठी मालिकांत काम करणाऱ्या ठाणेकर अभिनेत्यांनी गडकरी रंगायतनच्या कट्टय़ावर जमून फुल्टू धमाल केली.

 

बीएमसीचे आडमुठे धोरण
भिवंडीतील ८२ गावे तहानलेली!
..तर मतदानावर बहिष्कार!

राजीव कुळकर्णी
भिवंडी लोकसभेसाठी राजेश घोलप, सुरेश टावरे, गुरुनाथ टावरे, विश्वनाथ पाटील, कपिल पाटील, यासारख्या नेत्यांची नावे वृत्तपत्रातून वाचावयास मिळत आहेत. या नेत्यांनी आमच्या प्रश्नात लक्ष न घातल्यास मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा अनेक गावकऱ्यांनी दिला.

स्त्री सक्षमीकरणावरचे तळमळीने लिहिलेले पुस्तक - एम. एन. चैनी
ठाणे/प्रतिनिधी : ‘तिच्यातली स्त्री’ या शोभा सुभेदार लिखित पुस्तकाचे प्रकाशन रविवार, १ मार्च रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे आणि सुहासिनी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे इंडियन मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष एम. एन. चैनी उपस्थित होते. मांडके फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अलका मांडके यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

विवेक पंडित, लांडगे यांच्या नावाची चर्चा
भगवान मंडलिक

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उपसभापती वसंत डावखरे यांनी काँग्रेस आघाडीतील इच्छुक, अभेद्य असा चक्रव्यूह भेदून उमेदवारी निश्चित करण्यात बाजी मारली आहे. आतापर्यंत कल्याण मतदारसंघात उद्घाटनांचा सपाटा लावलेल्या डावखरे यांच्या कार्यकर्त्यांनी रिक्षांवर, जीपवर ‘डावखरे यांना विजयी करा’ असा प्रचार करणारी स्टिकर लावून निवडणूक प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भिवंडीत खाणावळ मालकांकडून पोलिसांना मारहाण
भिवंडी/वार्ताहर : निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाडीपार भागात बेकायदेशीरपणे खाणावळ चालवीत असल्याचे आढळून आल्याने येथील बिट मार्शल म्हणून नेमणुकीस असलेले पोलीस त्याची चौकशी करण्यास गेले असता खाणावळ मालक आणि बिट मार्शल यांच्यात बोलचाली होऊन मुद्याची बात गुद्यावर आली. यावेळी खाणावळ मालकांनी पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करीत मारहाण केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खाडीपार मच्छी कंपाऊंड येथे खाणावळ आहे. कुरताज महम्मद नसीर सिद्दिकी (२८), जमाउल्लाह सिद्दिकी (३५), सिरताज सिद्दिकी (३०) हे तिघे भाऊ ही खाणावळ चालवीत आहेत. खाणावळ बेकायदेशीर असल्याने ती बंद करण्यात यावी यासाठी बिट मार्शल संदीप सुखदे, सबाब तडवी, समीर तडवी आणि पो. ना. गिरे हे तेथे गेले. यावेळी खाणावळ मालक कुरताज, जमिउल्लाह, सिरताज आणि राजू नावाचा ग्राहक यांनी पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघा भावांना अटक केली असून, त्यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शाळा मदतनीस घोटाळ्यातील लिपिकाने घातला शिक्षण मंडळालाही गंडा
ठाणे/प्रतिनिधी : ठाणे महापालिका शिक्षण मंडळातील बहुचर्चित शाळा मदतनीस आर्थिक गैरव्यवहारातील निलंबित वरिष्ठ लिपिकाने कर्जापोटी पालिकेस तारण ठेवलेले घर परस्पर विकून अडीच लाख रुपयांचा गंडा घातल्याची बाब उघडकीस आली आहे. शाळा मदतनीस घोटाळ्यात ठपका ठेवून शिक्षण मंडळातील वरिष्ठ लिपिक विजयकुमार कुंभार यांना ४ मार्च रोजी निलंबित करण्यात आले आहे. कार्यालयात त्यांनी निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास नकार दिल्यावर शिक्षण मंडळाचा कर्मचारी व सुरक्षारक्षक सदर पत्र त्यांच्या घरी घेऊन गेला, तेव्हा कुंभार याने ते घर पूर्वीच विकल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे कुंभार याने शिक्षण मंडळाकडून अडीच लाखांचे कर्ज घेऊन त्याबदल्यात हे घर शिक्षण मंडळाकडे गहाण ठेवले होते. त्या कर्जाची अजून परतफेड झालेली नसतानाच परस्पर घर विकण्यात आल्यामुळे शिक्षण मंडळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी मात्र अजून गुन्हा दाखल केला नसल्याचे समजते.

उत्कर्ष मंडळातर्फे महिला दिन साजरा
ठाणे/प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला उत्कर्ष मंडळाने आपला १९वा वर्धापनदिन व स्नेहमीलन सोहळ्याचे नुकतेच आयोजन केले होते. उपवन येथील गणेश मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. तसेच वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधील विजेत्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा नीता जाधव, उपाध्यक्षा शारदा देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.