Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मेघालय सरकार अल्पमतात
शिलॉँग, ११ मार्च/पी.टी.आय.

एका ज्येष्ठ मंत्र्यानेच सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने मेघालयात राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत मेघालय पुरोगामी आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्तास्थापनेसाठी आम्हाला सर्वबाजूंनी विचारणा होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. नागरी विकासमंत्री व ‘केएचएनएएम’चे एकमेव आमदार पॉल लिंगडोह व लिमिसन संगमा तसेच इस्माईल आर. मरक या दोन अपक्ष आमदारांनी गेल्या तीन दिवसांत सत्ताधारी एमपीए आघाडीतून माघार घेतली आहे. त्यामुळे एमपीएचे संख्याबळ खाली आले आहे. मुख्यमंत्री डोनकुपर रॉय यांनी सांगितले की, आपण राजीनामा देणार नसून सभागृहाला सामोरे जाऊ.
काँग्रेसच्या गोटात गेलेल्या दोन आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यूडीपी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य काँग्रेसबरोबर जाणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते लापांग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची शक्यता नाकारलेली नाही.
एमपीए आघाडीकडे आता ३० आमदार असून त्यात राष्ट्रवादीचे १५, यूडीपी १०, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी २, भाजप १, व दोन अपक्ष आहेत. काँग्रेसचे २६ आमदार असून त्यांना आता तीन अपक्ष व एका आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे. मार्च २००८ मध्ये मेघालयात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर लापांग यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली पण त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांना विश्वास ठरावापूर्वीच राजीनामा द्यावा लागला होता. राजकीय अस्थिरता ही मेघालयाच्या पाचवीलाच पूजलेली आहे. त्या राज्यात आतापर्यंत कधीच कुठल्याही एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही.