Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

ओरिसातील नवीन पटनायक सरकार विश्वासदर्शक ठरावात तरले
भुवनेश्वर, ११ मार्च/पीटीआय

ओरिसा विधानसभेत आज विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदानाने शिक्कामोर्तब झाल्याने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सरकार तरले आहे.
मुख्यमंत्री पटनायक यांच्या या विजयामुळे बिजू जनता दलात आनंदाचे वातावरण असले तरी विरोधी पक्षांनी मात्र प्रचंड गदारोळ करीत हा लोकशाहीचा खून असल्याची टीका केली आहे. विधानसभेतील मतदानानंतर विरोधकांनी गोंधळ घालत सभात्याग केला आणि या मतदानाच्या प्रक्रियेविषयी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी अचानकपणे सभात्याग करीत मतांच्या विभागणीची जोरदार मागणी केली. या ठरावावरील मतदानासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून भाजप आणि बिजू जनता दलात झालेल्या मतभेदांचे पर्यावसान भाजपने पाठिंबा काढून घेण्यात आले होते. ओरिसात बिजद-भाजप आघाडीची सत्ता होती. भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने पटनायक सरकार अल्पमतात आले. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव मांडण्याची वेळ आली. आज अवघ्या दोन तासांत हा ठराव मांडला गेला आणि तो मंजूर झाला.
ओरिसा विधानसभेत १४७ आमदार असून, त्यापैकी बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ७४ आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे पटनायक यांनी ठराव मांडतानाच स्पष्ट केले. राज्यपाल एम. सी. भंडारे यांच्या सूचनेनुसार हा पाठिंबा अजमावण्यासाठी ठराव मांडत असल्याने त्यांनी सांगितले. भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते हरिचंदन यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा दावा फेटाळला असून, सरकार अल्पमतात असल्याचे म्हटले आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकणे शक्य नाही हे समजल्यानेच मतदानाची विभागणी टाळली जात आहे. हे सरकार चुकीचे पायंडे पाडत असून, आज या सभागृहात लोकशाहीचा खून झाला आहे, अशी टीका हरिचंदन यांनी केली.