Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
व्यक्तिवेध

कामगारांच्या लढय़ाचा प्रत्येक हुंकार आणि लाल बावटा यांचे अतूट नाते अगदी स्वातंत्र्यलढय़ापासून मुंबई-महाराष्ट्र पाहत आला आहे. तरीही याच महाराष्ट्रात विशेषत: साठीनंतर मात्र कम्युनिस्ट चळवळीचा बॅकलॉग वाढत गेला. सच्चे लढाऊ नेतृत्व म्हणून शिरावर घेणाऱ्या कामगारांनी कम्युनिस्टांकडे राजकारणाच्या आघाडीवर, मते देताना पाठ फिरवावी, ही बाब आपल्या ७० वर्षांच्या कम्युनिस्ट जीवनांत सर्वाधिक काळ महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांची कामगार संघटना ‘सीआयटीयू’ची धुरा सांभाळणाऱ्या कॉम्रेड प्रभाकर संझगिरी यांना व्यथित करणारी होती. विद्यार्थी दशेत भारावून जाऊन स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेणारे आणि स्वातंत्र्योत्तरही राजकीय

 

चळवळीत सक्रिय राहणाऱ्या एका आदर्शवादी पिढीचे नेतृत्व कॉ. संझगिरी यांनी केले. कामगार-शेतकऱ्यांचे देशात राज्य यावे आणि ते मार्क्सवाद-लेनिनवादाच्या विचारमूल्यांची कास धरूनच येऊ शकेल, यावर ठाम निष्ठा असलेले एक प्रखर कम्युनिस्ट पुढारी, व्यासंगी विचारवंत आणि सिद्धहस्त लेखक म्हणून कॉ. संझगिरी यांची महाराष्ट्राला ओळख आहे. ‘मानवाची कहाणी’, ‘अणूच्या अंतरंगात’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांमधून कम्युनिस्ट विचार परंपरेत त्यांनी काही नव्या पैलूंची भर घातली. विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण या दुर्लक्षित राहिलेल्या विषयांकडे पाहण्याच्या त्यांच्या मार्क्सवादी दृष्टीचा त्यातून परिचय होतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अठरापगड जाती आणि विविध पदरी सामाजिक स्तराने विभागलेल्या समाजाला ‘वर्ग’ म्हणून संघटित करताना वेगळ्या आकलनाची आणि विशेष कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी वेळोवेळी आपल्या लिखाणातून व्यक्त केली. दलित-आंबेडकरी चळवळीचे मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेले आकलन म्हणजे सबंध डाव्या-पुरोगामी चळवळीसाठी एक मोठे योगदान ठरेल. दलित, आदिवासी आणि अतिमागास जाती या जनविभागात फैलावण्यासाठी कम्युनिस्टांचा खास कृती कार्यक्रम असायला हवा, या त्यांच्या आग्रहापायीच नामांतर तसेच भूमिहीनांची चळवळ यात कम्युनिस्टांचा सक्रिय सहभाग राहिला. दलित-लेखक कलावंतांशीही कॉ. संझगिरी यांचा खास स्नेह होता. दलित साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा याला डाव्या क्रांतिकारी विचारांची जोड देणारी कम्युनिस्ट पक्षात एक सांस्कृतिक आघाडी उभी करण्यासाठीही कॉ. संझगिरी यांचे प्रयत्न होते. आद्य-उद्योगनगरी मुंबईतील आर्थिक स्थित्यंतरे त्यांनी जवळून पाहिली आणि मुंबईबाहेर पुणे, औरंगाबाद, नाशिकसारख्या नव्या केंद्रांमधील औद्योगिक विस्तारात ‘सीटू’चे अध्यक्ष या नात्याने लक्ष नवे तरुण नेतृत्व त्यांनी जाणीवपूर्वक घडविले. मुंबईतून उद्योगधंद्यांचे स्थलांतर आणि संघटित कामगार चळवळ ओसरत असताना, कॉ. संझगिरी यांनी सिएट टायर्स, जे. के. टायर्स, हिंदुस्थान फेरेडो येथील कामगार संघटनांचे बुरूज भक्कमपणे सांभाळले. भांडूप येथील ‘संघर्ष’ कार्यालय कामगार चळवळीचे नवे केंद्र बनले आणि त्या आजूबाजूच्या झोपडपट्टय़ा आणि विस्थापितांचा प्रश्न घेऊन मग त्यांनी ‘भाडेकरू कृती समिती’ संघटित केली. आज या टायर उद्योगातील कामगार आणि हजारो विस्थापितांना यामुळे उन्नत जीवनमान व पक्का निवारा मिळू शकला आहे. याच मतदारसंघातून कॉ. संझगिरी मग विधानसभेवर १९७८ साली निवडून गेले. शहरातील कामगारांचे आर्थिक लढे लढवत असताना, ग्रामीण महाराष्ट्रच हा कम्युनिस्टांचा आगामी काळात भक्कम आधार बनेल यावर त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच ग्रामीण भागातील पक्षाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची किमान उपजिविका सांभाळली जाईल, यासाठी भांडूप सेंटरमधून दरसाल मोठी आर्थिक मदत कॉ. संझगिरी यांच्या पुढाकारातून सुरू झाली. वयाच्या अठराव्या वर्षी विद्यार्थी दशेत असताना मार्क्सवादाने झपाटलेले कॉ. संझगिरी ७० वर्षे कम्युनिस्ट पार्टीत घालविल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत कडवे मार्क्सवादी कसे राहू शकले, या प्रश्नाचे उत्तर त्यांचा एकंदर जीवनपट पाहिल्यावर समजते. कॉ. संझगिरी यांच्यासह अनेक कम्युनिस्ट पुढाऱ्यांना कैक वर्षे कारावास, दडपशाही आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवत भूमिगत कार्य करावे लागण्याची राजकीय किंमत वेळोवेळी मोजावी लागली आहे. परंतु सहचारिणी म्हणून सुमन संझगिरी यांची साथ मिळाली म्हणूनच संझगिरी यांना मोजावी लागलेली कौटुंबिक किंमत फार मोठी ठरली नाही असे म्हणता येईल.