Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
  अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि
बदलाचे खारे वारे!
  ओपन फोरम :
नवीन नेतृत्वाबद्दल तरुणांच्या अपेक्षा
  थर्ड आय :
हिरवं मैदान, हिरवा दहशतवाद= हरित क्रांती?
  स्मार्ट बाय
  क्रेझी कॉर्नर
  न्यूज कॉर्नर :
पहिली भारतीय महिला को-पायलट
  दवंडी : माझा मराठाचि बोलु कौतुकें..
  मेल बॉक्स : गर्भनिरोधक उपायांबाबत अनभिज्ञता
  फॉरवर्डस : केशवाचे कपट,
काकांची कमाल
  यंगअचिव्हर :
अभिमानास्पद कामगिरी
  हेल्थकॉर्नर :
होलिस्टिक फिटनेस
  फूड कॉर्नर :
द्राक्षं

हुरहुर

रेखा- रश्मी, अगं अजून झोपली नाहीस!
रश्मी- नाही गं आई, झोपच येत नाहीय, म्हणून जरा वाचत बसले होते.
रेखा- वाचत होते, म्हणते आहेस आणि हातातलं पुस्तक तर उलटं धरलं आहेस.
रश्मी-..
रेखा- रश्मी बेटा, काय झालं?
रश्मी- काही नाही गं..
रेखा- नाही कसं! अस्वस्थ वाटते आहेस. चेहराही उतरल्यासारखा झालाय. अगं आठ दिवसांवर लग्न आलंय तुझं. नववधू

 

कशी ताजी, रसरशीत दिसली पाहिजे. एक नवं पर्व तुझ्या आयुष्यात सुरू होणार आहे.
रश्मी- आई, त्याचीच मला भीती वाटतेय.
रेखा- भीती? कशाची? तुझं आणि मैत्रेयचं काही भांडण वगैरे झालं का?
रश्मी- नाही, पण उगीचच हुरहुर लागली आहे. खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय.
रेखा- अगं, हे अगदी नॉर्मल आहे. २०-२२ वर्षे आपण ज्या घराशी, बांधलेलो असतो, ज्या माणसांची आपल्याला सवय झालेली असते, ते घर, ती नात्याची माणसं सोडून जायचं तर मन कावरंबावरं होणारच की!
रश्मी- तुलाही असंच वाटलं होतं?
रेखा- मग, तू काय, मी काय.. प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात ही वेळ येते. तरी तुम्ही आताच्या मुली आमच्या मानानं खूप बोल्ड असता. नोकरी-बिकरीच्या निमित्तानं घराबाहेरचं जग बघता. आमच्या वेळेला तर कॉलेज संपता संपता लग्न व्हायची आमची. मग तर अजूनच जाणवायचं.
रश्मी- त्यापेक्षा पूर्वीच्या काळी बालविवाह व्हायचे तेच बरं होतं नाही! लहान वयातच सासरच्या माणसांशी घट्ट नाती तयार होतात. आई-बाबा-भावा-बहिणींबरोबर २०-२२-२४ वर्षे राहायचं आणि ती घट्ट नाती मागे सोडून पुन्हा नव्यानं नाती जोडायची. किती अवघड आहे हे!
रेखा- ए वेडाबाई, असला विचार नाही करायचा.
रश्मी- आई, मला जमेल हे सगळं?
रेखा- का नाही जमणार? अगं, इतकी लग्न होतात. बाकीच्या जमवून घेतात, तसंच आपणही जमवून घ्यायचं.
रश्मी- आणि नाही जमलं तर?
रेखा- रश्मी, हा काय वेडेपणा?
रश्मी- वेडेपणा नाही, पण तूच नेहमी म्हणतेस ना की, एका ठिकाणाहून काढून दुसरीकडे लावलेलं झाड रुजतंच असं नाही. काही रुजतात, काही नाही रुजत.
रेखा- बरोबर आहे, पण रुजण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
रश्मी- म्हणजे स्वत:ला रुजवण्यासाठी आपण स्वत:च प्रयत्न करायचे. मातीची काहीच जबाबदारी नसते!
रेखा- असते तर! पण आधी पावलं आपण उचलायची, आपण दहा पावलं चालायची, तेव्हा समोरून दोनच पावलांची अपेक्षा करायची.
रश्मी- असं का?
रेखा- सुरुवातीचं नव्या घरातलं आपलं स्थान पाहुण्याचं असतं. मग आपण जेव्हा पाहुणे म्हणून दुसऱ्याकडे जातो तेव्हा त्या घरातले नियम, कायदे-कानून पाळतो. नाही का? आपले नियम-कायदे-कानून तिथं लावतो का? नाही ना? तू हॉस्टेलवर पाळतच होतीस ना तिथले नियम?
रश्मी- हो, पण हॉस्टेलची गोष्ट वेगळी तिथं मला काही कायमचं राहायचं नव्हतं!
रेखा- अगदी बरोबर. इथं तुला कायमचं राहायचंय म्हटल्यानंतर ती चौकट आपल्याला स्वीकारायलाच लागते.
रश्मी- पण मग २०-२२ र्वष माझ्यावर जे संस्कार झाले, ज्या नियमांची मला सवय झाली, ते संस्कार, नियम सगळे पुसून कसे टाकायचे? मनाची पाटी कोरी कशी करायची?
रेखा- अं हं, ते संस्कार ते नियम मनावरून पुसून नाही टाकायचे. पण थोडा काळ तरी ते मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवायचे. काही काळ नव्या घरातले संस्कार, नियमांचं निरीक्षण कर. त्यांच्या चौकटीत सामावायचा प्रयत्न कर. कुठल्याच अनुमानापर्यंत येऊ नकोस. नंतर दोन्हीत तुलना करून चांगलं-वाईट, चूक-बरोबर ठरव.
रश्मी- पण आई, चांगलं-वाईट, चूक बरोबर या गोष्टी सापेक्ष असतात ना!
रेखा- हो नं! त्यामुळं थोडे द्यावे, थोडे घ्यावे, अशा पद्धतीतनंच तुला जावं लागेल. कारण तू जसा तुझ्यावर झालेल्या २०-२२ वर्षांच्या संस्कारांचा विचार करते आहेस, तसेच त्याच्यावरही तेवढीच र्वष संस्कार झालेत, हे विसरू नकोस, त्याच्याकडूनही एकदम बदलाची अपेक्षा करू नकोस. कधी त्याच्या मनाप्रमाणे तर कधी तुझ्या मनाप्रमाणे. असं वागलात तर संसाराचा तोल साधेल. आणि अद्वैत निर्माण होईल.
रश्मी- परवा मैत्रेयची आईही मला असंच सांगत होती, तुम्ही सगळ्या आया कशा एकाच पद्धतीनं विचार करता आणि बोलता?
रेखा- कारण प्रत्येक बाईलाच या चक्रातून जावं लागतं. लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येतो ना, तसं तर नव्या नात्याविषयी आकर्षण आणि भीती अशा परस्परविरोधी भावना मनात निर्माण होतात आणि मन कावरंबावरं होतं. तुझंही आता तसंच झालंय.
रश्मी- हो गं. कळतच नाहीये मला काही. लग्न जवळ जवळ येतंय आणि मला आता चक्क लग्नच करू नाही, असं वाटतंय. आई, आज इथंच झोपशील? आई, तू असा केसातनं हात फिरवायला लागलीस ना, सगळे प्रश्न, शंका-कुशंका दूर पळून जातात.
रेखा- हो, पण आता माझे हात थकले. म्हणून तर हे काम मैत्रेयकडे दिलंय.
रश्मी- आई.. काहीतरीच..
रेखा- बघ, आता पाच मिनिटांपूर्वी तुला लग्न करावसं वाटत नव्हतं. आणि आता मैत्रेयच्या नावानंही गालावर गुलाब फुललेत.
रश्मी- आई, तू म्हणतेस तसं मी वागेन, पण माझं नाहीच जमलं तर?
रेखा- रश्मी बेटा, आपण जे विचार करतो ना, त्याला वास्तुपुरुष तथास्तु म्हणतो, म्हणून आपण नेहमी सकारात्मकच विचार करायचे. आणि तू लहान आहेस अजून. त्यामुळे तुझा तुझ्यावर विश्वास नाहीय, पण माझा माझ्या संस्कारांवर विश्वास आहे ना. त्यामुळे तू पुढं छान संसार करणार आहेस, याची मला खात्री आहे.
रश्मी- आई..
रेखा- आता काय? झोप बघू आता. खूप उशीर झालाय. आणि कोणतेही वेडेवाकडे विचार मनात आणू नकोस..
रश्मी- मग एक काम कर..
रेखा- सांग ना बाळ.
रश्मी- लहानपणी मला झोपताना म्हणायचीस ना, ते गाणं म्हण ना..
रेखा- म्हणते, पण तू झोप आता. लहानपणापासूनची तुझी ही सवय. तेव्हाही तुला अशीच दामटून झोपवावी लागायची. कुणीही पाय नका वाजवू.
चाहूल देऊन नका कुणी गं ‘रश्मी’ला जागवू..
shubhadey@gmail.com