Leading International Marathi News Daily
गुरुवार, १२ मार्च २००९
विविध

मंदीच्या सावटाखालील २००९ हे ‘मेक ऑर ब्रेक’ वर्ष!
बराक ओबामा व बान की मून यांनी निश्चित केले प्राधान्यक्रम
वॉशिंग्टन, ११ मार्च/पीटीआय
‘जी-२०’ देशांनी गरिबातील गरीब माणसाचा विचार करून आपले धोरण निश्चित करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मून यांनी आज विविध विषयांवर चर्चा करून जागतिक संदर्भातील प्राधान्यक्रम निश्चित केले. जागतिक मंदीनंतर जो अनवस्था प्रसंग ओढवला आहे, त्याचा विचार गरीब माणसाच्या नजरेतून केला पाहिजे, असे सांगत बान की मून यांनी म्हटले आहे की, या मंदीचा परिणाम जगावर झाला आहे.

‘फोर्ब्स’च्या श्रीमंतांमध्ये २४ भारतीय
वॉशिंग्टन, ११ मार्च/वृत्तसंस्था

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यंदा २४ भारतीयांचा समावेश असून, त्यापैकी चार हे ‘टॉप टेन’मध्ये झळकले आहेत. १३ वर्षे सातत्याने या यादीत अगभागी असणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना यंदा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक वॉरेन बफे यांनी मागे टाकले आहे.
जगातील सर्वात मोठे पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल हे ४५ अब्ज डॉलर संपत्ती असणारे युरोपातील सर्वात श्रीमंत रहिवासी ठरले आहेत. ‘

‘पाकमधील आदिवासी भाग हा अल-काईदासाठी नंदनवन’
वॉशिंग्टन, ११ मार्च/पी.टी.आय.

पाकिस्तानमधील ‘फाटा’ (फेडरली अ‍ॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया) हा आदिवासीबहुल डोंगराळ भाग अल-काईदाच्या दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरत असून पुढच्या पिढीतील नेतृत्व विकसित होण्यासाठी वावही मिळत आहे, असा अहवाल अमेरिकेचे लेप्टनंट जनरल मायकेल मेपल्स यांनी सिनेटसमोर सादर केला आहे. वायव्य सरहद्द प्रांतात तालिबान्यांशी पाकिस्तानने केलेल्या करारावरही मेपल्स यांनी टीका केली असून हे चित्र कायम राहिल्यास जगभर अल-काईदा आपली पाळेमुळे पसरविल, असा इशाराही दिला आहे.

विमला ठकार यांचे देहावसान
माऊंट अबू, ११ मार्च/पी.टी.आय.

आपल्या स्वतंत्र विचारधारेमुळे आध्यात्मिक क्षेत्रात तळपळणाऱ्या तत्त्वचिंतक विमला ठकार यांचे राजस्थानातील माऊंट अबू येथील ‘शिवकुटी’ या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी देहावसान झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. जे. कृष्णमूर्ती यांच्याकडून त्यांना तत्त्वचिंतनाची मूलभूत प्रेरणा लाभली होती. जे. कृष्णमूर्ती यांनी कोणालाही आध्यात्मिक वारस म्हणून निवडले नव्हते वा शिष्यत्व दिले नव्हते मात्र विमला ठकार यांच्याकडे कृष्णमूर्तीचाच वैचारिक वारसा चालविणाऱ्या तत्त्वचिंतक म्हणूनच पाहिले जात होते.

देशभरात होळी उत्साहात साजरी
नवी दिल्ली, ११ मार्च/पीटीआय

सारा देशच जणु रंगीबेरंगी झाला होता.होळी आणि धुळवडीचा सण देशभरात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. रस्त्यावरून जाणाऱ्यांवर इमारतींच्या गॅलऱ्या व गच्चीतून ‘नेम’ धरून पाण्याने भरलेले फुगे मारले जात होते. लक्ष्य अचूक साधले की एकच जल्लोष होत होता. अनेक ठिकाणी होळीच्या लोकप्रिय गाण्यांवर लोक बेधुंद होऊन नाचत होते. होळीनिमित्त अनेक ठिकाणी संगीताचे कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. मध्य प्रदेशमध्ये मद्यपींनी काही ठिकाणी घातलेला गोंधळ व बंदुकीच्या गोळीने आठ वर्षे वयाची मुलगी जखमी होणे या घटना वगळता होलिकोत्सव जल्लोषात पार पडला. दिल्लीमध्ये राजकीय नेते व जनतेने होळीचा सण उत्साहात साजरा केला. यशस्वी बायपास शस्त्रक्रियेनंतर पंतप्रधान मनमोहनसिंग हे आता पुन्हा कार्यरत झाले असले तरी त्यांनी यावेळी धुळवडीत सहभागी होणे टाळले. मुंबईमध्ये गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निरपराधांचे बळी गेले. त्या पाश्र्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी होळीचा सण साजरा केला नाही, मात्र भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग हे यांनी होळीचा सण जल्लोषात साजरा केला.

अणुकराराचे पालन करण्याचे अमेरिकेकडून आश्वासन
वॉशिंग्टन, ११ मार्च/पीटीआय

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कारकीर्दीत करण्यात आलेल्या भारत व अमेरिकादरम्यानच्या अणुकराराचे पालन यापुढेही केले जाईल असे आश्वासन बराक ओबामा सरकारने भारताला सांगितले आहे. हवामानातील बदल तसेच दहशतवादविरोधी लढा यासारखे जागतिक स्वरुपाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही ओबामा सरकारने म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी भारताचे परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांना चर्चेदरम्यान हे आश्वासन दिले. मेनन हे अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शिवशंकर मेनन यांनी गेल्या सोमवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची भेट घेतली. भारत व अमेरिका दरम्यान झालेल्या अणुकराराच पालन, दहशतवादविरोधी लढय़ात दोन्ही देशांनी परस्परांना करावयाचे सहकार्य, श्रीलंकेत सध्या सुरू असलेला संघर्ष, अफगाणिस्तानातील विद्यमान स्थिती या मुद्दय़ांवर शिवशंकर मेनन व हिलरी क्लिंटन यांच्या दरम्यान चर्चा झाली अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे हंगामी प्रवक्ते रॉबर्ट वूड यांनी आज पत्रकारांना दिली. बर्नस यांच्याशी मेनन यांनी आज भारत व अमेरिका दरम्यान झालेला अणुकरार व अन्य मुद्दय़ांबाबत चर्चा केली.

केरळात सीडीवरून ख्रिश्चनांमध्ये नाराजी
तिरुवनंतपुरम, ११ मार्च/पी.टी.आय.

केरळातील एका शैक्षणिक सीडीमध्ये चर्चसंबंधात गैरसमज पसरू शकतील असे चित्रण असल्यावरून ख्रिश्चन समाजात नाराजी आहे. विरोधी पक्षांनीही या सीडीवरून सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनी मात्र ही सीडी शिक्षण विभागाने पुरस्कृत केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही सीडी शिक्षण विभागातर्फे राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखविली जात आहे, या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. अशी कोणतीही सीडी आम्ही सरकारतर्फे दाखविलेली नाही, असे ते म्हणाले. एक शिक्षक ए. पी. शशीधरन यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शिक्षण मंत्री एम. ए. बेबी यांनी सांगितले की काही चित्रिकरण एका सीडीवर केवळ डाऊनलोड केले गेले होते मात्र त्याची सीडी तयार करून त्रिशुरमधील शिक्षकांमध्ये कशी वितरित झाली, याची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात शशीधरन हे दोषी आढळले आहेत.

जर्मनीत शाळेतील गोळीबारात १० ठार
विनेनडेन, ११ मार्च/ए. पी.

पश्चिम जर्मनीतील अल्बर्टव्हीले शाळेच्या विद्यार्थ्यांवर काळ्या कपडय़ामध्ये आलेल्या एका बंदूकधाऱ्याने केलेल्या बेछुट गोळीबारात १० विद्यार्थी ठार झाले असून इतर अनेक जखमी झाले आहेत. गोळीबार केल्यानंतर हा हल्लेखोर फरारी झाला. स्टुटगार्ट शहराच्या ईशान्येला २० किमी अंतरावरील या अल्बर्टव्हिले शाळेमध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हल्लेखोराच्या गोळीबाराला बहुसंख्य विद्यार्थीच बळी पडले आहेत. त्यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही, असे पोलीस प्रवक्ते क्लॉस हिंडरर म्हणाले. या हल्ल्यामागील उद्देशही कळू शकला नाही.

होळी खेळताना विनयभंग करणारे ३०० अटकेत
काठमांडू, ११ मार्च/पी.टी.आय.

होळी खेळताना एका परदेशी महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध भिजवून व रंगवून नंतर तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याबद्दल नेपाळ पोलिसांनी ३०० जणांना अटक केली आहे. थमेल भागात विनयभंगाचा हा प्रकार घडला. नेपाळात काठमांडू परिसरात होळी व रंगपंचमीच्या वादावरून मंगळवारी पाच जणांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. बळजबरीने, एखाद्याच्या इच्छेविरोधात त्याला होळी खेळण्यास भाग पाडण्यात येऊ नये, असा आदेश नेपाळच्या गृह विभागाने याआधीच जारी केला आहे.

तारीक अझीझ, केमिकल अली यांना १५ वर्षांची कैद
बगदाद, ११ मार्च/ए.एफ.पी.

इराकचे माजी उपपंतप्रधान तारीक अझीझ व दिवंगत हुकुमशहा सद्दाम हुसेन यांचा खास हस्तक समजला जाणारा केमिकल अली ऊर्फ हसन अली-माजिद यांना येथील न्यायालयाने मानवताविरोधी गुन्ह्यांबद्दल १५ वर्षांची कैद ठोठावली आहे. ७३ वर्षीय अझीझ यांना या निकालाने मोठा धक्का बसला असून सद्दाम हुसेन यांच्या राजवटीत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे. १९९२ मध्ये बगदादमधील ४२ व्यापाऱ्यांच्या झालेल्या खुनाबद्दल या दोघांवर हा खटला चालविण्यात येत होता. केमिकल अली हा इराकचा माजी संरक्षण मंत्री असून त्याला अनेक गुन्ह्यांबाबत दोषी ठरविल्याबद्दल त्याने कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही.