Leading International Marathi News Daily
शुक्रवार, १३ मार्च २००९

पाकिस्तान सरकार नमले
कराची, १२ मार्च/पी.टी.आय.
पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अराजकाच्या पाश्र्वभूमीवर सामोपचाराची भूमिका घेत पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत बोलणी करण्याची तयारी आज दर्शविली. बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायाधीशांच्या पुनर्नियुक्तीसाठी होणाऱ्या ‘लाँग मार्च’ला विरोधी पक्षाच्या पाठिंब्याला आमचा तत्वत विरोध नसल्याचेही सरकारने मान्य केले. वाढत असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे विरोधी पक्षांनी देशातील अस्थिर परिस्थितीबाबत सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच प्रस्तावित लाँग मार्चमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला आवरण्यासाठी सरकारने आता नमते धोरण स्वीकारले आहे. लाँग मार्चला विरोधी पक्षाचा पाठिंबा असल्याचा आमचा तत्त्वत विरोध नाही, मात्र त्यामुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीला थांबविणे महत्त्वाचे असल्याचे अंतर्गत मंत्रालयाचे प्रमुख रेहमान मलिक यांनी कनिष्ठ सभागृहात दुपारी केलेल्या विधानातून स्पष्ट केले. वाटाघाटींसाठी आमचे दरवाजे कायम खुले असल्याचे मलिक म्हणाले.

गोविंदा आणि मुलायम यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई?
मुंबई, १२ मार्च / प्रतिनिधी

रंगपंचमीनिमित्त आपले पाठिराखे आणि चाहत्यांवर पैशांची उधळण करणारा अभिनेता-खासदार गोविंदा आणि मतदारांना भुरळ घालण्यासाठी शंभर रुपयांच्या नोटा वाटून आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणारे समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव आज निवडणूक आयोगाच्या कचाटय़ात सापडले आहेत. गोविंदाने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आज राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी मुलायमसिंग चांगलेच गोत्यात येणार असून निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसीलायादव यांना १४ मार्चपर्यंत उत्तर द्यावयाचे आहे.

घोळ संपला!
शिवसेना-भाजप युतीचे जागावाटप निश्चित ’ दक्षिण मुंबई, कल्याण शिवसेना लढविणार
मुंबई, १२ मार्च / प्रतिनिधी

अखेर शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यातील लोकसभा निवडणुकीचे जागावाटप आज रात्री पूर्ण झाले. जुन्या सुत्रानुसार शिवसेना २२, तर भाजपा २६ जागा लढविणार आहे. दक्षिण मुंबई, कल्याण आणि यवतमाळ या तिन्ही मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढविणार असून भिवंडी व धुळे मतदारसंघ भाजपला सोडण्याचा निर्णय आज रात्री उशीरा झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दक्षिण मुंबई, यवतमाळ, कल्याण तसेच जळगाव या चार मतदारसंघांमुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता.

राष्ट्रवादीला विश्वासात न घेता काँग्रेसची पंधरा उमेदवारांची यादी तयार?
नवी दिल्ली, १२ मार्च/खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु असलेली जागावाटपाची बोलणी अपूर्ण ठेवून राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संमतीशिवाय तयार केलेली पहिली यादी काँग्रेसतर्फे उद्या शुक्रवारी किंवा शनिवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनसुब्यांना शह देण्यासाठीच काँग्रेसने हे आक्रमक धोरण स्वीकारल्याचे म्हटले जात आहे.

तिसऱ्या आघाडीचा पुर्नजन्म
तुमकूर, १२ मार्च/पीटीआय

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर माकप, भाकप, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक हे डावे पक्ष, भजनलाल यांचा हरयाणा जनहित काँग्रेस, तेलुगू देसम, जनता दल सेक्यूलर, तेलंगण राष्ट्रीय समिती या आठ पक्षांनी एकत्र येऊन आज तिसऱ्या आघाडीची स्थापना केली. भाजप व काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील आघाडय़ांना समर्थ पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडी स्थापना करण्यात आल्याचे यासंदर्भात सांगण्यात आले. तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेनिमित्त कर्नाटकमधील तुमकूरमध्ये आज आयोजिलेल्या जाहीर सभेला अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता व बसपाच्या प्रमुख मायावती या उपस्थित राहिल्या नाहीत मात्र या सभेला त्या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.जनता दल सेक्यूलरचे प्रमुख व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या जाहीर सभेच्या आयोजनाची जबाबदारी पेलली होती.

रायगड जिल्ह्य़ातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दहा तहसीलदार व चार नायब तहसीलदारांच्या बदल्या
अलिबाग, १२ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ातील विशेष भूसंपादन अधिकारी (पनवेल) नंदकुमार कोष्टी, अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी रेवती गायकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आर. एन. गरुड, विशेष भूसंपादन अधिकारी (माणगांव), एम. एन. कुर्तकोटी आणि माणगाव उपविभागीय महसूल अधिकारी जगन्नाथ विरकर या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह श्रीवर्धन, रोहा, तळा, खालापूर, माणगाव, मुरुड, पनवेल, पेण, अलिबाग आणि उरण या दहा ठिकाणच्या तहसीलदारांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहेत.याबरोबरच चार नायब तहसीलदारांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. पनवेल विशेष भूसंपादन अधिकारीपदी ठाणे येथील निवासी उपजिल्हाधिकारी एस. एस. भिसे, अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारीपदी गणेश जगताप, विशेष भूसंपादन अधिकारी माणगाव येथे जव्हार उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली चव्हाण, माणगाव उपविभागीय महसूल अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी कोकण भुवन एस. बी. दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पेणनजीक अपघातात तीन ठार, ११ जखमी
पेण, १२ मार्च/वार्ताहर

मुंबई- गोवा महामार्गावर पेणनजीक पांडापूर गावाच्या हद्दीत भरधाव जाणारी क्वॉलिस ट्रेलरवर आदळून झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार तर ११ जण जखमी झाले. आज साडेपाचच्या सुमारास गणपतीपुळे येथून बदलापूर येथे जाणारी क्वॉलिस बंद स्थितीतील ट्रेलरवर जोरात आदळली. क्वॉलिस चालक किशोर रामचंद्र साळवी (४३, रा. बदलापूर), स्मिता बाजीराव भोसले (२२, रा. जोगेश्वरी), वैशाली नीलेश साळवी (२८, रा. नवी मुंबई) हे जागीच ठार झाले, तर जखमी व्यक्तीही साळवी कुटुंबातील असून त्यांना पनवेल येथील लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.

मद्यपी वाहनचालकांचे परवाने रद्द
मुंबई, १२ मार्च / प्रतिनिधी
रंगपंचमीनिमित्त मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या एकूण ३३३ जणांपैकी १७६ जणांना आज वाहतूक पोलिसांतर्फे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैकी ९० मद्यपी वाहन चालकांना न्यायालयाने दोषी ठरवून एक ते ३० दिवसांपर्यंतची शिक्षा सुनावली. एवढेच नव्हे तर त्यांचे वाहन परवानेही सहा महिन्यांकरिता रद्द केले. वाहतूक पोलीस उपायुक्त हरीश बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी मद्यपान करून गाडी चालविणाऱ्या एकूण ३३३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी १७६ जणांना आज वांद्रे व मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने ९० जणांना दोषी ठरवून त्यांना एक ते ३० दिवसांपर्यंतची शिक्षा सुनावली. तसेच त्यांचे वाहन परवाने सहा महिन्यांकरिता रद्द केले. उर्वरित मद्यपी वाहन चालकांची न्यायालयाने एक ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठवून सुटका केली. वाकोला, मालाड, बोरिवली आणि ट्रॉम्बे या चार भागांत मोठय़ा प्रमाणात मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याचे बैजल यांनी सांगितले.

बीपीओ आणि कॉलसेंटरविषयक पुस्तकाचे आज प्रकाशन
मुंबई, १२ मार्च / प्रतिनिधी

सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात बीपीओ आणि कॉलसेंटर मधील तरुणांपुढे पुन्हा एकदा नोकरी राहते की जाते असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर भारतातील कॉलसेंटर आणि बीपीओविषयक ‘बीपीओ सूत्र’ या पुस्तकाचे उद्या (१३ मार्च) शुक्रवारी मुंबईत प्रकाशन होत आहे. सुधींद्र मोकाशी यांनी लिहिलेल्या ‘बीपीओ सूत्र-ट्र स्टोरीज् फ्रॉम इंडियाज बीपीओ अ‍ॅण्ड कॉल सेंटर’ असे या पुस्तकाचे नाव आहे. क्रॉसवर्डच्या केम्सकॉर्नर येथील पुस्तकांच्या दुकानात उद्या शुक्रवारी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध कादंबरीकार चेतन भगत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

 


प्रत्येक शुक्रवारी