Leading International Marathi News Daily
शनिवार, १४ मार्च २००९

पंतप्रधानपदासाठी माझे नाव जाहीर करा - मायावती
नवी दिल्ली ,बंगलोर १३ मार्च/पीटीआय

तिसऱ्या आघाडीने पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या नावाची घोषणा करावी, असा आग्रह बहुजन समाज पक्षाने धरला असून या नेत्यांचे मन वळवण्यासाठी त्यांनी येत्या १५ मार्चला नवी दिल्ली येथे भोजन बैठकीचे आयोजन केले आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांना त्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तिसऱ्या आघाडीने माझे नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करावे नाहीतर तिसऱ्या आघाडीत आमच्या पक्षाला गृहित धरू नका, असे स्पष्ट संकेत मायावती यांनी दिले आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत निवडणुकीपूर्वीच भांडणे लागल्याचे चित्र आहे. गुरुवारी तुमकूर येथे तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यात आली होती त्यावेळी उपस्थित असलेले मायावतींचे प्रतिनिधी व पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी सांगितले की, मायावती यांना पंतप्रधानपदावर आणणे हे बहुजन समाज पक्षाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मायावती यांनी दिल्लीत १५ मार्च रोजी बोलावलेल्या बैठकीला विशेष महत्व आहे. त्या बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा प्रश्न चर्चिला जाण्याची शक्यता आहे. जनता दल सेक्युलरच्या सूत्रांनी सांगितले की, १५ मार्चला होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधानपदाचा मुद्दा नसेल तर तिसऱ्या आघाडीचे राष्ट्रीय धोरण काय असावे यावर चर्चा होईल. सतीशचंद्र मिश्रा हे तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेवेळी उपस्थित होते तरी अजूनही बहुजन समाज पक्षाने आपण तिसऱ्या आघाडीत असल्याचे एकमुखाने जाहीर केलेले नाही. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत तिसरी आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कुणाच्या नावाची घोषणा करणार नाही, असे भाकप सरचिटणीस बर्धन यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानपदावर आता महाराष्ट्रातील व्यक्ती असावी - पवार
पुणे १३ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदावर आता महाराष्ट्रातील व्यक्ती आली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. यूपीए किंवा एनडीए यांना पुरेसे बहुमत मिळाले नाही तर काहीही घडू शकते असेही त्यांनी सूचित केले. पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांना सांगितले की, आतापर्यंत आंध्र प्रदेश,गुजरात, कर्नाटक या राज्यातील नेत्यांना दक्षिणेतून पंतप्रधानपदासाठी संधी मिळाली आता महाराष्ट्राला संधी मिळालीच पाहिजे अशी भावना आहे. काँग्रेसने निवडणूक पूर्व युती करण्याचे टाळल्याने राज्य पातळीवर युतीचे धोरण ठेवण्यात आले आहे. आमच्या पक्षाकडे पंतप्रधानपदासाठी पुरेसे संख्याबळ नाही असे कबूल करून ते म्हणाले की, आमचा पक्ष देशात केवळ ३०-३५ जागांवर लढत असताना पंतप्रधानपदाची आशा ठेवणे योग्य वाटत नाही.जनमत स्पष्ट नसेल तर तिसरी आघाडी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते, असेही ते म्हणाले. समविचारी पक्षांनी मजबूत व स्थिर सरकार देण्यासाठी एकत्र यावे असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, सध्या देश कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असताना स्थिर व मजबूत सरकार असणे गरजेचे आहे. शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी मराठी माणसाला पाठिंबा देण्याची भाषा केल्याने भाजप-सेना युतीत वितुष्ट आले होते त्यावर विचारले असता पवार म्हणाले की, मराठी माणसांना पाठिंबा देणे हे शिवसेनेचे धोरण आहे, राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता.

आयपीएलवर टांगती तलवार
तिढा सोडविण्यासाठी ललित मोदी यांची दिल्लीकडे धाव ’ नव्या तारखांसाठी अनुकूल
नवी दिल्ली, १३ मार्च / पी. टी. आय.
आयपीएलच्या सध्याच्या कार्यक्रमानुसार ही स्पर्धा खेळविणे शक्य होणार नसल्याने संयोजकांनी पुन्हा एकदा नव्या तारखा निश्चित कराव्यात, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर बऱ्याच राज्य सरकारांनी त्याच दरम्यान, होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांना सुरक्षा व्यवस्था कशी पुरवायची याविषयी चिंता व्यक्त केल्यानेच गृहमंत्रालयाने संयोजकांना स्पर्धेच्या सुधारित कार्यक्रम देण्यास सांगितले आहे.

अखेर युती!
मात्र उद्धव, मुंडे-गडकरी यांच्या अनुपस्थितीत
मुंबई, १३ मार्च/प्रतिनिधी
होणार की नाही, याबाबतच्या असंख्य वावडय़ा उठवत अखेर सेना-भाजपा युती आज जागावाटपासह जाहीर झाली. मात्र ही युती भाजपतर्फे त्यांचे दुसऱ्या फळीतील नेते विनोद तावडे तर शिवसेनेतर्फे त्यांचे दुसऱ्या फळीतील नेते सुभाष देसाई यांनी जाहीर केली. शिवसेना २२ तर भाजपा २६ अशा जागावाटपासह युती जाहीर करण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी हजर राहावे, या भाजपच्या दबावाला उद्धव बळी पडले नाहीत. भाजपच्या राज्य नेतृत्वाबरोबर आपण युतीची घोषणा करण्यास तयार नसल्याचे त्यांनी भाजपला स्पष्ट शब्दांमध्ये सुनावल्याचे समजते.

पंजाबमधील अध्यक्षीय राजवट संपविण्यास झरदारी राजी
अमेरिका, इंग्लंड व पाकिस्तानी लष्कर यांच्या पुढाकाराने तोडगा
इस्लामाबाद १३ मार्च/पीटीआय
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी पंजाबमधील अध्यक्षीय राजवट उठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे विरोधी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाला त्या राज्यात सरकार स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

राज्यात गारपीट- पाऊस
आंबा बागायतदार धास्तावले
पुणे, १३ मार्च / खास प्रतिनिधी

होळीच्या सणानंतर उन्हाळा सुरू होताच पुणे आणि कोकणसह राज्याच्या अनेक भागांत आज पहिल्या जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. शहराच्या सर्वच भागात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडला, तर काही ठिकाणी गारांचा वर्षांवही झाला. येत्या दोन दिवसांतही शहरात ढगाळ वातावरण कायम राहून मुसळधार सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. पुण्याप्रमाणेच सातारा, औरंगाबाद जिल्हा आणि रत्नागिरीतही पावसाची नोंद झाली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली हवामानाची स्थिती तसेच, गेले काही दिवस कायम असलेली तापमानवाढ यामुळे वादळी पाऊस पडल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले. त्यामुळेच येत्या दोन दिवसांतही मुख्यत: कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणात वादळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात सुमारे अर्धा तास वळवाचा पाऊश आणि गारांचटा वर्षांव झाला त्यामुळे आंबा बागायतदारांपुढे यावर्षीही आंब्याच्या दर्जाचे संकट उभे राहिले आहे.

पाकिस्तानच्या प्रश्नांना भारताकडून उत्तरे
नवी दिल्ली, १३ मार्च/पीटीआय

मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या संदर्भात पाकिस्तानने उपस्थित केलेल्या प्रश्नांना अखेर भारताने उत्तर दिले असून त्यात फोरेन्सिक अहवालासह इतर अनेक पुरावे जोडण्यात आले आहेत.र्सवकष व ठोस पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानने मुंबई हल्ल्याच्या चौकशीला गती द्यावी अशी अपेक्षा भारताने आज व्यक्त केली. पाकिस्तानने हे प्रश्न उपस्थित करून महिना लोटल्यानंतर भारताने ही उत्तरे दिली आहेत. एकूण ४०० पानांची कागदपत्रे परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त शाहीद मलिक यांच्याकडे सुपूर्द केली. कागदपत्रांच्या या दुसऱ्या संचात दहा हल्लेखोरांचे संभाषण, हातांचे ठसे, जीपीएसचे फोरेन्सिक विश्लेषण ही माहिती आहे, गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी सांगितले की, पाकिस्तानने विचारलेल्या प्रश्नांची अतिशय समर्पक व समाधानकारक उत्तरे आम्ही दिली आहेत. हे हल्ले घडवून आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास हे पुरावे पुरेसे आहेत. चिदंबरम यांनी कागदपत्रे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांना सादर केली व त्यांनी मेनन यांच्याकडे दिली. पाकिस्तानने उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यात उत्तरे दिली आहेत पाकिस्तानने एकूण ३० प्रश्न विचारले होते त्यांचा परामर्श घेण्यात आल्याचे मुखर्जी यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितले.

एस. एस. विर्क राज्याचे पोलीस महासंचालक
मुंबई, १३ मार्च / प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या गृहमंत्रालयाने आज एस. एस. विर्क यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. तसेच या नियुक्तीची घोषणा करताना विर्क यांची निष्ठा आणि कामगिरीवर आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत गृहमंत्री जयंत पाटील यांनी विर्क यांच्याविषयीच्या सर्व वादांना मूठमाती दिली. अनामी रॉय यांची महासंचालकपदी केलेली नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द करीत राज्य सरकारला लवकरात लवकर नव्या पोलीस महासंचालकाच्या नियुक्तीचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने नियुक्तीसाठी वाढवून दिलेली मुदत आज संपत असतानाच गृहमंत्रालयातर्फे राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून विर्क यांची नियुक्ती केली. विर्क येत्या ३१ जुलै रोजी सेवानिृत्त होणार आहेत.

 


प्रत्येक शुक्रवारी