Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

निवडणूक प्रचारासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. प्रचारात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या भाजपच्या सहभागाची माहिती देणाऱ्या ‘व्हिजन ऑन आय.टी.’चे प्रकाशन शनिवारी जेष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केले.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही -मुलायम
लखनौ, १४ मार्च/पीटीआय

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे आज स्पष्ट केले. त्याचबरोबर बसपा नेत्या मायावती यांच्यावर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्याबद्दल टीका केली. लखनौ येथे वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, मी शर्यतीत नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीनंतर ठरवला जाईल. बसपा नेत्या मायावती यांनी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा ठेवल्याबाबत उल्लेख करून ते म्हणाले की, जब महारानी आ गयी हैं तो अब कौन आयेगा।

मायावतींचा महाराष्ट्रातही झंझावात!
बंधुराज लोणे , मुंबई, १४ मार्च

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना उमेदवार ठरवितानाच घाम आला आहे. असे असताना बहुजन समाज पक्षाने मात्र राज्यातील या प्रमुख पक्षांना प्रचारातही मागे टाकले असून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या महाराष्ट्रात दोन सभा घेण्याचे निश्चित केले आहे. यापैकी एक सभा मुंबईत होणार असून या सभेसाठी शहरातील शिवाजी पार्कपेक्षा मोठे मैदान शोधण्याच्या कामाला बसपचे कार्यकर्ते लागले आहेत.

दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीत राडा?
राजेंद्र जोशी, कोल्हापूर, १४ मार्च

खासदार मंडलिकांनी डागलेली तोफ, उदयनराजेंचा ठेंगा आणि आमदार राजू शेट्टींची उमेदवारीची घोषणा यामुळे दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राडा झाला आहे. पक्षाच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींनी निष्ठा आणि कार्यकालापेक्षा ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ला अधिक प्राध्यान्य दिल्याने एकेकाळी पक्षाविरूध्द कट्टर विरोधात निवडणूक लढविणाऱ्यां वाजंत्री लावून पक्षप्रवेश देण्याची वेळ आली आहे.

आयत्या ‘पिठा’ वर रेघोटय़ा
इच्छुकांच्या मुलाखतीसाठी टिळक भवनात एकाच गर्दी जमलेली. इच्छुक व त्यांच्या झिलकऱ्यांच्या गर्दीमुळे टिळक भवनाचा परिसर फुलून गेलेला. एका इच्छुकाचे नाव पुकारले जाते हे इच्छुक तरणेबांड. वडिलोपार्जित शिक्षण संस्था नामक मिळकतीचा आलेला वारसा! या मिळकतीच्या जोरावर आपण ‘विश्व’ ही जिंकू असा त्याला विश्वास असतो. असे हे इच्छुक आत जातात. मुलाखत घेण्यासाठी एकाहून एक नामी मंडळी जमलेली. त्यात इच्छुकांचे पिताश्रीही असतात. या पिताश्रींना आपल्या मुलाचा ‘पतंग’ दिल्लीच्या पटांगणात उडवायची घाई झालेली असते. मुलगा मुलाखतीसाठी आल्यावर पिताश्री बाहेर जातील, असे मुलाखती घेणाऱ्या अनेकांना वाटते. पण या नेत्याने असले शिक्षण घेतलेच नव्हते. उलट मुलाची मुलाखत कौतुकाने बघू, असं त्यांचं मत होतं. त्यांनी आयुष्यभर शिक्षकपदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे मुलाखतींमध्ये ते मुरलेले होते.

पाम्स बिफोर माय फिट
बुधवार, २५ जून १९७५ पासून ६३५ दिवस देशात आणीबाणी होती. दरम्यान रविवार, २३ जानेवारी १९७७ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या, तेव्हा पुढे काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नसावी. उलट आणीबाणीच्या काळात अनधिकृत सावकारी, साठेबाजी, शोषण, भ्रष्टाचार यांना पायबंद घातल्याने जनतेत आपली प्रतिमा अधिक उजळ झाली असेल, असेच त्यांना वाटले असेल. निवडणुका जाहीर होताच बंदिवासातील राजकीय नेत्यांची सुटका झाली आणि संघटना काँग्रेस, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि तेव्हाचा संयुक्त समाजवादी पक्ष (एसएसपी) या चार पक्षांनी एकत्र येऊन ‘जनता पक्ष’ हा नवा पक्ष स्थापन केला. उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघात १९७१ मध्ये इंदिराजींकडून एक लाखांवर मतांनी पराभूत झालेले राजनारायण यांना जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली.

जयप्रकाश पवार, नाशिक, १४ मार्च
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील रस्सीखेचीमुळे सध्याची आघाडी बिघाडीत परावर्तीत होते की काय, असे संभ्रमाचे वातावरण असताना, आता कुठे बिहार राज्यात बस्तान बसवू पाहणाऱ्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीच्याच तोंडावर खिंडार पडले आहे. या पक्षाचे एक प्रमुख नेते आणि बिहारच्या राजकारणातील प्रभावशील नेते उपेंद्र कुशवाह यांनी वेगळी चूल मांडत ‘राष्ट्रीय समता पार्टी’ची स्थापना केली असून या पक्षाच्यावतीने लोकसभेसाठी बिहारातील सुमारे डझनभर जागा लढविण्याची घोषणाही केल्याने तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मनसे लढविणार मुंबईतील सहाही जागा!
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी

येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा स्वबळावर लढविणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केले.

एनडीए सत्तेवर आल्यास नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्रे सक्तीची -अडवाणी
नवी दिल्ली, १४ मार्च/पीटीआय

एनडीए सत्तेवर आल्यास नागरिकांना राष्ट्रीय ओळखपत्रे सक्तीची करण्यात येतील तसेच विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयात लॅपटॉप देण्यात येतील तसेच दारिद्य््रा रेषेखालील लोकांना मोफत मोबाईल फोन देण्यात येतील, असे आश्वासन भाजप नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आज दिले. भाजपचे आयटी व्हिजन डॉक्युमेंट मांडताना त्यांनी सांगितले की, एनडीए सत्तेवर आल्यास माहिती तंत्रज्ञानावर भर दिला जाईल तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्याचा वापर करण्यात येईल. मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती केली जाईल.

जेटली नरमले, पत्रकारांदेखत ‘परतले’
नवी दिल्ली, १४ मार्च/खास प्रतिनिधी

‘सर, जेटलीजी को भी उपर बुला लिजिये..’ भाजप मुख्यालयाच्या सभागृहात छायाचित्रकार व वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरमननी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केलेल्या विनंतीमुळे गर्दीत उभे असलेल्या ‘बंडखोर’ जेटलींकडे सर्वांचे लक्ष गेले.. पक्षाचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी आपली खुर्ची रिकामा करीत जेटलींना तात्काळ व्यासपीठावर जागा दिली आणि ओशाळलेल्या चेहऱ्याने जेटली आसनस्थ झाले!

तिसऱ्या आघाडीकडे कुठलाही कार्यक्रम नाही-मुखर्जी
नवी दिल्ली, १४ मार्च/पीटीआय

तिसऱ्या आघाडीकडे कुठलाही समान कार्यक्रम नाही, त्यांना सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली कुठलीही दृष्टी नाही अशी टीका काँग्रेसने आज केली असून मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याची शक्यता फेटाळताना पक्षाने म्हटले आहे की, यूपीएतील पक्ष हे राष्ट्रीय पक्ष नाहीत.

तिसरी आघाडी ही ‘पार्किंग लॉट’सारखी; भाजपची टीका
बंगळुरू, १४ मार्च/वृत्तसंस्था

डावे व काही प्रादेशिक पक्षांनी मिळून स्थापन केलेली तिसरी आघाडी ही एखाद्या ‘पार्किंग लॉट’ प्रमाणे असून ते एकप्रकारचे मृगजळच आहे अशी टीका भाजपने आज केली. लोकसभा निवडणुकांमध्ये मुख्य सामना हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए व भाजपप्रणित एनडीए यांच्यातच होणार आहे असेही भाजपने म्हटले आहे.

टी. एम. कांबळे, कवाडेंची तिसऱ्या आघाडीकडे चाचपणी
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे दाळ शिजत नसल्याने आता रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी आमदार टी. एम. कांबळे आणि माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी आता तिसऱ्या आघाडीचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वच रिपब्लिकन गटांशी काँग्रेस आघाडीने चर्चा करावी आणि आठ जागा सोडव्यात, अशी मागणी आज कांबळे यांनी केली. राज्यातील नेते काहीच प्रतिसाद देत नसल्याने आता सोनिया गांधी यांनीच रिपब्लिकन नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवावा, अशी मागणीही कांबळे यांनी केली आहे.