Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
राज्य

प्रादेशिक

विविध

क्रीडा

राशिभविष्य

प्रतिक्रिया

मागील अंक

वृत्तांत

नागपुर वृत्तांत


निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे..
उमेदवारांच्या नावांचे झेंडे देखील फडकायला लागले आहेत..
कालचे 'घरभेदे' उद्याचे 'आधारस्तंभ' भासायला लागले आहेत..
जातीपातींची नवी समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत..
एकीकडे विद्यमान आघाडय़ा बिघडायला लागल्या आहेत,
तर दुसरीकडे नव्या आघाडय़ा जन्म घेताना दिसू लागल्या आहेत..
आघाडी कितवी म्हणावी..
तिसरी, चौथी, पाचवी... की दहावी..
असा प्रश्न पडावा, असं सभोवतालचं वातावरण आहे..
वाट पाहिली जात्येय ती फक्त निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची..
बदलत्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रांचा वेध आम्ही वर्षभर घेतोच आहोत..
पण आता आम्हाला हवा आहे, तुमचा अंदाज..
तो सुद्धा तीन सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमधून..
तुम्ही इतकंच करायचं..
सोबतच्या तीन प्रश्नांची उत्तरं लिहिलेलं कुपन आमच्याकडे लगेच भरून पाठवायचं..
अचूक उत्तरांना बक्षिसं आहेतच..
(कुपन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)

 

 

झरदारी नरमले!
सर्व पक्षांना चर्चेचा प्रस्ताव ’ शरीफ यांनी प्रस्ताव फेटाळला

इस्लामाबाद, १४ मार्च/पी.टी.आय/वृत्तसंस्था

सध्या अभूतपूर्व असे राजकीय संकट अनुभवणाऱ्या सत्ताधारी ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ने सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहून मवाळ भूमिका घेतली. त्यासाठी देशात पुन्हा शांतता आणि सुस्थिती आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चेची तयारी झरदारी यांनी दर्शविली. दरम्यान, पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी मात्र झरदारी यांच्या चर्चेचा प्रस्ताव शनिवारी फेटाळून लावला. झरदारींसोबत चर्चेस तयार नसून सरकार विरोधात ‘लाँग मार्च’ कोणत्याही परिस्थितीत पार पडेल, अशी भूमिका शरीफ यांनी घेतली आहे.

लष्कराला पाचारण?
विरोधी पक्षाने पाठिंबा दिलेल्या प्रस्तावित ‘लाँग मार्च’ इस्लामाबादेत येण्यापूर्वीच दडपून टाकण्याचा भाग म्हणून पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील संवेदनाशील क्षेत्रांमध्ये शनिवारी लष्कराला पाचारण करण्याचे आदेश दिले. मात्र आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यासच इस्लामाबादेत लष्कर आणले जाईल, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले. लष्कराला दक्ष राहण्याचे आदेशही दिले गेले आहेत. मात्र आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यासच लष्कर इस्लामाबादमध्ये शिरेल, असे वरिष्ठ लष्करी प्रवक्ते अथर अब्बास यांनी ‘डॉन’ वृत्त वाहिनीला सांगितले. लष्कराच्या सर्व मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या १११ व्या ब्रिगेडने नुकतीच एक बैठक घेऊन इस्लामाबाद आणि त्याजवळील शहरांच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला आहे. ’

शेरी रेहमान यांचा राजीनामा
प्रसार माध्यमांबाबत घेतल्या जाणाऱ्या गळपेची धोरणांमुळे पाकिस्तानच्या माहिती प्रसारणमंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या शेरी रेहमान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये होती. शेरी रहमान या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. विरोधी पक्षाकडून विविध प्रश्नांवरून धारेवर धरले जात असतानाच रेहमान यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला मोठा हादरा बसला आहे. ‘जीओ न्यूज’ या वाहिनीच्या देशभरातील प्रसारणावर बंदी घातली गेल्यानंतर रेहमान यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

बोहारणीचा मालही ओसियान्सच्या बाजारात!
विनायक परब, मुंबई, १४ मार्च

घरातील जुने झालेले कपडे खास करून विविध प्रकारच्या साडय़ा एकत्र करून बोहारणीला देवून त्या बदल्यात एखादे भांडे पदरात पाडून घेण्याची क्लृप्ती अनेक वर्षे गृहिणींतर्फे वापरली जात आहे. मात्र आता यापुढे अशा साडय़ा विकताना थोडा विचार नक्कीच करावा लागेल.. याला कारणही तसेच आहे. भारतीय कलेच्या बाजारपेठेने गेल्या काही वर्षांंमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. एम. एफ. हुसेन, सैयद हैदर रझा, वासुदेव गायतोंडे आणि अमृता शेरगिलच्या चित्रांनी जागतिक बाजारपेठेत काही कोटींची किंमत मिळवल्यानंतर ओसियान्स या कला क्षेत्रातील लिलाव कंपनीने आता समकालीन हस्तकलेच्या नावाखाली थेट बनारसी, पटोला आणि तंजूर सिल्क साडय़ाही लिलावाच्या बाजारपेठेत आणल्या आहेत. यात ८० वर्षे जुनी तंजूर सिल्क १२ ते १५ हजारांना, बनारसी साडी ३२ ते ४० हजारांना तर पटन पटोला मात्र तब्बल एक लाख ६० हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत विकली जाणे लिलाव आयोजक कंपनीला अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्व १३ जागांसाठी काँग्रेसची यादी तयार
राष्ट्रवादीच्या तीन जागांचा समावेश
नवी दिल्ली, १४ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानची जागावाटपाची बोलणी निष्फळ ठरत चालल्याचे पाहून आज काँग्रेसने महाराष्ट्राच्या छाननी समितीच्या बैठकीत १६ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील सर्व १३ जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या १३ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या वाटय़ाच्या भंडारा-गोंदिया, िहगोली आणि परभणी या मतदारसंघांचाही समावेश आहे. काही विशिष्ट जागांवर अडून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जागावाटपाची प्रगती होऊ शकली नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.त्यामुळेच आज दुपारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि चौधरी वीरेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील १३ मतदारसंघांसाठी उमेदवारांचे पॅनेल तयार करण्यात आले.

राखीव मतदारसंघांची राष्ट्रवादीला ‘अ‍ॅलर्जी’?
सर्वत्र ‘मैत्रीपूर्ण’ लढतींचा काँग्रेसचा प्रस्ताव
नवी दिल्ली, १४ मार्च/खास प्रतिनिधी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून उद्भवलेले मतभेद संपुष्टात येण्यापूर्वी आणखी गंभीर होत चालले आहेत. दलित उमेदवारांसाठी राखीव असलेल्या पाचपैकी दोन जागा स्वीकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अजिबात स्वारस्य नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करीत आहेत. १९-१९ जागांवर सहमती झाल्यानंतर मतभेद असलेल्या उर्वरित १० जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या, असे राष्ट्रवादीने सुचविले आहे. पण मैत्रीपूर्ण लढती करायच्या असतील तर सर्व ४८ मतदारसंघांमध्ये होऊन जाऊ द्या, अशी काँग्रेसने भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पुण्याच्या वीजपुरवठय़ावर परिणामाची शक्यता
नागपूर,अमरावतीला अखंड वीजपुरवठय़ासाठी टाटा पॉवरची अतिरिक्त वीज
पावलस मुगुटमल, पुणे, १४ मार्च

पुणे, ठाणे व वाशी या शहरांप्रमाणेच नागपूर व अमरावती येथे अखंड वीजपुरवठय़ासाठी अतिरिक्तवीज देण्यास टाटा पॉवर कंपनीने तयारी केली आहे. मात्र, टाटा पॉवरकडून मागील काही दिवसांमध्ये पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत नागपूर व परभणीला वीज दिल्यास त्याचा परिणाम पुण्यासह ठाणे व वाशी येथील वीजपुरवठय़ावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी या शहरांना पुरेशी वीज देण्याची हमी घेऊनच नागपूर व अमरावतीसाठी टाटा पॉवरची वीज घेण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

सागरी वाऱ्यांच्या गती बदलामुळे कोकणात अवकाळी पावसाचा तडाखा
खास प्रतिनिधी, रत्नागिरी, १४ मार्च

अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या नियमित गतीमध्ये बदल झाल्यामुळे गेले दोन दिवस रत्नागिरीजिल्ह्यासह कोकणच्या बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
हाताशी आलेल्या आंब्याच्या पिकावर या पावसामुळे बुरशीजन्य रोग पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे, तर समुद्रामध्ये जोरदार वारे वाहत असल्यामुळे बहुसंख्य मच्छिमार नौका किनाऱ्यावरच विसावल्या आहेत. गेले काही दिवस कोकणात अनेक ठिकाणी अचानक दिवसाचा तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली होती. त्या तुलनेत रात्री आणि पहाटे मात्र सुखद गारवा होता.

 


प्रत्येक शुक्रवारी