Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

‘सरकारी काम वर्षांनुवर्षे थांब!’
न्यायदंडाधिकारी कार्यालयाला तब्बल ३४ वर्षांनी मंजुरी

उस्मानाबाद, १४ मार्च/वार्ताहर

‘सरकारी काम आणि वर्षभर थांब’ ही म्हण तुम्हा-आम्हासाठी. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर काम लवकर होते, असा समज सरकारी यंत्रणेने मोडीत काढत उस्मानाबादच्या उच्च न्यायदंडाधिकारी कार्यालयासाठी लागणारी इमारत तब्बल ३४ वर्षांनी मंजूर केली असल्याचा गौप्यस्फोट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. बी. देशमुख यांनी आज केला आणि सारेच अवाक् झाले.

..देत जावे
हुश्श! काम संपले. एक दिवस मार्गी लागला. थकूनभागून कार्यालया-बाहेर पडलो. बसथांब्यावर. बसची वाट पाहायची आता. पर्याय नाही. पिशवी या खांद्यावरून त्या खांद्यावर ओढत उभा. तेवढय़ात एक वृद्ध आला. घोटय़ाच्या वर धोतर. अंगात तीन गुंडय़ांचा सदरा. डोक्यावर पटका. सोबत बाई. एक लेकरूही. ‘‘साह्य़ेब, दोन दिवसांपासून उपाशी आहे. पोरगं कावलंय भुकेनं. गाडी चुकली. काही तरी द्या..’’ विनंती. काही तरी देण्याची. काही तरी म्हणजे पैसेच. खिशात हात घातला. दहा रुपयाची नोट होती. बाबांच्या हातात दिली. भरमसाठ दुवा देत तो वृद्ध बाई-लेकरासह पुढे गेला.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान
सिल्लोड, १४ मार्च/वार्ताहर

सिल्लोड शहरासह तालुक्यातील काही भागांत आज सायंकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाने रब्बी हंगामातील तोंडी आलेल्या पिकांचे व मोहोरलेल्या आंब्यांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी व शनिवारी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह तालुक्यात अवकाळी पाऊस झाला.

शिवसेना-भा.ज.प. प्रत्येकी चार जागा लढविणार
औरंगाबाद, १४ मार्च/खास प्रतिनिधी

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती कायम राहिली आहे. गेल्या २० वर्षांची जुनी युती कायम झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला आहे. जागा वाटपानुसार मराठवाडय़ात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष चार-चार जागा लढविणार आहेत. गेल्या पाच निवडणुकीत चार-चार जागाच उभय पक्षांनी लढविल्या होत्या. यंदाही तेवढय़ाच जागा सेना आणि भारतीय जनता पक्ष लढविणार आहेत.

तिसरी आघाडी सत्तेवर येणार नाही - मुंडे
बीड, १४ मार्च/वार्ताहर

देशातील आठ राज्यांत भारतीय जनता पक्ष व पुरस्कृत मित्रपक्षांची सरकारे आहेत. त्यामुळे यावेळी केंद्रात भारतीय जनता पक्षचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून जनतेचा कल द्विपक्षीय लोकशाहीकडे असल्यामुळे तिसऱ्या आघाडीची सत्ता येण्याची सुतराम शक्यता नाही, असे स्पष्ट करून केवळ ४० जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठी माणूस शरद पवार पंतप्रधान होणार कसे, असा प्रश्न करून मतदारांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत भारतीय जनता पक्षचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेच्या इच्छुकांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
परभणी, १४ मार्च/वार्ताहर

परभणी लोकसभेसाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी आज मुंबईत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन पक्ष जो उमेदवार देईल त्याचे इमानेइतबारे काम करण्याची हमी त्यांनी दिली. बैठकीत इच्छुक उमेदवार सुरेश जाधव हे गैरहजर होते. या मतदारसंघातून आमदार संजय जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी राज्यमंत्री गणेशराव दुधगावकर, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख प्राचार्य डॉ. शिवाजी दळणर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रताप बांगर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. एकापेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने आज सर्वानाच ‘मातोश्री’हून बोलावणे आले होते. खासदार तुकाराम रेंगे-पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या स्थितीबद्दल माहिती घेतल्याचे समजते. बंडखोरीचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याबाबतही मत जाणून घेतले. बैठकीला सुरेश जाधव उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्यामुळे आपण पोहोचू शकलो नाही, असे सांगितले. दोन दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.

मघा येथे तरुणाचा खून
उदगीर, १४ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील मघा येथे एका तरुणाचा खून करून मृतदेह कडब्याच्या गंजीत टाकून जाळला. कुत्र्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढल्याने खुनाचा प्रकार लक्षात आला. प्रेताचीच ओळख पटली नसून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजकुमार पाटील यांच्या शेतात कडब्याची गंजी रचण्यासाठी गोळा केलेल्या कडब्याला अचानक आग लागली. अन्य शेतकरी शेतात जाईपर्यंत आग फोफावली होती. आग विझल्यानंतर कुत्र्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढला. देवणी पोलिसांनी पंचनामा केला असून अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उद्या ग्रामस्थांचे रास्ता रोको
गेवराई, १४ मार्च/वार्ताहर

गेवराई तालुक्यातील गुळज ते माळेगाव या ५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मगाणीसाठी सोमवारी (दि. १५) गुळजसह पाच गावांचे ग्रामस्थ औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील राक्षसभुवन फाटय़ावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. माळेगाव ते गुळज या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे वाहनांचे जाणे अवघड झाले आहे. गावात जाणारी बसही बंद झाली आहे. गुळजसह सुरळेगाव, पाथरवाला या गावांच्या लोकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गुळजचे सरपंच एम. व्ही. सोनवणे, उपसरपंच बापुराव चव्हाण आदींसह ग्रामस्थ व महिला सोमवारी रस्त्यावर रास्ता रोको करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीबाबत रिपब्लिकन पक्षाची बैठक
लातूर, १४ मार्च/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसंदर्भात लातूर येथील पत्रकार भवन येथे जिल्ह्य़ातील रिपब्लिकन पक्षाच्या (गवई गट) कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत दलितांच्या ज्वलंत प्रश्नावर व लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष एस. के. कदम होते. याप्रसंगी गौतम भालेराव, प्रमोद गायकवाड, सुबोध वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रा. अनंत लांडगे आदी उपस्थित होते. बैठकीस डॉ. सिद्धार्थ भालेराव, परभणी जिल्ह्य़ाचे उमेश लहाने, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बीड जिल्ह्य़ातील दोन परीक्षा केंद्रांमध्ये बदल
औरंगाबाद, १४ मार्च/खास प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी परळी येथील परीक्षा केंद्रात बदल करण्यात आला आहे. परळी वैजनाथ येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात बी.ए.-प्रथम, द्वितीय आणि तृतीय (आय ते क्यू आद्याक्षर), एम.कॉम. (ए ते झेड आद्याक्षरे) आणि एम.एस्सी. (ए ते झेड आद्याक्षरे) या परीक्षा होणार होत्या. या केंद्रावर बैठक व्यवस्था शक्य नसल्याने जवाहर कला व वाणिज्य महाविद्यालय येथे काही परीक्षार्थीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये जवाहर विद्यालयात बी.ए. प्रथम, द्वितीय, तृतीय (आय ते क्यू आद्याक्षर), एम. कॉम. (ए ते झेड आद्याक्षरे), एम.एस्सी. प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र (ए ते झेड आद्याक्षरे) असलेल्या परीक्षार्थीची परीक्षा होणार असल्याची माहिती विद्यापीठातून देण्यात आली. पाटोदा येथील जे. बी. एस. पी. कला महाविद्यालयात होणाऱ्या बी.एस्सी. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांच्या परीक्षा आता पी.व्ही.बी. महाविद्यालयात होणार आहे.

दूरसंचारचा मनोरा कोसळून एक ठार
परभणी, १४ मार्च/वार्ताहर

पाथरी-सेलू रस्त्यावरील हिस्सी शिवारात उभारण्यात येत असलेला भारत संचार निगमचा मोबाईलचा मनोरा अंगावर पडून मोटारसायकलवर रस्त्याने जाणाऱ्या तिघांपैकी एकजण ठार झाला, एकजण गंभीर जखमी झाला. पाथरी-सेलू या मुख्य रस्त्याच्या बाजूला हिस्सी शिवारात भारत संचार निगमच्या मनोऱ्याच्या उभारणीचे काम चालू आहे. हे काम अहमदाबाद येथील कल्पतरू पॉवर ट्रान्समिशनच्या वतीने करण्यात येत आहे. आज सकाळी हा मनोरा रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी रस्त्याने तिघेजण मोटारसायकलने जात होते. मनोऱ्या-खाली दबून शिवसेनेचे शाखाप्रमुख बाबुराव कवडे यांचा मुलगा राजाभाऊ कवडे याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या सुखदेव भीमराव गायके यास जबर मार लागल्याने परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वीजचोरी प्रकरणी खडी केंद्र मालकास शिक्षा
औरंगाबाद, १४ मार्च/खास प्रतिनिधी

खडी केंद्राला चोरून वीज वापरल्याप्रकरणी बीड येथील न्यायालयाने खडी केंद्र मालकाला दोन वर्षे सक्तमजुरी आणि चार लाख पन्नास हजार ८६ रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
बीड जिल्ह्य़ातील शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रामकिशन गुंजाळ यांच्या मालकीचे तिरुपती बालाजी खडी केंद्र आहे. ३१ जुलै २००७ ला महावितरणच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून खडी केंद्रावरील ३८ अश्वशक्तीच्या मोटारी चालविल्या जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकातील कनिष्ठ अभियंता लक्ष्मण बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. लातूर येथील पोलीस ठाण्यात २ ऑगस्ट २००७ ला गुंजाळ यांच्याविरुद्ध विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी बीड येथील मुख्य सत्र न्यायाधीश नितीन दळवी यांच्यासमोर झाली. न्यायालयाने खडी केंद्र मालक रामकिशन गुंजाळ यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. साडेचार लाख रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारतर्फे अॅड. उपेंद्र करमाळकर यांनी बाजू मांडली.

ग्राहक महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यास अटक
परभणी, १४ मार्च/वार्ताहर

येथील गुजरी बाजारात असलेल्या शहाणे ज्वेलर्सचे मालक गोविंद देविदासराव शहाणे यांना आज महिला ग्राहकाशी असभ्य वर्तन केल्याच्या गुन्ह्य़ावरून नानलपेठ पोलिसांनी अटक केली. या घटनेने आज बाजारात बराच वेळ खळबळ उडाली. येथील गुजरी बाजारातील सोन्या-चांदीचे व्यापारी गोविंद शहाणे (वय ५२) हे एका महिला ग्राहकाशी असभ्य वर्तन करताना आढळून आले. दुपारी २ च्या सुमारास ही महिला त्यांच्या दुकानावर आली होती. तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे बिंग फुटल्यानंतर बाजारात सर्वत्र ही बातमी पसरली. त्यामुळे दुपारी या दुकानासमोर मोठी गर्दी जमा झाली. नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना ही बातमी कळताच ते घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेची विचारपूस करून गोविंद शहाणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘अॅव्हलॉन’मधील तिघांना एअरलाईन्स सेवेत संधी
औरंगाबाद, १४ मार्च/प्रतिनिधी

अॅव्हलॉन अॅकॅडमीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना एअरलाईन्स सेवेत संधी मिळाली आहे. प्रशिक्षण संपण्याआधीच सेवेची संधी मिळाल्याने त्यांच्यात उत्साह दिसून येत असल्याचे संचालिका अर्चना अकोलकर यांनी सांगितले.जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोरील अॅव्हलॉन अॅकॅडमीमध्ये शिकणाऱ्या धनराज चव्हाण, मनीष नाईक व लक्ष्मी कसबे यांना खासगी एअरलाईन्स सेवेत संधी मिळाली. अॅव्हलॉन अॅकॅडमीमध्ये डिप्लोमा इन एअरपोर्ट मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतलेल्या धनराज चव्हाण यांची निवड किंगफिशर एअरलाईन्सने केली. त्यांना औरंगाबादच्या चिकलठाणा इन्टरनॅशनल एअरपोर्टवर संधी मिळाली आहे. डिप्लोमा इन ग्राऊण्ड स्टाफचे प्रशिक्षण घेतलेल्या मनीष नाईक आणि लक्ष्मी कसबे यांना नाशिक एअरपोर्टवर किंगफिशरने संधी दिली. एअरलाईन्स सेवेत सधी मिळाल्याबद्दल धनराज चव्हाण यांचा एमजीएमचे सचिव अंकुशकुमार कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनीष नाईक व लक्ष्मी कसबे यांच्या पालकांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार स्वीकारला.

अल्पवयीन मुलाकडून चोरीची दुचाकी जप्त
औरंगाबाद, १४ मार्च/प्रतिनिधी

विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

राजेंद्र दिघे यांच्या काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन
औरंगाबाद, १४ मार्च/ खास प्रतिनिधी

वैजापूरच्या सानेगुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांच्या ‘काळ्या आईची तहान’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पिंपळगाव-खंडाळा येथील शेतकरी प्रल्हाद शेळके यांच्या हस्ते प्रकाशन होईल. साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, कवी दासू वैद्य, डॉ. महेश खरात हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन समारंभाला साहित्यिकांनी आणि रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव दिलीप ढमाले, कचरू वेळंजकर, शाम राजपूत, सरदार जाधव यांनी केले आहे.

राष्ट्रवादीत पुनप्र्रवेश; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
औरंगाबाद, १४ मार्च/खास प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष विनोद पाटील, प्रदेश सचिव अभिजीत देशमुख यांच्यासह सात कार्यकर्त्यांना वर्षभरापूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यांना राष्ट्रवादीमध्ये पुनप्र्रवेश मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

रिक्षाच्या धडकेत मुलगा ठार
नांदेड, १४ मार्च/वार्ताहर

रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या रिक्षाची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात शंकर ऊर्फ प्रशांत प्रकाश शिंदे (वय ५ वर्ष) हा मुलगा ठार झाला. आज दुपारी सिडको परिसरात घडलेल्या या घटनेनंतर संतप्त जमावाने पाच-सहा रिक्षांची मोडतोड केली. ज्ञानेश्वरनगर परिसरात राहणारा प्रशांत शिंदे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या रिक्षाची जोरदार धडक बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यायानंतर तेथे जमलेल्या संतप्त जमावाने रिक्षांवर दगडफेक केली. सिडको पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आयुर्विमा कर्मचाऱ्यांतर्फे मुलाखत मार्गदर्शिकेचे आज प्रकाशन
औरंगाबाद, १४ मार्च/खास प्रतिनिधी

आयुर्विमा महामंडळ कर्मचारी फेडरेशनतर्फे सहाय्यक भरतीसाठी मुलाखत मार्गदर्शिका प्रकाशित केली जाणार आहे. हा समारंभ अदालत रस्त्यावरील रत्नप्रभा मोटर्सच्या सभागृहात रविवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.

सोलापूर ते जळगाव रेल्वेमार्गाची पाहणी ३१ डिसेंबरपर्यंत
औरंगाबाद, १४ मार्च/खास प्रतिनिधी

सोलापूर ते जळगाव या साडेचारशे किलोमीटर नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे सोलापूरचे उपअभियंता श्री. कांबळे यांनी दिली. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा व स्वातंत्र्यसैनिक श्रीमती तारा लड्डा यांनी श्री. कांबळे यांच्याशी चर्चा केली. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, गेवराई, पैठण, औरंगाबाद, वेरुळ, अजिंठा आणि जळगाव असा हा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची जाहीर निविदा २६ मार्चला सोलापूर येथे उघडली जाणार आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाला जूनपासून प्रारंभ होऊन ते डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. २०१० आणि २०११ या दोन वेगळ्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण केला जाईल, अशी माहितीही श्री. कांबळे यांनी दिली. सोलापूर ते नवी दिल्ली जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना हा मार्ग जवळचा असणार आहे. या मार्गामुळे तुळजापूर, पैठण, वेरुळ आणि अजिंठा ही पर्यटन केंद्रे रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत.

बालन्यायाबाबत कार्यशाळेस लातुरात उत्तम प्रतिसाद
लातूर, १४ मार्च/वार्ताहर

राज्य पोलीस सेवातंर्गत जिल्ह्य़ातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘बालन्याय’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय लाठकर यांच्या हस्ते झाले. श्री. लाठकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत बालकांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. बालकांना न्याय मिळवून देण्याचे काम व्यवस्थितपणे व्हावे, या साठीचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले गेले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्य़ातील प्रत्येक उपविभागाचे अधिकारी, पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी असे एकूण २२ पोलीस अधिकारी व १७५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

समाधान घोडके सिद्धेश्वर केसरीचा मानकरी
लातूर, १४ मार्च/वार्ताहर

ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसरातील आखाडय़ात घेण्यात आलेल्या कुस्तीच्या स्पर्धेत सोलापूर येथील समाधान घोडके हा मल्ल सिद्धेश्वर केसरीचा मानकरी ठरला. कै. भाऊसाहेब कातपुरे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेली चांदीची गदा जिल्ह्य़ातील दिंडेगाव येथील सय्यद नबी याने, तर ५१ तोळे चांदीची कडा विजय उबाळे या मल्लाने पटकाविली. स्पर्धेत निवृत्ती बिडवे, समाधान घोडके, हनुमंत लोंढे, कुलदीप आणि सचिन गायकवाड हे मल्ल उतरले होते. अंतिम कुस्ती समाधान घोडके व कुलदीप दिल्ली यांच्यात झाली. ती कुस्ती बरोबरीत सुटल्यावर देण्यात आलेल्या दहा मिनिटांमध्येही कोणाची पाठ लागली नाही. पुन्हा पंचांनी दोन मिनिटाचे तीन राऊंड कुस्ती बोलावली. पहिल्या राऊंडमध्येच समाधान घोडके याने दोन गुण पटकावले. दुसरा राऊंड बरोबरीत सुटला व तिसऱ्या राऊंडमध्येही घोडके याने पुन्हा दोन गुण पटकावून तो सिद्धेश्वर केसरीचा मानकरी ठरला.