Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

झरदारी नरमले!
सर्व पक्षांना चर्चेचा प्रस्ताव ’ शरीफ यांनी प्रस्ताव फेटाळला
इस्लामाबाद, १४ मार्च/पी.टी.आय/वृत्तसंस्था

सध्या अभूतपूर्व असे राजकीय संकट अनुभवणाऱ्या सत्ताधारी ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ने सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहून मवाळ भूमिका घेतली. त्यासाठी देशात पुन्हा शांतता आणि सुस्थिती आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चेची तयारी झरदारी यांनी दर्शविली. दरम्यान, पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी मात्र झरदारी यांच्या चर्चेचा प्रस्ताव शनिवारी फेटाळून लावला. झरदारींसोबत चर्चेस तयार नसून सरकार विरोधात ‘लाँग मार्च’ कोणत्याही परिस्थितीत पार पडेल, अशी भूमिका शरीफ यांनी घेतली आहे.
आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काल रात्री उशिरा सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांसोबत याविषयी चर्चा करण्याच्या निर्णयावर एकमत झाले. देशातील राजकारणात पुन्हा स्थैर्य आणण्यासाठी सामोपचाराने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पक्षांशी वाटाघाटी करण्याची तयारी या बैठकीत दर्शविण्यात आल्याचे, पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रवक्ते फरहातुल्ला बाबर यांनी सांगितले. झरदारीदेखील इतर सर्व पक्षांबरोबर बोलणी करण्यास इच्छुक असून सर्व महत्त्वाच्या मुद्दय़ांवर या चर्चेतून तोडगा काढण्यात येईल. सर्व राजकीय पक्षांकडून या प्रस्तावाला सकारात्मक पाठिंबा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
बडतर्फ न्यायाधीशांच्या पुनर्नियुक्तीसाठी वकील आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून काढल्या जाणाऱ्या ‘लाँग मार्च’मुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. सरकारकडून १२०० आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. तरीही हे आंदोलन थोपवणे अवघड झाल्यामुळे झरदारी यांनी चर्चेची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.