Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

बोहारणीचा मालही ओसियान्सच्या बाजारात!
विनायक परब, मुंबई, १४ मार्च

घरातील जुने झालेले कपडे खास करून विविध प्रकारच्या साडय़ा एकत्र करून बोहारणीला देवून त्या बदल्यात एखादे भांडे पदरात पाडून घेण्याची क्लृप्ती अनेक वर्षे गृहिणींतर्फे वापरली जात आहे. मात्र आता यापुढे अशा साडय़ा विकताना थोडा विचार नक्कीच करावा लागेल.. याला कारणही तसेच आहे. भारतीय कलेच्या बाजारपेठेने गेल्या काही वर्षांंमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. एम. एफ. हुसेन, सैयद हैदर रझा, वासुदेव गायतोंडे आणि अमृता शेरगिलच्या चित्रांनी जागतिक बाजारपेठेत काही कोटींची किंमत मिळवल्यानंतर ओसियान्स या कला क्षेत्रातील लिलाव कंपनीने आता समकालीन हस्तकलेच्या नावाखाली थेट बनारसी, पटोला आणि तंजूर सिल्क साडय़ाही लिलावाच्या बाजारपेठेत आणल्या आहेत. यात ८० वर्षे जुनी तंजूर सिल्क १२ ते १५ हजारांना, बनारसी साडी ३२ ते ४० हजारांना तर पटन पटोला मात्र तब्बल एक लाख ६० हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत विकली जाणे लिलाव आयोजक कंपनीला अपेक्षित आहे.
१९९५ साली ओसियान्सच्या नेवील तुली यांनी चित्रलिलावाच्या बाजारपेठेत प्रवेश केला. त्यावेळेस अगदी आठ-दहा हजार रुपयांवर भारतातील नामवंतांची चित्रे विकली जायची. त्यांची किंमत खचितच अधिक आहे, असे सांगत तिच चित्रे तुली यांनी त्यावेळेस ६०-७० हजारांना विक्री करून दाखवली. त्यानंतरच्या अनेक लिलावांमध्ये त्याच चित्रांनी नंतर कोटीचे घर गाठले हे सारे करत असतानाच तुली यांनी पूर्वी कोणतेही किंमत नसलेल्या गोष्टींना विक्रीमूल्य उपलब्ध करून दिले. पूर्वीच्या काळी अनेक कॅलेंडर्स घरात ठेवली जायची. कधी त्यावर देवादिकांची चित्रे असायची तर कधी काही राष्ट्रीय संदेशही दिलेला असायचा. त्याला ‘कॅलेंडर आर्ट’ असे नाव देत तेही तुलींनी बाजारात आणले. त्यानंतर मात्र त्यांनी समकालीन कलेमध्येच वेगवेगळे प्रयोग करत बाजारपेठ काबीज केली. आता मात्र त्यांनी येत्या २१ मार्च रोजी होवू घातलेल्या चित्रलिलावामध्ये समकालीन हस्तकला नावाचा एक विभाग नव्याने सादर केला आहे. त्यात पारंपरिक कारिगरच्या कलावंतांच्या कलाकृतींबरोबरच थेट बनारसी, पटोला आणि तंजूर सिल्क साडय़ाही ठेवल्या आहेत. या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या कॅटलॉगमध्येही त्याला स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. या साडय़ा या भारतीय कलात्मकतेचा कसा परिपाक आहेत, याची नोंद स्वतंत्र टिपणासह देण्यात आली आहे. यातील बनारसी साडी ही तर केवळ पाच वर्षे जुनी आहे. तर तंजूर साडी ही ‘नेसता येण्याजोगी नव्हे तर केवळ कलात्मक संग्राह्य मूल्य लाभलेली’ अशी नोंद करण्यात आली आहे. ती काही ठिकाणी विरलेली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या साडीच्या संग्राह्य मूल्यासाठी खरेदीदाराला १२ ते १५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर पटोला साडीसाठी मात्र तब्बल दीड ते दोन लाखांची बोली लागणे अपेक्षित आहे. कॅलेंडर झाले, साडय़ा झाल्या आता पुढे काय? अशी चर्चा आता कलाक्षेत्रात या निमित्ताने सुरू झाली आहे. त्यामुळे आता यापुढे बोहारणीला साडय़ा देताना जरा सावध.. कदाचित तुमची विरलेली साडीही अशीच कलात्मक संग्राह्य मूल्य लाभलेली म्हणून हजारोंच्या किंमतीत लिलावात येवू शकते!