Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राखीव मतदारसंघांची राष्ट्रवादीला ‘अ‍ॅलर्जी’?
सर्वत्र ‘मैत्रीपूर्ण’ लढतींचा काँग्रेसचा प्रस्ताव
नवी दिल्ली, १४ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून उद्भवलेले मतभेद संपुष्टात येण्यापूर्वी आणखी गंभीर होत चालले आहेत. दलित उमेदवारांसाठी राखीव असलेल्या पाचपैकी दोन जागा स्वीकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला अजिबात स्वारस्य नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करीत आहेत. १९-१९ जागांवर सहमती झाल्यानंतर मतभेद असलेल्या उर्वरित १० जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या, असे राष्ट्रवादीने सुचविले आहे. पण मैत्रीपूर्ण लढती करायच्या असतील तर सर्व ४८ मतदारसंघांमध्ये होऊन जाऊ द्या, अशी काँग्रेसने भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत काहीही निष्पन्न झाले नाही, उलट मतभेद संपुष्टात येण्याऐवजी आणखीच वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने सर्व खुल्या जागांवर हक्क सांगण्याऐवजी दलित उमेदवारांसाठीच्या दोन राखीव मतदारसंघही स्वीकारावे, असे काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीत आवाहन केल्याचे समजते. पण राष्ट्रवादीला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जागावाटपात बरोबरीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीने दलितांसाठी राखीव पाचपैकी रिपाइं नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोला किंवा राखीव असलेला अमरावती मतदारसंघ असे किमान दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने स्वीकारावे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.
रिपाइं खासदार रामदास आठवले यांच्यासाठी शिर्डी मतदारसंघाची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीचा त्याच्या बदल्यात देवाणघेवाण करण्याची तयारी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा मतदारसंघ मिळविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सोडून दिला आहे. आठवले यांनी दहा वर्षे प्रामाणिकपणे साथ देऊनही त्यांना राष्ट्रवादीने वाऱ्यावर सोडल्याबद्दलही काँग्रेसच्या गोटात कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आठवले यांनी काँग्रेस पक्षाशी युती करावी, आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडू, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आठवले यांच्याशी संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आठवले यांच्याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहानुभूती व्यक्त करीत आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून त्यांच्या नावावर काही मतदारसंघांची मागणी करण्याच्या प्रकारामुळेही जागावाटपाच्या चर्चेत अडथळे निर्माण झाले आहेत. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले, कोल्हापुरात संभाजीराजे भोसले, मावळमध्ये रामशेठ ठाकूर, परभणीत तुकाराम रेंगे पाटील, नगर दक्षिणमध्ये यशवंतराव गडाख किंवा गोविंदराव आदिक आदी नेत्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये नेऊन त्यांच्या नावावर या मतदारसंघांवर हक्क सांगण्याच्या राष्ट्रवादीच्या आडमुठय़ा डावपेचांवर काँग्रेसच्या गोटात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या वतीने चर्चा अनिर्णित राहिलेल्या १० जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला तेव्हा काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्व ४८ जागांवर मैत्रीपूर्ण लढती करा, असे अनपेक्षित उत्तर मिळाले.