Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पहिल्या टप्प्यातील सर्व १३ जागांसाठी काँग्रेसची यादी तयार
राष्ट्रवादीच्या तीन जागांचा समावेश
नवी दिल्ली, १४ मार्च/खास प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यानची जागावाटपाची बोलणी निष्फळ ठरत चालल्याचे पाहून आज काँग्रेसने महाराष्ट्राच्या छ]ाननी समितीच्या बैठकीत १६ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील सर्व १३ जागांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या १३ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या वाटय़ाच्या भंडारा-गोंदिया, िहगोली आणि परभणी या मतदारसंघांचाही समावेश आहे.
काही विशिष्ट जागांवर अडून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जागावाटपाची प्रगती होऊ शकली नसल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज दुपारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि चौधरी वीरेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील १३ मतदारसंघांसाठी उमेदवारांचे पॅनेल तयार करण्यात आले. येत्या सोमवारी, १६ मार्च रोजी होणाऱ्या छाननी समितीच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील २५ जागांवर उमेदवारांच्या नावांची चर्चा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसने आज भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी आमदार नाना पाटोळे आणि बंडू सावरबांधे यांची नावे दिल्याचे समजते. परभणी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. हिंगोली मतदारसंघातून माजी खासदार शिवाजी माने यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे, तर बुलढाणा मतदारसंघासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. रामटेकची काँग्रेस लढणार असेल तर अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे नाव देण्यात आले आहे. ही जागा रिपाइंसाठी सोडायची झाल्यास सुलेखा कुंभारे यांचे नाव यादीत आले आहे.