Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

२६ वर्षांच्या विवाहबंधनातून ३५ लाखांच्या पोटगीने सुटका!
अजित गोगटे, मुंबई, १४ मार्च

पतीने पत्नी आणि मुलाला एकरकमी पोटगी म्हणून ३५ लाख रुपये रोख देण्याच्या अटीवर वरळी

 

येथील एका सधन कुटुंबातील दाम्पत्यास २६ वर्षांच्या विवाहबंधनातून उभयसंमतीने मुक्त होण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी संमती दिली.
विजय पहलाज राजाणी आणि त्यांच्या पत्नी नीलम यांनी प्रलंबित अपिलात सादर केलेला वरीलप्रमाणे अटींचा सहमतीचा मसूदा न्या. बी. एच. मार्लापल्ले व न्या. दिलीप कर्णिक यांच्या खंडपीठाने मंजूर केला. मात्र यासाठी या दाम्पत्यास हिंदू विवाह कायद्यानुसार उभयपक्षी सहमतीने काडीमोड घेण्यासाठी वाद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात रीतसर अर्ज करून किमान सहा महिने विभक्त रहावे लागेल. अशाप्रकारे त्यांची वैवाहिक संबंधांतून औपचारिक मुक्तता झाल्यानंतर आणि आता सादर केलेल्या सहमतीच्या मसुद्यातील सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर खंडपीठ त्यांचे अपील निकाली काढेल.
विशेष म्हणजे विजय व नीलम यांचा प्रेमविवाह झालेला आहे. दोघेही वरळी येथे एकाच इमारतीत राहायचे. १९८३ मध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाहबद्ध होण्यापूर्वी सहा वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. दोघांना अखिल नावाचा १८ वर्षांचा मुलगा आहे. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला अखिल अमेरिकन नागरिक आहे व तो आईजवळच राहतो. गेली काही वर्षे वैवाहिक कलह निर्माण झाल्याने विजय व निलम वेगळे राहात आहेत. विजय याने त्याच्या पत्नी आणि मुलास दरमहा प्रत्येकी १० हजार रुपये अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश निलमने केलेल्या अर्जावर दोन वर्षांपूर्वी कौंटुंबिक न्यायालयाने दिला होता. त्याविरुद्ध विजयने केलेले अपील उच्च न्यायालयापुढे होते.एरवी आपण वेगळे राहातच आहोत. त्यातही भविष्यात हयातभर दरमहा पत्नी व मुलाला पोटगी देत राहायचे. त्यापेक्षा एकरकमी पोटगी द्यावी, मुलाच्या शिक्षणाचीही वडिलांनी सोय करावी आणि दोघांनी मनात तेढ ठेवून नावाला पती-पत्नी म्हणून राहण्यापेक्षा सामोपचाराने काडीमोड घ्यावा, यावर उभयतांचे एकमत झाले. त्यानुसार वकिलांच्या मदतीने त्यांनी सहमतीचा मसूदा न्यायालयास सादर केला.
आता झालेल्या सहमतीनुसार विजय त्याची पत्नी व मुलगा यांना एकरकमी पोटगीपोटी रोख ३५ लाख रुपये देणार आहे. त्यापैकी पाच लाख रुपये त्याने याआधीच न्यायालयात जमा केले आहेत. ते नीलम काढून घेऊ शकेल. आणखी ७.५० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही त्याने शुक्रवारी दिला. राहिलेले २२.५० लाख रुपये त्याने महिनाभरात न्यायालयामार्फत द्यायचे आहेत. शिवाय मुलगा अखिल याची परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास त्यासाठी ८.५० लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्याचीही विजयने तयारी दर्शविली आहे. विजय वांद्रे येथील ऑटर्स क्लबचा सदस्य आहे. तेथे सदस्यांच्या मुलांना सदस्यत्व मिळते. अखिलला तसे घ्यायचे असेल तर त्यासाठी विजय संमती देईल, पैसे मात्र नीलम व अखिल यांनाच भरावे लागतील. शिवाय अखिलच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबच्या सदस्यत्वासाठी विजयने याआधीच १.९२ लाख रुपये भरले आहेत. दुर्दैवाने निलमचा लवकर मृत्यू झाला तर अखिल ३५ वर्षांचा होईपर्यंत किंवा तो स्वत:च्या पायावर उभा राहिपर्यंत त्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारीही विजयने घेतली आहे. विजय आणि नीलम यांचा औपचारिक काडीमोड झाला तरी अखिलचा आपल्या वडिलांचा कायदेशीर वारसदार म्हणून हक्क अबाधीत राहील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.