Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

भ्रष्ट व्यवस्थेचा आपण नेहमीच बळी ठरलो आहे- एस. एस. विर्क
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी

तत्त्व आणि न्यायासाठी लढण्याला आपण घाबरत नाही. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटल्याने

 

आपण त्या भ्रष्ट व्यवस्थेचा नेहमीच बळी ठरलो आहोत. एवढेच नाहीतर आजही आपण या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात एकहाती लढा देत असल्याचे राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांनी आज येथे सांगितले.
विर्क यांची शुक्रवारी राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती केल्यानंतर आज त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पंजाब सरकारने त्यांच्या विश्वासार्हतेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विर्क बोलत होते. तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची आंतरिक इच्छा असलेल्या जनतेने पुढे यावे त्यांना नेमका अन्याय कोणत्या स्तरावर होत आहे ते निदर्शनास आणून दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले.
आजघडीला दहशतवादाने देशासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळेच राज्याचा पोलीस महासंचालक या नात्याने ‘२६/११’चा तपासाला आपले पहिले प्राधान्य राहील आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. पोलीस दलात नवे चैतन्य निर्माण करून पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यावर आपला भर राहील. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी वर्षांचे ३६५ दिवस सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सांगून त्यासंदर्भात पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे विर्क म्हणाले. कारकीर्दीतील सर्वाधिक म्हणजे २३ वर्षे पंजाबसारख्या अत्यंत संवेदनक्षम राज्यात आपण काम केले असून त्या अनुभवाचा लाभ नवी जबाबदारी पार पाडताना नक्कीच होईल, असेही ते म्हणाले. महासंचालकपदी नियुक्ती केल्यानंतर निवडणुकांसदर्भातील कामकाजापासून आपल्याला दूर ठेवून त्याची जबाबदारी इतर सहकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याबद्दल आपली काहीही तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक काळात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या सुरक्षेबाबतच्या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. परंतु आवश्यक ती सुरक्षा नक्कीच पुरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारने महासंचालकपदी नियुक्ती करून आपल्यावर विश्वास दर्शविला असून महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाल्याचे विर्क यांनी शेवटी सांगितले.