Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मत्स्य व्यवसाय विभागाच्या उपायुक्तसह पालिकेच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी

प्रादेशिक मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त आणि पालिका विभाग निरीक्षक व कार्यालय

 

अधीक्षक अशा तिघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वेगवेगळ्या प्रकरणात अनुक्रमे २० हजार व ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. पहिल्या प्रकरणात, फिर्यादीने मुलाच्या नावाने बोट बांधण्यासाठी सरकारी अनुदान मिळण्याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र प्रस्तावाची फाईल मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी मंत्रालयात पाठविण्याकरिता मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त राजेंद्र जाधव यांनी फिर्यादीकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना सापळा रचून रंगेहाथ अटक केली. दुसऱ्या प्रकरणात, फिर्यादीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या इमारतीचा कर तिच्या नावे करून देण्याचा मागणीअर्ज पालिकेच्या ‘पी’ उत्तर विभागाच्या कर निर्धारण कार्यालयात केला होता. मात्र २६ खोल्यांच्या या इमारतीसाठी प्रतिखोली ८५० रुपये असे एक लाख ४० हजार रुपये कर दरमहा भरावा लागेल, असे विभाग निरीक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी फिर्यादीला सांगितले. मात्र दरमहा एवढा कर भरणे शक्य होणार नसल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात आल्यावर चव्हाण यांनी फिर्यादीला मालमत्ता कराची रक्कम कमी करून देऊ असे सांगितले. परंतु त्यासाठी ८० हजार रुपये द्यावे लागतील व यातील काही रक्कम कार्यालय अधीक्षक भरत सावंत यांनाही द्यावी लागणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ठरल्यानुसार फिर्यादीकडून ३५ हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून जाधव व सावंत या दोघांनाही रंगेहाथ अटक केली.