Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
प्रादेशिक

२६ वर्षांच्या विवाहबंधनातून ३५ लाखांच्या पोटगीने सुटका!
अजित गोगटे, मुंबई, १४ मार्च

पतीने पत्नी आणि मुलाला एकरकमी पोटगी म्हणून ३५ लाख रुपये रोख देण्याच्या अटीवर वरळी येथील एका सधन कुटुंबातील दाम्पत्यास २६ वर्षांच्या विवाहबंधनातून उभयसंमतीने मुक्त होण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी संमती दिली.विजय पहलाज राजाणी आणि त्यांच्या पत्नी नीलम यांनी प्रलंबित अपिलात सादर केलेला वरीलप्रमाणे अटींचा सहमतीचा मसूदा न्या. बी. एच. मार्लापल्ले व न्या. दिलीप कर्णिक यांच्या खंडपीठाने मंजूर केला.

कोलकाता येथील महाराष्ट्र निवासाचा अमृतमहोत्सवानिमित्त सागर वार्षिकाचा विशेषांक
मुंबई, १४ मार्च/ प्रतिनिधी

कोलकाता येथील महाराष्ट्र निवासाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्ताने येथील महाराष्ट्र मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या सागर या वार्षिकाचा महाराष्ट्र निवास अमृत महोत्सव विशेषांक प्रकाशित केला आहे. सागरचे हे ३० वर्ष असून कोलकाता येथे राहणाऱ्या, स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मराठी जनांनी महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र निवास याचे काम चांगलेच चालविले आहे.

भ्रष्ट व्यवस्थेचा आपण नेहमीच बळी ठरलो आहे- एस. एस. विर्क
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी

तत्त्व आणि न्यायासाठी लढण्याला आपण घाबरत नाही. भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटल्याने आपण त्या भ्रष्ट व्यवस्थेचा नेहमीच बळी ठरलो आहोत. एवढेच नाहीतर आजही आपण या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात एकहाती लढा देत असल्याचे राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांनी आज येथे सांगितले.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या उपायुक्तसह पालिकेच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी
प्रादेशिक मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त आणि पालिका विभाग निरीक्षक व कार्यालय अधीक्षक अशा तिघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वेगवेगळ्या प्रकरणात अनुक्रमे २० हजार व ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. पहिल्या प्रकरणात, फिर्यादीने मुलाच्या नावाने बोट बांधण्यासाठी सरकारी अनुदान मिळण्याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.

३१८ कोटींची विक्रीकर माफी रद्द करण्यासाठी जनहित याचिका
मुंबई, १४ मार्च/प्रतिनिधी

राज्याचे माजी मंत्री व शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी स्थापन केलेल्या मे. शिरपूर गोल्ड रिफायनरी लि.ही कंपनी प्रत्यक्षात ‘पॅकेज इन्सेटिव्ह योजने’खाली सूट मिळण्यास पात्र नसूनही या कंपनीस ३१८ कोटी रुपयांची विक्रीकर माफी मंजूर करण्यात झालेल्या कथित घोटाळ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका केली गेली आहे.

सहाव्या वेतन आयोगाला निवृत्त न्यायमूर्ती, विचारवंतांचा विरोध
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेतलेला निर्णय
राज्यपालांना पत्र
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. राज्यावरील प्रचंड कर्ज, ढासळती आर्थिक स्थिती व असंघटित लोकांची हालअपेष्टा अशी स्थिती असतानाही राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याचा आदेश सरकारला द्यावा, असे विनंतीपत्र महाराष्ट्रातील प्रमुख २५ विचारवंत व कार्यकर्त्यांनी राज्यपाल एस. सी. जमीर यांना लिहिले आहे.

एनसीपीएमध्ये १७ मार्चपासून लावणी महोत्सव
मुंबई, १४ मार्च / प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचालनायातर्फे येत्या १७ ते १९ मार्च या कालावधीत नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’च्या सभागृहात लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या लावणी महोत्सवात राज्यातील विविध कलापथकांमधून निवड केलेली पारंपरिक लावणी पथके सहभागी होणार आहेत. या लावणी महोत्सवात पारंपरिक बाजाच्या अस्सल लावण्या खानदानी पद्धतीने देशी वाद्यांच्या साथीने सादर केल्या जातात. या महोत्सवाला जोडून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे याच तीन दिवसात दुपारी ३ ते ५ या वेळेत लावणीविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लावणी महोत्सवात लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत छबू गजरा पंढरपूरकर, लता-लंका नांदुरेकर, अनुसयाबाई लोणंदकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लावणी महोत्सवाच्या सशुल्क प्रवेशिका एनसीपीए येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळू शकतील.