Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९

गहू, कांदा, उसासह द्राक्षबागांना फटका
अकोले, राहुरी, राहात्यात गारपीट

नगर, १४ मार्च/ठिकठिकाणचे वार्ताहर

जिल्ह्य़ात आज दुसऱ्या दिवशीही बहुतांश ठिकाणी गारपीट झाली. प्रामुख्याने अकोले, राहाता, राहुरी व कोपरगाव तालुक्यांत ठिकठिकाणी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांची वृष्टीही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे. गहूपिकास हा पाऊस मारक ठरणार आहे.

रंग-१
या विश्वाची
निर्मिती करणाऱ्या विधात्याचं
या सृष्टीवर विशेष प्रेम आहे
म्हणूनच या जगात त्यानं
अनेक रंगांची निर्मिती केली
अन् मानवी मनाला
भुरळ घालणाऱ्या या रंगातून
साकारत गेली
असंख्य भावचित्रे..शास्त्रज्ञांच्या मते तर
आपल्याला दिसू शकतील असे
अडीच लाख रंग
या जगात आहेत..
रंग आणि त्याबद्दल आकर्षण
हे अगदी आदिमानवापासून
आपल्यात आहे
म्हणून आपल्या आयुष्यात
रंग नसणं
ही कल्पनाच आपल्याला
अस्वस्थ करून जाते..

विद्यार्थ्यांनी साकारले ‘इंडियन स्पेस ओडीसी’
कण्टेन्ट एडिटर- अमर कासट, इयत्ता सहावी आणि हिमांशु बोरोलो, इयत्ता पाचवी, क्रिएटिव्ह एडिटर- शेखा तोलानी, इयत्ता सातवी इमेज एडिटर- अविनाश हसवानी, इयत्ता सहावी
संकल्पना- प्राध्यापक हेमंत जाधव ही यादी एखाद्या शाळेच्या वार्षिक अंकाची नसून ती अतिशय कल्पक आणि माहितीपूर्ण अशा ‘इंडियन स्पेस ओडीसी’ या पुस्तकातील आहे. जळगाव येथील रामकृष्ण सरस्वती गुरुकुल विद्यालयातील प्रध्यापक हेमंत जाधव यांच्या पुढाकराने शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय तसेच जगातील अंतराळ क्षेत्राची माहिती देणारे १९८ पानांचे पुस्तक तयार केले आहे.

एक तास ‘चांद्रयाना’चा
‘चांद्रयाना’ने भारतीय तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचे मोलाचे काम केले आहे. याचे प्रत्यंतर गुरुवारी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण यांच्या ९६ व्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्ताने आले. त्याचा नीरज पंडित यांनी घेतलेला हा आढावा.. थोर शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी रचलेले चांद्रमोहिमेचे स्वप्न साकारण्यात भारताच्या ‘चांद्रयान’ मोहिमेला यश आले आहे का?

शिक्षण विभागाकडून कामांचे नियमबाह्य़ वाटप
जि. प. सदस्य अंबाडे यांचा आरोप

नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

शाळा दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक, कामास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता यापैकी कशाचीही पूर्तता न करता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियमबाह्य़ सुमारे ३० लाखांच्या कामांचे मजूर संघास वाटप केले. विशेष म्हणजे शाळा दुरुस्तीचा निधी नियमानुसार ग्रामपंचायत किंवा ग्रामशिक्षण समितीकडे वर्ग करणे आवश्यक असताना त्याचेही उल्लंघन करीत कामे मजूर संघास दिली गेली.
शिक्षण समितीच्या ज्येष्ठ सदस्य विजयाताई अंबाडे यांनी या अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे.

पारनेर-शिरूर रस्त्यावरील अपघातात एकजण ठार
वाडेगव्हाण, १४ मार्च/वार्ताहर

पारनेर-शिरूर रस्त्यावर मालमोटारीची धडक बसल्याने एकजण ठार, तर एकजण जखमी झाला. पारनेरकडून शिरूरकडे जाणारी मालमोटार (एमएच १२ ओजी २२१९) व शिरूरकडून पिंपळनेरकडे जाणारी मोटरसायकल (एमएच १६ जी ६८७७) यांची धडक झाली. त्यात मोटरसायकलवरील मंगेश प्रभाकर बेंद्रे जागीच ठार झाले व त्यांच्याबरोबर असणारा संपत अशोक महाडूळे जबर जखमी झाला. अपघात काल (शुक्रवारी) संध्याकाळी झाला. अपघाताची बातमी कळताच पिंपळनेरचे तरुण घटनास्थळी दाखल झाले. बेंद्रे व महाडूळे यांना शिरूर येथे दाखल करण्यात आले. बेंद्रे यांचे उपचार सुरू करण्यापूर्वीच निधन झाले. मालमोटारचालक अपघातानंतर फरारी झाला.

उघडय़ावर शौचास बसणारे ३३जण कॅमेराबद्ध
कोपरगाव, १४ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील रवंदे व शिरसगाव परिसरात पंचायत समितीच्या भरारी पथकाने उघडय़ावर शौचास बसणाऱ्या ३३जणांना कॅमेराबद्ध केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

रुजू झालेल्या तहसीलदारांची एक दिवसात पुन्हा बदली
राहाता, १४ मार्च/वार्ताहर

येथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार बी. बी. जाधव यांना निवडणूक आयोगाचा फटका बसल्याने एक दिवस हजर होऊन पुन्हा त्यांची बदली झाल्याने ते औटघटकेचे तहसीलदार ठरले.
तहसीलदार डॉ. यशवंत माने यांची कोल्हापूर येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर करमाळा येथील बी. बी. जाधव यांची तहसीलदार म्हणून नेमणूक झाली. त्याप्रमाणे डॉ. माने कार्यमुक्त झाले. जाधव यांनीही येथे तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारला. महसूल अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. जाधव एकच दिवस कार्यालयात हजर झाले. राहाता येथे जाधव यांची झालेली बदली निवडणूक आयोगाने रद्द केली. त्यामुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. तत्कालीन तहसीलदार डॉ. यशवंत माने यांची शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय विभागात बदली झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असल्याने येथील तहसीलदारपद रिक्त आहे. परिणामी नागरिकांची कामे खोळंबलेली आहेत.

कर्जतला एका जागेसाठी चौघे रिंगणात
कर्जत, १४ मार्च/वार्ताहर

कर्जत ग्रामपंचायतीच्या प्रभाग पाचमधील एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले नाही. या एका जागेसाठी १२ उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. वैभव शहा, रमेश मेहेत्रे, विजय घालमे, तारीक सय्यद, तारेख सय्यद, रमेश काकडे, शफी सय्यद व अनिस सय्यद या आठजणांनी माघार घेतली. आता निवडणुकीच्या रिंगणात आशिष बोरा, अनिल भोज, रज्जाक झारेकरी व राजेंद्र माने हे उमेदवार उरले आहेत. मतदान २५ मार्च रोजी होणार आहे. अर्ज माघारीनंतर लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी देवीदास काकडे यांनी चिन्हवाटप केले.

जुन्या वादातून तरुणावर वार
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या अंगावर वस्ताऱ्याने वार करून त्यास गंभीर जखमी करण्यात आले. हा प्रकार काल रात्री नऊच्या सुमारास तेलीखुंट व्यापारी संकुलासमोर घडला. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल बिट्टू तोडमल (१८, रा. भोसले आखाडा, जहांगीर चाळ) याने फिर्याद दिली आहे. तो काल रात्री शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यास आला असता तेथे आरोपींची भेट झाली. जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होऊन दोघांनी राहुलला लाकडी दांडक्याने मारहाण केली. नंतर वस्ताऱ्याने त्याच्या बरगडीवर, पाठीवर, हातावर वार केले. जखमी राहुलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी रोहित शिंदे व दीपक वाघमारे (रा. कोठला झोपडपट्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक गंगावणे करीत आहेत.

सरकारी कर्मचारी महासंघाची २०, २१ला कोलकत्याला बैठक
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी (दि. २०) व शनिवारी (दि. २१) कोलकता येथे होणार आहे, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य योगीराज खोंडे यांनी दिली. जागतिक आर्थिक मंदीमुळे सरकारी कर्मचारी व कामगारांवर ओढावणाऱ्या आर्थिक संकट, बेकारीचा सामना कसा करावा, नवनियुक्त कर्मचाऱ्यांना विद्यमान पेन्शन योजना लागू करणे, खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करून कामगारांना नियमित सेवेत घ्यावे, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच्या वेतन फरकाची रक्कम रोखीने देण्यात यावी आदी प्रश्न, मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोठडीत मरण पावलेल्या आरोपीच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची मागणी
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

शेवगाव येथे न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू पावलेल्या बिर्याण्या भोसले याच्या कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन न केल्यास दि. १९ला शेवगाव तहसील कार्यालयासमोर मृताचा दशक्रियाविधी व उपोषण करण्याचा इशारा भटक्या विमुक्त जमाती संघटनेने दिला आहे. संघटनेने आज निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांना याबाबत निवेदन दिले. बिर्याण्या भोसलेची हत्या झाली की आत्महत्या याचा तपास सीआयडी करीत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उघडय़ावर पडले आहे. सरकारने त्यांचे पुनर्वसन करावे, असे त्यात म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. किसन चव्हाण, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र काळे, जिल्हा कार्याध्यक्ष भगवान गुंजाळ, सुनील उमाप आदींच्या सह्य़ा आहेत.

‘रुग्णाला आधार वाटावे असे आनंदऋषी रुग्णालय’
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला मोठा आधार वाटावा, असे आनंदऋषीजी रुग्णालय आहे, असे प्रतिपादन महापौर संग्राम जगताप यांनी केले. आचार्य आनंदऋषीजी यांच्या स्मृतिदिन निमित्ताने आनंदऋषी रुग्णालय, लायन्स क्लब व सेवायात्री यांच्यातर्फे आयोजित मोफत कर्करोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महापौर बोलत होते. यावेळी ४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमात प्रेमराज बोथरा, सविता लोढा, प्रवीण ससाणे, डॉ. वसंत कटारिया, सुजाता लोढा, माणकचंद्र कटारिया, सुभाष मुनोत, डॉ. प्रकाश कांकरिया आदी उपस्थित होते. शिबिरासाठी जयकुंवरबाई लोढा व माणकचंदजी बोथरा परिवाराने योगदान दिले. डॉ. सतीश सोनवणे, डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर यांनी रुग्णांची तपासणी केली. सूत्रसंचालन दत्तात्रेय वारकड यांनी केले.

तुकाराम बीजेनिमित्त गाथा मिरवणूक
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

संत तुकाराममहाराजांचा बीजोत्सव गंजबाजारातील शेंगागल्लीत कुलवंत वाणी समाजाच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी गाथा मिरवणूक काढण्यात आली.
मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची माया अशोक भोरे यांच्या हस्ते महापूजा, तसेच कलश व वीणापूजन करण्यात आले. बीजोत्सवात अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण करण्यात आले. यावेळी वांढेकर गुरुजी यांचे कीर्तन झाले. गवळीमहाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. उत्सवानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले.

नैसर्गिक रंग वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग वापरावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. रासायनिक खडबडीत काचेसारखा भुगा असलेल्या किंवा धातूचा भुगा असलेला रंग अथवा पेस्ट फॉर्ममध्ये असलेला रासायनिक रंग नागरिकांनी अजिबात वापरू नये. त्या ऐवजी नैसर्गिक पदार्थापासून तयार केलेले अत्यंत बारीक पावडर असलेले रंग वापरावेत. रंग लावताना ते मानेपासून शरीराच्या वरच्या भागास लागणार नाही, याची काळजी घ्यावी. गुलाल किंवा तत्सम रंग वापरू नये. द्रवरूप रंग शक्यतो कपडय़ावर टाकावा. रंगामुळे त्रास झाल्यास तो ताबडतोब पाण्याने धुऊन उपचारासाठी डॉक्टरकडे जावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी उद्या पाथर्डी तहसीलमध्ये बैठक
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी (दि. १६) दुपारी २ वाजता पाथर्डी तहसील कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आजी-माजी सैनिकांनी जमिनीबाबत अतिक्रमण किंवा पोलीस संरक्षणाबाबत असलेल्या अडीअडचणी लेखी स्वरूपात दोन प्रतीत सभेच्या वेळी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

डॉ. अजय कोठारी यांचा सत्कार
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

डी. एन. बी. आर्थो. परीक्षेत भारतात प्रथम आल्याबद्दल डॉ. अजय कोठारी यांचा नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदास यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमास दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, प्रा. सूद, प्रा. राजशेखर, डॉ. कोच आदी मान्यवर उपस्थित होते.पुणे येथील नामवंत सर्जन डॉ. के. ए. संचेती यांचे मार्गदर्शन अजय यांना लाभले.

सावेडीत पुन्हा मंगळसूत्र चोरी
नगर, १४ मार्च/प्रतिनिधी

सावेडी उपनगरातील स्टेट बँक कॉलनीजवळील कलानगरमध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लांबविण्यात आले. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. सुलभा अशोक पाटील (रा. अभियंता कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. मोटरसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पोबारा केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. मंगळसूत्र चोरीच्या घटना सावेडीत सतत घडत आहेत. मात्र, तोफखाना पोलिसांना गुन्हेगार अद्यापही पकडता आलेला नाही.