Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मेरे पास मां हैं’
लक्ष्मीकांत देशमुख

ऑस्कर पुरस्काराचा तो दिवस आणि ए. आर. रहमान यांना गीत व संगीतासाठी मिळालेले दोन

 

पुरस्कार हा क्षण भारतीय माणसं कधी विसरू शकणार नाहीत. कितीही म्हटलं तरी ज्या पुरस्कारानं भारताला अगदी थेट ‘मदर इंडिया’च्या जमान्यापासून व अलीकडच्या काळात ‘लगान’च्या वेळी हुलकावणी दिली होती, तो पुरस्कार मिळविण्याची किमया घडवून आणली ती अल्लारखा रहमान यानं. त्याची सांगीतिक प्रतिभा अव्वल दर्जाची होती, म्हणूनच हा बहुमान त्याला मिळाला हे निर्विवाद!
पण माझं मन भरून आलं ते त्याच्या भावपूर्ण भाषणानं. त्यानं ऑस्करची बाहुली हातात घेऊन आभाराचं भाषण करताना म्हटलं, ‘‘मेरे पास मां हैं. ती इथं उपस्थित आहे, याचा मनस्वी आनंद आहे.’’ तमाम भारतीयांच्या मनाची तार या एका वाक्यानं, पुन्हा एकवार अधिक आत्मीयतेनं रहेमानशी जुळली गेली असणार.
पु. ल. म्हणायचे, ‘त्यांची (पाश्चात्यांची) द्राक्ष-संस्कृती. आपली भारतीयांची रुद्राक्ष-संस्कृती!’ पण त्याहीपेक्षा हे खरं की, आपली मातृपूजक संस्कृती तर पाश्चात्यांची पितृपूजक. आपण देशाला भारतमाता म्हणतो, मातृभूमी म्हणतो. ते पितृभू म्हणतात.
ऑस्कर पुरस्काराच्या निमित्तानं ए. आर. रहमानच्या त्याच्या जीवन आणि संगीताबाबत अनेक लेख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले, टीव्हीवर ऐकायला मिळाले आणि त्यातून जाणवलं की, रहमान हा त्याच्या आईबाबत एवढा कृतज्ञ व भावूक का आहे. पती निधनानंतर खस्ता खाऊन त्या माऊलीनं त्याला वाढवलं व आज तो जो कुणी आहे तो तिच्या मायाममतेसोबत तिनं खाल्लेल्या खस्तांमुळे. हे कुटुंब मूळचं हिंदू तामिळ, तेथे मातृपूजेची व भक्तीची परंपरा. त्यामुळे रहमान आईवेडा मातृपूजक झाला नसेल तर नवल नाही.
भारतीयांनी स्त्रीला विविध रूपांत पाहिलं आहे. तिला देवी मानलं आहे. तिला सखी व रतीरूप मानलं आहे. पण त्याहून जास्त तिला आई मानलं आहे. आचार्य अत्रे त्यांच्या नाटकात जेव्हा ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’ असं लिहून जातात, तेव्हा त्याला सुभाषिताचा दर्जा प्राप्त होतो. हे वाक्य सदैव विविध प्रसंगी आपण मराठी माणसं वापरतो, कारण आपली मातृसंस्कृती व आईचं मानलेलं जीवनातलं स्थान!
अगदी आजही १२ तास बाहेर काम करणारी स्त्री अंतर्बाह्य़ ‘आई’ असते. भारतीय संस्कृतीनं समाजचौकट व कुटुंबव्यवस्था विकसित करताना स्त्रीचं मातृत्व गौरवत आई-मुलाच्या नात्याला सर्वश्रेष्ठ मानलं. जो आईशी नीट वागत नाही, तिला त्रास देतो, त्याला अधम मानलं आहे.
हिंदी किंवा एकूण भारतीय सिनेमा घ्या. ते भारताचं एका अर्थानं अभिजात कल्चर झालं आहे. आपले नायक नेहमीच मातृभक्त असतात. आपण स्वप्नातही खलनायिका आई सहन करू शकत नाही.
आपल्या देवता मातृरूपच आहेत. तुळजापूरजी भवानीआई किंवा करवीरवासिनी अंबाबाई या भक्ताचं रक्षण करणाऱ्या मातृदेवता. मुलाचं संगोपन जसं महत्त्वाचं तसं त्याचं संरक्षणही. हाही आपल्या मातृपूजक संस्कृतीचा आविष्कार. छत्रपती शिवाजीमहाराजांना भवानीमातेनं तलवार दिली होती, या मागचं सत्य काहीही असू दे, एक लेखक व मातृभक्त म्हणून मला ही कल्पना मोठी हृद्य वाटते. शिवाजी व जिजामाता हे एक सर्वश्रेष्ठ माता-पुत्राचं भारतीय प्रतीक.
म्हणूनच आपण जी तीन ऋणं मानतो, त्यातलं सर्वात पहिलं ऋण म्हणजे मातृऋण. स्वातंत्र्यलढय़ात देशभक्तांनी भारतमातेचं ऋण आद्य मानून प्राणाहुती दिली. देशाला स्त्रीरूप - खास करून मातृरूप देणं ही आपली खासीयत आहे. प्रेम धवन ‘ए मेरे प्यारे वतन’ लिहिताना देशाला पाहा कसं मातृरूप देतात. ‘मा का आंचल बनके कभी याद आता है तू. और कभी नन्हीसी बेटी बनके याद आता है तू.’ पुरुषमाणूस मुलीवर वात्सल्य व प्रेम करीत एका अर्थानं मातेला वंदन करीत असतो.
स्त्री एक वेळ पतीसाठी वाईट, व्यभिचारी असेल; पण मुलासाठी ती अंतर्बाह्य़ निखळ माताच असते. या धारणेतून आपण पुन्हा एकदा पॉप्युलर म्हणून इंडियन कल्चर झालेल्या बॉलिवूड परंपरेतल्या दोन सिनेमांचे उदाहरण घेऊ या.
‘मदर इंडिया’ हा भारताचा मातृत्वाचा जयघोष करणारा अल्टीमेट सिनेमा. मुलावर निखळ प्रेम करणारी, त्याच्यासाठी खस्ता खाणारी व मुलगा गैर वागतो म्हणून त्याच्यावर गोळी झाडणारी आणि तरीही त्याच्यावर नितांत प्रेम करणारी आई या चित्रपटाची नायिका. भारतीय मानस या प्रतिमेनं घडलं आहे. दुसरा सिनेमा राजेश खन्ना-शर्मिला टागोरचा ‘अमर प्रेम’. इथं शर्मिला एक गणिका, निपुत्रिक. पण अस्सल आई. शेजारच्या छोटय़ा मुलावर निखळ प्रेम करते व तोही मोठेपणी तिला आई म्हणून स्वीकारतो. हे दोन्ही सिनेमा मी जेव्हा पाहतो, माझे डोळे पाणावतात. आणि ‘दीवार’ला कसं विसरून चालेल? एकीकडे वाममार्गानं स्मगलिंग करून अमाप पैसा मिळविणारा अमिताभ गरीब इन्स्पेक्टर शशी कपूरला जेव्हा विचारतो, ‘तेरे पास क्या है?’ तेव्हा त्याचं चार शब्दांचं साधं वाक्य ‘मेरे पास मां हैं.’ अवघ्या भारतभूमीच्या पुत्रांची नेमकी नस पकडतं!
या मातृपूजनाच्या परंपरेला व इतिहासाला उजाळा मिळाला, तो रहमानच्या त्या भावूक उद्गारांनी. तो एक मुलगा म्हणून आपल्या आईबाबत बोलला, त्याहीपेक्षा एक भारतीय मातृपूजक आपल्या आईपासून भारतमातेपर्यंत मातृरूप विस्तारत समूह जाणिवेनं बोलला असं मी मानतो. अन्यथा रहमान बंकीमचंद्रांचं ‘वंदेमातरम्’ एवढय़ा उत्कटतेनं अवघ्या तरुणाईची नाळ छेडीत गाऊच शकला नसता.
अल्लारखा रहमान, तुझ्या आईला वंदन. तू ज्या उत्कटतेनं ‘वंदेमातरम्’ म्हटलंस त्या गीतातल्या आपल्या भारत देशाला वंदन आणि जागतिक व्यासपीठावर हिंदीमधून मातृवंदना केलीस म्हणून तुलाही वंदन. जय हो!