Leading International Marathi News Daily
रविवार, १५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला..
नागपूर, १४ मार्च / प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याचे

 

कळताच त्यांचे समर्थक शुक्रवारी सायंकाळपासून कामाला लागले. काँग्रेसची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी ती येत्या एक-दोन दिवसात जाहीर होण्याचा अंदाज आहे.
दिल्लीत मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत नागपूरसह अन्य जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आले. हा निरोप येताच कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले. त्यांच्या समर्थकांनी आता खऱ्या अर्थाने प्रचारास प्रारंभ केला. मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात त्यांचे मतदान आहे, याची माहिती व्हावी, यासाठी विलास मुत्तेमवार यांच्या संकेतस्थळाचा प्रचार करणारी वाहनेही सायंकाळपासून शहरात फिरू लागली आहेत.
मुत्तेमवार यांचे खंदे समर्थक आमदार दीनानाथ पडोळे, माजी महापौर विकास ठाकरे, मारोतराव कुंभलकर, प्रशांत धवड यांच्यासह अन्य नेते सक्रिय झाले आहेत. याशिवाय विभिन्न मंदिरात पूजा, अभिषेकही करण्यात येत आहेत. आमची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. कार्यकर्तेही सज्ज आहेत, असे विकास ठाकरे यांनी सांगितले.
रोजच देवडिया काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकी होत आहेत. तीन दिवसांपूर्वीच सुधाकर गणगणे यांनी निवडणुकीच्यादृष्टीने संघटनेचा आढावा घेतला. पक्षाची पूर्ण तयारी झाली असून यादी जाहीर होताच प्रचाराला प्रारंभ करण्यात येईल, असे शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी सांगितले.
पुरोहितांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण
दुसरीकडे, गेल्या महिन्यात उमेदवारी जाहीर होताच भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांनी जनसंपर्काची पहिली फेरी आटोपून घेतली. पक्ष कार्यकर्त्यांच्या मंडळ निहाय बैठकी त्यांनी घेतल्या. याशिवाय विभिन्न समाजाच्या बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. प्रत्येक मंडळात मोठय़ा सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले. दुसऱ्या फेरीलाही त्यांनी सुरुवात केली आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, असे भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी सांगितले. आमदार देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रमुख आहेत.
बहुजन समाज पक्षाचे माणिकराव वैद्य यांचाही जनसंपर्क जोमात सुरू झाला आहे. पंधरवडय़ापूर्वी पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली. समाजाचे मेळावे, भाईचारा समितीच्या बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क यावर त्यांचा भर आहे. आतापर्यंत त्यांच्याही दहाहून जास्त सभा झाल्या आहेत. यात प्रदेश उपाध्यक्ष सुरेश साखरे, सरचिटणीस कृष्णा बेले, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, मिडिया प्रभारी उत्तम शेवडे, धरमकुमार पाटील आदी त्यांच्यासोबत आहेत.
रिपब्लिकन आघाडी मैदानात उतरणार
काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्धार रिपब्लिकन आघाडीने केला आहे. मात्र, आज झालेल्या आघाडीच्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या गवई व आठवले गटाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे आघाडीचे उमाकांत रामटेके यांनी सांगितले. विदर्भातील कोणत्या जागांवर उमेदवार उभे करायचे यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीला अमृत गजभिये, दिनेश गोडघाटे, प्रल्हाद दुर्गे, डॉ. मिलिंद माने, राजू लोखंडे आदी उपस्थित होते.